तीन पायांचा अनभिषिक्त 'सम्राट'

न अभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता ।।

हे सुभाषित वाचले आणि माझ्या दृष्टीसमोर माझे आदर्श, संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत थोर शिवाजी राजे आले. त्यानंतर त्यांचेच गुरु श्री स्वामी समर्थ रामदास हे दूरदृष्टी असलेले समर्थ व्यक्तिमत्त्व आठवले. शून्यातून मोठे विश्व निर्माण करण्याची क्षमता असणारी ही महान व्यक्तिमत्वे. मी लेख लिहायला घेतला आणि त्याच वेळी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यातून एक आवाज मला ऐकू आला.

त्या आवाजाने मला विचारले, " मला विसरलीस? मी तुमच्यासारखा दोन पायांचा माणूस नसलो म्हणून काय झालं? आहे तर मी सिंहाच्या घराण्यातला. वाघाची मावशी म्हणून सर्व सामान्यांना ज्ञात असलेला. तुझ्या घरात चौदा वर्षे सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा. तुमचे - आणि विशेषतः तुझे - आयुष्य सकारात्मक विचारांनी उजळवून टाकणारा. जरा आठवून बघ ... आणि मग तो पुढे काही बोलायच्या आधीच मला त्याच्या अनेक गोष्टी आठवू लागल्या. मला अपराधी वाटले. खरे तर मी लिहिणार होते आपल्याला सर्वांना ज्ञात असलेल्या बुलंद, उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी. आणि हा प्राणी (माणूस नव्हे) जेमतेम माझ्या पायाच्या घोट्यापर्यंत पोचणारा. माझ्या परिचयातील वर्तुळातील काही लोकांना माहीत असलेला. मग मला का वाटतेय त्याच्याविषयी म्हणजे आमच्या 'सम्राट' विषयी लिहावेसे? मी विचार करू लागले. विचार करत गेले आणि माझ्या प्रश्नाला असंख्य आश्वासक उत्तरे मिळाली .मी समाधानाने लिहू लागले.

तो (सम्राट) माझे प्रेरणा स्थान होता. त्याच्याकडून मी खूप काही शिकले. वक्तशीरपणा, स्वच्छता, खूपदा स्वतंत्र विचार करायला लावणारा बेफिकीर स्वभाव ,तरीही केअरिंग - दुसऱ्याची काळजी घ्यायची वृत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता आत्मसन्मानाने कसे जगायचे, आपल्या हक्कासाठी कसे लढावे ... ही यादी खूप मोठी आहे. अशा अनेक गोष्टी त्याने मला अक्षरशः कृतीतून शिकवल्या. त्याला आपल्यासारखे बोलता येत नव्हते. पण त्याचे न बोलता वागणे माझ्या मनावर खोलवर संस्कार करून गेले. "न बोलता चाले, त्याची वंदावी तीन पाऊले" हा नवीन वाक्प्रचार मला सुचला. त्याच्या सहवासात आमचे सगळे कुटुंब पसाभर जास्तच आनंदी राहू लागले. कधी टेन्शनचा प्रसंग आलाच तर त्याच्या खेळकर खोड्या बघताना आम्हाला हसू फुटल्यावाचून राहत नसे.

हा माझा सखा, माझा मित्र; कधी कधी माझ्या लहान मुलासारखा वागत असे. एका वेळी त्याने मला अनेक नात्यांची बिरुदावली चिकटवली. त्याची गोंडस पावले माझ्या पावलावर ठेवून तो लहान मुलासारखे खेळायला बघे. मी उभी असले की त्याची लांब, गुबगुबीत काळीभोर शेपूट कधी माझ्या पायाभोवती गुंडाळून तो माझा 'पुतळा' करी. घरातील स्त्रीला कधी कधी ( खूपदा) जबाबदाऱ्यांचे शिवधनुष्य लीलया पेलावे लागते. कोणाला न दुखवता नातेसंबध सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते. अशा प्रसंगातून जाताना घरातील आणि बाहेरील व्यवहारांची घडी व्यवस्थित घालणे - तेही मानसिक संतुलन जराही न बिघडवता. सम्राटच्या लडिवाळ सहवासात मला हे खूप छान जमू लागले. निराशाजनक, एकटेपणाचे विचार कधी नकळत मनात आलेच तर त्याच्याशी खेळता खेळता कुठल्या कुठे पळून जात.

तो घरात आल्यापासून त्याने सर्वांना आपलेसे केले. त्याचे काळेभोर तुकतुकीत अंग आणि कपाळावर व तीन पायांवर असलेला पांढराशुभ्र ठिपका. हो, त्याला तीनच पाय होते. पण त्याच्यासारख्या मुक्या प्राण्याने जन्मजात मिळालेल्या तीन पायांवर मला, आम्हांला सगळ्यांनाच अनेक गोष्टी नव्याने शिकवल्या. त्याच्यामुळे माझा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आपल्यात काही कमी असेल ( शारीरिक किवा मानसिक ) तर त्यासाठी रडत, कुढत न बसता त्या त्रुटीवर मात करून आपले जगणे यशस्वी कसे करून दाखवायचे हे त्याने दाखवून दिले. त्याच्या दिसण्यात, वागण्यात मला कधीही लाचारी डोकावताना दिसली नाही. त्याला त्याचे खाणे नेहमी स्वच्छ अशा प्लेटमध्ये द्यावे लागे. खाली टाकलेले खाणे त्याला अजिबात रुचत नसे. सुरुवातीला तो पक्षी मारत असे. पण एकदा - दोनदा मी दाखवलेली नाराजी त्याला बरोब्बर कळली. त्यानंतर त्याने कधीही कबूतर किवा पक्षी मारले नाहीत. वेळेची त्याला जाण होती. प्रत्येक गोष्ट वेळेवर करायची सवय. त्याचे सगळे विधी, खाणेपिणे, उठणे, झोपणे वेळच्या वेळी. त्याच्यामुळे माझ्यातला उरला सुरला आळशीपणा नाहीसा झाला.

त्याचे चालणे, त्याचे दिसणे आणि वागणे एका राजासारखे. अगदी राजबिंडे. डोळ्यात आत्मविश्वास - अगदी चार पायाच्या सर्व साधारण मांजराला किवा दोन पायाच्या माणसाला आश्चर्य वाटेल असा. म्हणून तर मी त्याला "सम्राट" म्हणू लागले. आमच्याविषयी विशेष आपुलकी, प्रेम. माझ्या मुलीशी वागताना तो निराळा भासे. ती घरात लहान हे त्याला कळत असावे. तिच्याशी लहान मुलासारखे खेळत असे. मानी तर इतका की एकदा तिने त्याला तिच्या खोलीत झोपू दिले नाही तर हा पठ्ठ्या पुन्हा म्हणून तिच्या खोलीत झोपायला गेला नाही. घरातील बाबा आणि आई ह्यांची व्यक्तिमत्वे वेगळी असतात हे त्या बुद्धिमान मांजराला अचूक माहित होते. माझ्या बाबतीत त्याचे वागणे थोडे हळूवार होई. आमच्याकडे दार उघडल्यावर येणाऱ्या माणसाला ह्या अजब अशा तीन पायाच्या प्राण्याला सामोरे जावे लागे. त्याचा दरारा होता. दुरुस्तीला येणारे मेकॅनिक, प्लंबर किंवा पोस्टमन त्याला वचकून असत. मी गंमतीने त्याला माझा बॉडीगार्ड म्हणू लागले होते. जणू आपल्या आईला कोणी त्रास देऊ नये अशी त्याची भावना असावी. कोणी लहान मूल पाहुणे म्हणून आले की त्याची घालमेल होत असे. मी त्या मुलाला मांडीवर घेईन ह्या भीतीने तो आधीच माझ्या मांडीवर विराजमान होत असे . माझ्या लेखनाला त्याची सोबत असे. रात्री बेरात्री लिहिलेल्या माझ्या कथा-कवितांचा तो एकमेव साक्षी आहे. 

सुरुवातीला त्याचे तीन पायावर लंगडत चालणे प्रथम पाहणाऱ्याच्या मनात दया निर्माण करत असे. परंतु नंतर त्याच्या चालण्यातील डौलदारपणा, वागण्यातील राजसपणा बघणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेत असे. हळूहळू तो आमच्या कॉलनीत एखाद्या वीर पुरुषासारखा प्रसिद्ध झाला होता. मुलांना खेळताना बघणे हा त्याचा आवडता छंद होता. एकदा तो दुसऱ्या मांजराच्या पिल्लांना पुढ्यात घेऊन त्यांचे लाड करताना दिसला तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.

त्याच्या वागणुकीने तो मोठ्या उंचीवर पोचलेला. ध्रुवासारखा. अढळ पदावर विराजमान झाला. वयोपरत्वे तो आम्हाला सोडून गेला. पण आमच्या मनावर राज्य करून गेला.

मोहना कारखानीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा