मैत्रीमय जग

सुनीलच्या नोकरीसाठी आमचं जॉर्डनला जायचं ठरलं तोपर्यंत जॉर्डन किंवा अम्मानचं नाव देखील ऐकलं नव्हतं. "बाकी जगातल्या सगळ्या जागा सोडून ही कुठली जागा शोधलीत?" असंच भेटलेल्या प्रत्येकाचं मत होतं. आम्ही जेव्हा अम्मानला पोचलो तेव्हा "ये कहाँ आ गये हम " अशीच अवस्था झाली होती. अरब लोकांबद्दल भीतीचीच भावना मनात होती. गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच सुपरमार्केटमध्ये जावं लागलं. एक अरब स्त्री जवळ आली. कुठून आलात वगैरे चौकशी केली. अगदी आपुलकीने, "Welcome to Jordan" म्हणाली. अनोळख्या व्यक्तीने नविन देशात केलेल्या त्या स्वागताने मला खूप आनंद झाला. आता आपलं इथलं वास्तव्य सुखाचं ठरणार याची खात्री पटली. 

तिथे पोचल्याबरोबर सर्वात आधी भेटला तो आमचा ड्रायव्हर. रुबाबदार व्यक्तिमत्व, हसरा चेहरा आणि प्रचंड आपुलकी. त्याला बघितल्यावर अगदी प्रसन्न वाटलं.आम्हाला अरेबिक येत नसल्यामुळे कुठेही जातांना तोच सोबत असायचा.अपूर्व आणि अथर्व दोघांशीही त्याची पटकन मैत्री झाली. अथर्व लहान असल्यामूळे अगदी स्वतःच्या मुलाची घ्यावी तशीच त्याने अथर्वची काळजी घेतली. माझे आई बाबा अम्मानला आले होते तेव्हा त्यांना जॉर्डन दाखवण्याचे कामही त्यानेच केले. ते परत जाताना म्हणाला कि मी त्यांचा जॉर्डेनियन भाऊ आहे तुम्ही काही काळजी करू नका. तो आमच्या कुटूंबातला घटकच झाला होता.आमच्या घराजवळ एक फ्लोरिस्ट होता. मी नेहमी त्याच्याकडून फुलं आणि बुके घेत असे. एकदा भारतीय राजदूतांकडे जायचं म्हणून मी बुके ऑर्डर केला होता, तो घ्यायला जेव्हा मी गेले, तेव्हा ऑर्डर केलेल्या बुकेसोबत आणखी एक बुके दिला. मी विचारल्यानंतर तो म्हणाला कि दुसरा बुके तुझ्यासाठी आहे. मला आनंद मिश्रीत आश्चर्य वाटलं. एवढ्या प्रेमाने त्याने दिलेल्या त्या बुकेनी देश, भाषा, धर्म सगळ्यांच्या पलीकडे असलेला मानवता धर्माची मला शिकवण दिली. शेजारी, सुनीलच्या ऑफिसमधले सहकारी, जिममध्ये येणारे लोक, शाळेतले शिक्षक, दुकानदार, डॉक्टर्स, डेंटिस्ट,असे हळूहळू बरेचजण आमच्या ओळखीचे झाले. त्यातले काही तर फॅमिली फ्रेंड्स बनले. एकदा आम्ही सुनीलच्या मित्राच्या घरी जेवायला गेलो होतो. सर्वात आधी त्यांना व्हेजिटेरियन म्हणजे काय ते समजावून सांगावं लागलं. त्यांनी इतके पदार्थ केले होते कि मनावर दडपण आलं. घरी परत येताना आपण फारसं खाऊ शकलो नाही ह्या विचाराने अपराधी वाटायला लागलं. सुनीलचा एक मित्र भारतीय जेवणाचा फॅन होता. त्याच्यासोबत खूपदा भारतीय रेस्टॉरंट मध्ये जेवण केलं. त्याच्या बायकोने बनवलेल्या अरबी व्हेज जेवणाची चव अजूनही लक्षात आहे. आमच्या शेजारणीने बेल वाजवून दिलेले स्वीट्स, एका मित्राने टेनिस मॅच साठी दिलेले आमंत्रण, जिम मधल्या मैत्रिणींसोबत केलेलं दुपारचं जेवण, फ्रेंच क्लास मधल्या मैत्रिणींसोबत अम्मानच्या रस्त्यांवर केलेली भटकंती, शाळेतल्या कॉफी मॉर्निंग्स, विनोदी डॉक्टर, माझ्या सर्जरी नंतर भेटायला येऊन आपुलकी दाखवणारे अरब मित्र,अशा कितीतरी मैत्रीच्या सुरेख आठवणी सोबत आहेत.

अम्मानला येताना मनात खूप शंका होत्या. अम्मान सोडताना मात्र अगणित सुंदर आठवणी सोबत घेऊन आले आहे. आमचं पाच वर्षांचं वास्तव्य ह्या मित्रांमुळे अतिशय आनंददायी झालं. अजूनही दर ईदच्या दिवशी त्या सर्वांसाठी मी देवाकडे आशीर्वाद मागते आणि त्या सर्वांच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करते. मैत्रीसाठी देश, धर्म, भाषा, वय, अशा सीमा नसतात हेच खरं!


- माधुरी देशमुख-रावके


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा