झेप

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

दुकानामध्ये रांगेत उभे होते. माझ्या पुढच्या माणसाने पाकिटातून पैसे काढले दिले आणि उरलेले पैसे व सुटी नाणी पाकिटात ठेवली. नेहमीचाच व्यवहार. माझे लक्ष पुढे सरकाण्याकडे! आणि त्यानी मागच्या खिशात पाकीट ठेवताना पाहिले, अरे देवा! त्याच्या दोन्ही हातांना पंजेच नव्हते. परत येताना मन अतिशय अस्वस्थ होते. आपल्या इतक्याच सहजतेने त्याने सर्व गोष्टी केल्या, करत असणारच. भाजी कापताना सुरी बोटावरून फिरली तर बँडेड लावून एक बोट जखमी म्हणून नाचणारी मी! आणि मग ते बरे होईपर्यंत त्यावर परत परत लागल्यावर वैतागणारी आणि हा? दोन्हीही पंजे नाहीत!! आपल्याइतकी सहजता येईपर्यंत किती प्रयत्न, धडपड करावी लागली असेल? मग आठवली CRY या संस्थेच्या मुलांची घेतलेली भेट. कुणाला पाय नाहीत, कुणाला हात, तर कोणाला असेच हाताचे पंजेच नाहीत. हात नसलेली मुले पायाने चित्र काढून रंगवित होती. पाय नसलेली, पंजे नसलेली मुले लाकूड रांधून वस्तू बनवित होती. त्या काळात ग्रीटिंग कार्ड्स पाठवायची पद्धत होती. खरीखुरी! ई-मेलने नव्हे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी पण केला होता, ग्रीटिंग कार्ड्स विकत घ्यायची तर ती CRY या संस्थेचीच!

विचारांच्या गर्दीत मग विस्मरणात गेलेला माणूस आठवला. अरेच्च्या, अँथनीला कशी काय विसरले मी ? शाळेत असताना (असेन दुसरी-तिसरीत) खेळताना पडून गुडघा दुखावला होता. जरा जास्तच कौतुक करून घेत होते. टिळक मंदीरात एक प्रदर्शन लागले होते. बापू घेऊन गेले मला. थोडे स्टॉल्स मजेत फिरून झाल्यावर एका छोट्या स्टेजसमोर नेले. बापरे! त्या माणसाला हात आणि पाय दोन्हीही नव्हते. नुसतेच धड आणि डोके!! त्या आठवणीने आत्ताही शहारा आला अंगावर, आणि तो तोंडात पेन पकडून लिहीत होता! त्याने कपातील चहा बशीत ओतून पिऊन दाखवला! डोक्याने बॉल मारीत नुसत्या धडावर धडाधड धावत होता आणि अशा अनेक गोष्टी करत शेवटी ओठाच्या कोपऱ्यात सुई पकडून, दुसऱ्या कोपऱ्यात धागा पकडून त्याने चक्क सुईत दोरा ओवला!! अविस्मरणीय! त्यानंतर केलेल्या प्रत्येक शिवणकामाच्या वेळी त्याची हटकून आठवण यायची. खेळ संपल्यावर आम्ही त्याची भेट घेतली. तो चक्क M.A. in English होता. त्यावेळी याचा अर्थ खूप शिकला एवढेच कळले. घरी गेल्यावरही त्याचाच विषय! बापू, आई व दादाला सांगत होते, इतका शिकून असा खेळ करावा लागतोय म्हणून वाईट वाटते आहे पण एवढेच समाधान की त्याच्या जीवावर पैसे कमावणारे त्याची चांगली काळजी घेत असतील.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अँथनी आठवला आणि पुढची वाट सुकर करत गेला. तसे म्हटले तर प्रत्येक सजीवाला संघर्ष करावा लागतो. प्राणिमात्र जन्म घेतानाच त्याच्यासमोर असतो आईच्या उदरातून बाहेर येण्याचा वा अंड्याचे कवच आपल्या कोवळ्या चोचीने फोडण्याचा किंवा बीजासाठी जमिनीतून वर आणि खाली एकाच वेळी दोन्हीकडे वाढण्याचा संघर्ष... प्रत्येकाची जीवनाची सुरुवात या संघर्षानेच! ती तशी अंतापर्यंत!! थोर मोठेही कोणी सुटले नाही त्यातून, उलट त्यांचा संघर्ष अधिक प्रखर नि तेजोवलयही अधिक उदात्त! उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊली, शिवाजीमहाराज, सावरकर, सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी अशा शेकडो व्यक्ती, किंबहुना हजारो व्यक्ती जगात तळपतात. त्यांच्यासारखे दैदिप्यमान कार्य नसेल पण सर्वसामान्यही दैनंदिन जीवनात संघर्ष करीत आहेत. भारत सोडून परदेशात येताना यशाची शिखरे खुणावत असताना तुम्हीही भावनात्मक संघर्ष केलाच असेल! आजच्या लेखापुरते सांगायचे तर अनादिकाळापासूनच्या लाखो उदाहरणातून एखादी गोष्ट निवडायची महाकठीण!अनेक व्यक्तींच्या कथांची आपण पारायणे करतो, आदर्श मानतो. आपल्या मंडळात तरुणाई आणि मध्यम वयोगट बहुतांश, म्हणून मी सांगते गोष्ट, जिद्दी करीना हालकिमची !

ऑगस्ट २००६ ची ती एक सुंदर सकाळ होती. इतर अनेक स्काय-डायव्हर्सप्रमाणे करीना हालकिमही लेक जिनेवा मध्ये दहा हजार फुटांवर असणाऱ्या सेसना (विमानाचा एक प्रकार) मधून पॅराग्लायडिंग प्रात्यक्षिकासाठी उडी मारण्यासाठी उत्सुक होती. तीस वर्षांची करीना थ्रिलच्या कल्पनेने तिच्याएवढ्याच उत्साहित झालेल्या मित्र-मैत्रिणींबरोबर हास्यविनोद करीत होती. पहाटे पाऊस पडून गेला होता पण आता सूर्य स्वच्छ ढगातून डोकावित होता. कोवळी सूर्यकिरणे आल्हाददायक वाटत होती. प्रथमच येणारे उत्साहाने फोटो काढत होते. उडीच्या कल्पनेने थरारले होते. करीना उल्हसित असली तरी त्या मानाने शांत होती. ‘आपल्याला जे करायला आवडते ते करायला मिळते आहे. त्यासाठी देशोदेशी प्रवासाची संधी मिळून आपल्यासारखेच सर्व प्रकारचे साहसी लोक भेटत आहेत’ असा विचार मनात येऊन ती स्वतःला खूप नशीबवान समजत होती. करीनाने याआधीही मृत्यूची येण्याची शक्यता असलेल्या थरारक उड्यांचे अनुभव घेतले होते. उदाहरणार्थ, शांघाय येथील ‘जिन माओ टॉवर’च्या ८८ व्या मजल्यावरून मारलेली उडी वा मालीचे अत्युच्च टोक, ‘हॅन्ड ऑफ फातिमा’, वरून घेतलेली झेप! त्यामुळे आजची उडी तिच्या दृष्टीने मामुली होती.

हेल्मेटला कॅमेरा लावलेला, कोपराला धूर येणारा केलीस्टर लावलेला (ज्यामुळे खाली उभ्या असणाऱ्या लोकांना तिची उडी, खाली येणे दिसू शकेल) असा wingsuit घालून करीना झेपावली. सर्व काही व्यवस्थित होते. खाली जमलेल्या हजारो लोकांचा आनंदकल्लोळ तिला ऐकू येत होता. आता पॅराशूट उघडायची वेळ झाली. चित्रीकरण चाललेले असल्याने उतरायची जागा थोडी वेगळी होती. काहीतरी गडबड झाली, पॅराशूट व्यवस्थित उघडलेच गेले नाही आणि ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने ती जमिनीकडे जाऊ लागली. तिच्या काही मित्रमैत्रिणींचा अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. तिलाही वाटले की संपले आता सारे. तिने तिचे हात तोंडासमोर आणले आणि त्याच अवस्थेत ती खडकावर धडकली. खडकांमुळे जीव वाचत नाही पण इतक्या वेगाने येणारे शरीर पटकन थांबते, फरफट थांबते. “माझी पाठ व तोंड आपटले नाही या एकमेव कारणाने मी जिवंत राहिले”..... आज ती सांगते. पण काय झाले असेल तिच्या शरीराचे? दोन्ही गुडघे मोडले, डाव्या मांडीच्या हाडाला चार फ्रॅक्चर्स आणि उजव्या पायाला २१ फ्रॅक्चर्स! पडताना दोन्ही पाय पुढे आलेले तिने पाहिले होते आणि मरण म्हणजे काय हेही कळत होते. काही सेकंदात प्रचंड वेदना झाल्या पण त्याही वेळी ‘मी अजून जिवंत आहे, जमिनीवर आहे’, ही जाणीव झाली आणि पुढच्या क्षणी शुद्ध गेली.

दोन दिवसांनी करीना जेव्हा शुद्धीवर आली, तेव्हा उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, आता ती कधी चालू शकणार नाही. तिच्या मनात आले. “हे साहस फक्त माझी नोकरी नव्हती तर माझी एकमेव आवड, माझी ओळख, माझं जगणंच! तेच जर मी करू शकणार नसले तर मी म्हणजे जिवंत प्रेतच!” नुकत्याच सिंगापूरला येऊन गेलेल्या करीनाने सांगितले. एकुलती एक मुलगी असणाऱ्या करीनाचे आई व वडील दोघेही उत्कृष्ट skier व रॉक क्लाईंबर्स होते. त्यामुळे साहस हे तिच्या रक्तातच आहे. करीना एक वर्षाची झाल्यावर तिचे वडिल तिला knapsack मध्ये बसवायचे (ज्यामधून तिचे पाय बाहेर लोंबकळत असायचे) नि रॉक क्लाइंबिंग करायचे. जरा मोठी झाल्यावर, “भीती वाटते” असे सांगितले की ते म्हणायचे, “वर बघ”, भिती गायब. यामुळे चालता येऊ लागल्यापासून तीही त्यांच्याबरोबर रॉक क्लाइंबिंग करू लागली. दिवस मजेत जात असतानाच कारचा अपघात झाला. आईच्या मेंदूला जबर दुखापत होऊन ती पुष्कळ महिने कोमामध्ये होती. त्यानंतर स्मरणशक्ती गेली आणि उजवी बाजू दुबळी झाली. करीना त्यावेळी फक्त चार वर्षांची होती. या घटनेने आई-वडिलांचे लग्न मोडले नि ती पुनर्वसन केंद्रात राहू लागली. हा तिच्यावर आणखी एक आघात! आई देहाने जरी आहे तरी आता जणू दुसऱ्या जगात आहे, आणि आई म्हणून पुन्हा कधीच भेटणार नाही याची जाणीव तिला झाली आणि कोवळ्या वयातच मानसिक परिपक्वता आली. आता वडिलांनी तरी निदान लक्ष द्यावे म्हणून ती खेळ आणि माऊंटन यामध्ये स्वतःला झोकून देऊ लागली. कारण तीच तिच्या वडिलांची एकमेव आवड होती. लहान वयातच कठोर परीक्षा! पण त्यात कौशल्य प्राप्त करून आकाशात संचार करणे प्रचंड आवडू लागले. ‘येथे स्वातंत्र्य आहे, मी हवं तिकडे उडू शकते’ या आनंदात अधिकाधिक प्रयोग करीत निपुण झाली. बालवयातच जगाचे लक्ष वेधले आणि स्पॉन्सर्सही मिळाले. हे करीत असताना जगरहाटीची तिला जाणीव होती. शिक्षणाशिवाय सारे व्यर्थ, म्हणून कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून पदवी घेऊन नॉर्वेजियन सिविल सर्विसमध्ये उत्तम पगार देणारी नोकरी स्वीकारली. आयुष्याच्या या छान टप्प्यात उत्तम बॉयफ्रेंड, उत्तम घर, आणि उत्तम नोकरी... सारे मिळाले असतांना, काही काळातच उद्विग्नता आली आणि सारे काही सोडून ती आधी फ्रान्स आणि नंतर साहसप्रेमींसाठी मक्का समजल्या जाणाऱ्या जर्मनीकडे धावली. येथे ती व्यावसायिक skier झाली. कुठेही राहायचे, प्रचंड मेहनत करायची आणि जास्तीत जास्त उंच जायचे, स्वतःलाच आजमावायचे. देखणी अन ऍथलेटिक शरीरसंपदा यामुळे खेळांच्या व्हिडिओमध्ये ती सुप्रसिद्ध झाली. व्यावसायिक स्पॉन्सर्सचे लक्ष तिच्याकडे वेधले. उदा. रेड बुल, नॉर्थ फेस (स्पोर्ट कंपनी). विसाव्या वर्षी तिला अमेरिकन व्यावसायिक Base Jumper जेब कॉर्लीस भेटले. त्यांच्या प्रेरणेने Idaho येथून ब्रिजवरून तर न्यूयार्क, वेगास येथील इमारतींवरून उड्या मारल्या. येथे मृत्यूची जास्त भीती असते, पण तिला पूर्णत्वाने साहस करायचे होते. काही काळानंतर दुसरे अमेरिकन उत्कृष्ट ॲथलिट हालमेनस भेटले ज्यांनी तिला अल्पाइन पर्वताच्या सुळक्यांवरून base jump मारण्यास शिकविले आणि ski base करणारी ती पहिली महिला ठरली. त्यानंतर अनेक साहसे करणाऱ्या करिनाची, डॉक्टरांनी पुन्हा चालू शकणार नाही असे सांगितल्यावर काय अवस्था झाली असेल हे समजू शकतो. अपघातापूर्वीच काही दिवस biographical documentary मध्ये, “20 seconds of Joy” या तिच्या आयुष्यावरील चित्रफितीने Mountain sports and people choice awards मध्ये best film म्हणून बक्षिस मिळविले होते.

नैराश्याच्या काळोखातून बाहेर येण्यास तिच्या वडिलांनी मदत केली. ते डॉक्टरांवरच रागावले आणि म्हणाले, “कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही. फक्त आजचा विचार कर, तोही सकारात्मक. ज्या प्रश्नांची उत्तरे आत्ता नाहीत, त्यावर विचार करण्यासाठी शक्ती वाया घालवू नको.” करीनाने उभारी धरली, अपघाताने मला परत स्वतःला आजमावयाची संधीच दिली, असे ती म्हणते. २० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया झाल्या. शरीर पॅचवर्कसारखे दिसू लागले आणि शरीरात तर निरनिराळ्या कितीतरी धातूच्या सळया, स्क्रू हे दागिने आले. पण ती हिम्मत हरली नाही. अपघातानंतर दोन वर्षातच तिने सुमारे दीड हजार लोकांसमोर, व्हीलचेअरवर बसून भाषण दिले. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांनी तिला जाणवले की, तिच्यापेक्षा तिची गोष्टच मोठी झाली आहे, आणि हजारो लोकांना प्रेरणा देत आहे.

६० किलो वजनावरून ४२ किलोपर्यंत वजन खाली आले. इतकी ऑपरेशन्स, पुनर्वसन केंद्रात खेपा, तरीही ‘मी थांबणार नाही’, ही तिची जिद्दच कामी आली. नुसते मोजे घालण्यासाठी सहा महिने प्रयत्न करावे लागले आणि दोन वर्षांच्या अथक मेहनतीने पुन्हा हळूहळू चालू लागली. पहिल्यांदा ती उभे राहून चालू लागल्याचे पाहिल्यावर नर्सच्या हातातील ट्रे च खाली पडला नि तिला अत्यानंदाने अश्रू आवरले नाहीत. आईसारखे धावून तिने तिला घट्ट मिठीच मारली. तीन वर्षानंतर २०१० मध्ये करीनाने तिचा skies ड्रेस परिधान केला आणि दोन वेळा नुसती धावूनच ती प्रचंड दमली. परंतु आज ती विनासायास पुन्हा आकाशात विहरते. कुठल्याही वातावरणात, अतिउंचीवरून झेपावण्यासाठी करावा लागणारा प्रवासही ती सहज करते. आजही अतिशय मेहनत करताना ती सांगते, “काय करायचे ते मी ठरविणार, माझे शरीर नाही!”....... You Tube वरील तिचे व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी आहेत.

५ आणि ३ वर्षांच्या मुलांची आई असलेली करीना तिच्या पतीसह (तो नॉर्वेजियन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर मध्ये कोच आहे) वैवाहिक जीवन उत्तम प्रकारे जगत असतानाच प्रेरणादायी वक्ता, परफार्मन्स कोच म्हणून उत्तम कामगिरी करतेच पण शरीरातील असंख्य सळया आणि स्क्रू हे कायमस्वरूपी दागिने सांभाळून आकाशात भराऱ्या घेत आहे आणि अपघाताला अजिबात दोष न देता सांगते, “त्याने मला अनोखा दृष्टिकोन दिला. त्याशिवाय मला पूर्णत्व मिळाले नसते”

योगी याहुनी वेगळा असेल का?


- नीला बर्वे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा