विश्वास एक चिंतन


मी सिंगापूरमधे राहतो. संगणक क्षेत्रात रात्री-अपरात्री ऑफीसमधे थांबून काम पूर्ण करणे आता अगदी अपेक्षित झाले आहे. पण, सिंगापूरमधे रात्री अपरात्री तुम्ही सहज एकटे फिरु शकता. स्त्री असो वा पुरुष तुम्हाला इथे समसमान सुरक्षा आहे. सुरक्षा ह्या देशाच्या प्रत्येक नियमात आहे. इथल्या लोकांच्या आचरणात आहे. इथल्या गल्लीबोळीत आहे. रस्त्यावर आहे. इथल्या हवेत आहे. तुम्हाला इथे अविश्वास दाखवण्याची संधी इतक्या सहजासहजी मिळणार नाही. तुमचा विश्वास गळून पडेल अशा गोष्टींचा अनुभव तुम्हाला इथे इतक्या सहजासहजी येणार नाही. मध्यंतरी मी 'नॉर्डिक फिल्म फेस्टीवल' मधे गेलो होतो. तिथे एक वाक्य वाचले - Danes trust their fellow citizens, why many parents leave their bundled babies outside in strollers while they do business in cafes or shops. डॅनिश लोकांना आपल्या लोकांवर विश्वास असतो म्हणून तर... तिथल्या पालकांना मुलांना बाहेर बाबागाडीमधे झाकून कॅफेमधे किंवा दुकानात काम करायला जमतं. प्रत्येक देशाने आपल्या नागरीकांना असा हा विश्वास देणे किती गरजेचे आहे. जेंव्हा आपल्या वा इतर कुठल्याही देशात नको त्या हिंसक घटना घडत असतात तेंव्हा आपला देशही असाचं सुरक्षित असावा असे अनेकांना वाटतं असते. पण हा विश्वास निर्माण करणे फक्त एका व्यक्तीच्या हातात नसून त्या विश्वासाची सुरवात आधी तुमच्यापासून होते. खूप अवघड नसले तरी खूप सोपेही नाही स्वतः नियम पाळणे आणि इतरांना नियम पाळण्यास प्रेरित करणे. नाहीतर 'भारत माझा देश आहे.. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे" अशी ही वाक्य शाळेतचं विरुन जातात. 

विश्वास हा फक्त नात्यांमधे नसतो. एकदा माझ्या घरी मी एक पाल पाहिली. ती मला आणि मी तिला दचकून आम्ही एकमेकांपासून दूर झालो. पण, नंतर ती मला पुन्हा दिसली. मी तिला काहीचं केले नाही. माझ्या नजरेची तिला भिती वाटेल असे समजून मान दुसरीकडे वळवली. आता ती तिला हवे तसे वावरते. तिला माझ्या भूतदयेवर विश्वास आहे. अंगणात पोळीभाकरीसाठी येणारी कुत्री मी त्यांना पोळीभाकरी नाही दिली तरी येतातचं. कारण, त्यांचा विश्वास आहे माझ्यावर की मी त्यांना निदान हाड हाड तरी करणार नाही. ती समोरच्या, अंगावर चरफडत येणार्‍या काकांच्या अंगणात उभी राहत नाहीत. कारण, त्यांना ऐव्हाना माहिती झाले की तिथे आपल्याला इथे कुणी उभं सुद्धा राहू देणार नाही. सकाळी दहा वाजले की गॅलरीमधे एक कावळा येतो. त्याला विश्वास आहे की माझी आई त्याच्यासाठी वाटीत वरणभात किंवा पोळीभाजीचा काला खायला देईल. आईला वाटतं माझा गेलेला मुलगा कावळा बनून रोज आपल्या आईला भेटायला येतो. आईवर मुलाचा विश्वास असतो ना. आई भूकेजल्या पोटी मुलाला परत कशी पाठवेल!

आईच्या उदरात गर्भ रुजत असतो. त्याला बाहेरच्या जगात आणण्यापूर्वी आई त्याला प्रेम आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी देत असते. ती सांगत असते माझं प्रेम आणि तुझा माझ्यावरचा विश्वास कधी.. कधीचं तुटणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी अढळ आहेत. मी तुझ्यासाठी निखळ स्वच्छ आहे. आपल नातं हे एक वरदान आहे. आईसमान फक्त आईचं. एक पवित्र नात. पण, हे एक नातं सोडलं की बाहेरच्या जगात प्रतारणा, विश्वासघात, फसवाफसवी करणारे अनेक जण आपल्या वाट्याला येतात. हळूहळू आपल्यातल्या निरागसतेला आपसूक ठेच पोहचत राहते. आपणही मग स्वार्थी, मतलबी, चतुर, हुषार, व्यवहारिक, बनेल, कामापुरता मामा हे गुण अंगी बाणायला शिकतो. पण, आपल्यातले काहीजण विश्वास न बसावा इतके खरे, प्रांजळ, प्रामाणिक, नि:स्वार्थी, ओलावा देणारे, मदत करणारे, प्रेम देणारे असतात की असं वाटतं अशी ही एक व्यक्ती मला आयुष्यभरासाठी पूरेशी आहे. 

विश्वास हा देवावरही असतो. तो आहे ही प्रचीती अनेकांना येते. तो संकटात बळ देतो. तो तुमच्या अंध:कार आयुष्यात तुमच्या सोबतीला असतो. तो आहे ही जाणिव तुम्हाला तुमच्या दु:खात होत राहते. त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवत राहते. तो आहे हे पटवून देण्याची तुम्हाला गरज भासत नाही. म्हणून देव आहे हे न शिकवताही काहीजण देव आहे ह्यावर विश्वास ठेवतात. कारण, त्यांना तो अनुभव आलेला असतो. तो अनुभव कथित करणे भले सोपे असेल पण तो कुणाला पटवून देणे हे मात्र अवघड आहे. आमच्या शब्दगंध मधली स्वाती दामले 'अस्तित्व' ह्या कवितेत देवाबद्दल म्हणते 'तुझं असणं किंवा नसणं हा वादाचा विषय नाही... ती ज्याच्या त्याच्या मनाची सापेक्ष स्थिती आहे'. कधीकधी काहीकाही गोष्टी आपण विश्वासानेचं जिंकतो आणि विश्वास हरवल्यामुळे काहीकाही गोष्टींना हरवून जातो.

नातीगोती ही आपली असतात म्हणून आपण हवे तसे वागतो, बोलतो, नको ती वागणूक देतो, शब्दाशब्दानी एकेकाचा वध करतो. एक दिवस असा येतो की ती आपल्यापासून खूप खूप दूर गेलेली असतात. असून नसल्यासारखी निर्जीव होऊन जातात. 'हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो' अशी गाणी ऐकली की कळत किती विश्वासाने नाती-गोती-मैत्री-प्रेम ह्यांना सांभाळावं लागतो. नाहीतर एक दिवस असा येतो की आपणही विश्वासघात केल्यामुळे वा झाल्यामुळे असे म्हणतो.... 

कोई ये कैसे बता ये के वो तन्हा क्यों है ? 
वो जो अपना था वोही और किसी का क्यों है ? 
यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है ? 
यही होता हैं तो आखिर यही होता क्यों है ? 

यशवंत काकड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा