भीती कोणाची कशाला ?

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

“लहानपण देगा देवा” असं संत तुकारामांनी उगाच नाही म्हटलंय! लहानपणी आपण अगदी निर्धास्त असतो. नवनव्या गोष्टी शिकायला घाबरत नाही. आपल्याला उद्याची काळजी नसते किंवा कालचा विचार नसतो. आपण फक्त तोच क्षण जगत असतो. आपल्याला स्पर्धा असते ह्याची सुद्धा जाणीव नसते; त्यामुळे काहीतरी अमुक मिळवायचं म्हणून आपण ते करत नसतो तर आपल्याला काही आवडतंय म्हणून आपण करत असतो; पण मग मोठे होतो तसे एक एक गोष्टी जास्त कळतात आणि मग भीती वाटते.

मला पाण्याची भीती होती. त्यामुळे दोन तीन वेळा स्विमिन्ग कॅम्प्सना जाऊनसुद्धा पाण्यावर तरंगणंच जमत नव्हतं. दहावीच्या सुट्टीत माझ्या सगळ्या मैत्रिणी स्विमिन्ग टॅंकवर स्विमिन्ग कोच म्हणून यायच्या; पण मी मात्र स्विमिन्ग शिकायलाच जायचे तेव्हासुद्धा. स्टेप्स आता पाठ होत्या नमस्कार, पुढे हात मारायचे आणि पाय कसे मारायचे कारण कितीतरी समर कॅम्पस फक्त हेच करत होते. पण पाण्यात पोहायला काही जमत नव्हतं. कुठे बाहेर पिकनिकवर किंवा समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी गेलो की मैत्रिणी बोलवायच्या, "अगं ये ना पाण्यात, मी धरते तुला.” माझी काही केल्या हिम्मत नाही व्हायची. मी त्यांना सांगायचे, “अगं मी बघते तुमचं स्विमिन्ग”. एक दिवस एका मैत्रिणीच्या आग्रहामुळे मी खोल पाण्यामध्ये गेलेही; पण ती शिकवत असताना तिला इतकं जोरात घाबरून खाली ओढलं की ती पण बुडाली असती अशी परिस्थिती आली. त्यानंतर तर अजिबातच पाण्यात उतरायचा कॉन्फिडन्स नव्हता. स्विमिन्गतर फारच लांब. मग पुढे परत स्विमिन्ग कॅम्पस पुरतं शिकलं जायचं; पण त्याची प्रॅक्टिस नाही व्हायची. आणि मग हळू हळू स्विमिन्ग शिकायचा हट्ट कमी झाला आणि ते मागेच पडलं.

एक वर्षापूर्वी, आम्ही बालीला फिरायला गेलो. तिथे हॉटेलच्या स्विमिन्ग पूल मध्ये मुलाबरोबर पाण्यात उतरले. मुलगा नवीन स्विमिन्ग शिकत होता म्हणून त्याला प्रोत्साहन म्हणून पाण्यात उतरले. मुलगा खूप लौकर शिकला पोहायला आणि त्याला पाहून पुन्हा एकदा स्विमिन्ग शिकायची इच्छा झाली, कारण त्याच्याबरोबरचे ते पाण्यात पोहण्याचे क्षणसुद्धा गमवावेसे वाटत नव्हते आणि आधीचं रेकॉर्ड होतं पाठीशी. मग तेव्हा मला माझा मुलगा म्हणाला, “अगं आई try कर तू. येईल तुला स्विमिन्ग.” मग माझी इच्छाशक्ती पाहून मला माझ्या नवऱ्यानेही खूप प्रोत्साहन दिलं. मग सुरवातीला अगदी कमी अंतर, मग अजून थोडं अंतर वाढवत चक्क मला स्विमिन्ग यायला लागलं. आता मुलाबरोबर स्पर्धा करत करत स्विमिन्ग सुधारतेय.

कधीतरी दहा लॅप्स तर कधीतरी पाचच; पण वयाच्या ३४ व्यावर्षीसुद्धा स्विमिन्ग शिकता येऊ शकतं. एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही स्विमिन्गला जायचं, म्हणून बाबा ऑफिस मधून येण्याची वाट बघायचो; पण आता कितीतरी वेळा आम्ही दोघं सुद्धा जातो. प्रत्येक वेळेस पोहून एक नवीन अनुभव येतो. माझ्या आईला फार वाटायचं मला स्विमिंग यावं कारण तिला स्वतःला उत्तम पोहता यायचं. त्यामुळे तिची ही इच्छा पूर्ण केल्याचं एक समाधान मिळालंय मला.

भीती म्हणाल तर अशी पूर्णपणे त्यातून सुटका होत नाही; पण आपण तिला आपला एक सोबती करून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला नवीन गोष्टी अनुभवायला मिळू शकतात.सो जंप इन ! वॉटर इज परफेक्ट!

-संचिता साताळकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा