ग्रीष्म-वर्षा

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

काळ्या मातीला कसून
झाली शिवारे तयार 
रविकिरणे दाहक 
तप्त झाले मातीकण

मृग नक्षत्र लागता
दाटे मेघांनी आभाळ 
नभाकडे पाही धरा
वाट पाहती चातक 

सर पडता मृगाची
बीज अंकुर फूटती 
कोंब डोकावून पाही
मनं आनंदे डोलती

काळ्या मेघांच्या गर्जना
थंडगार सरी आल्या 
पक्षी झेलती सरींना
मोर फुलवी पिसारा

शेते हिरवी दिसती 
किती आखीव रेखीव
जणू रेखियल्या कोणी
ओळी हिरव्या सुरेख 

झाला सुरू वर्षा ऋतू 
कोणी म्हणती हिरवा 
धरा भासे नववधू
शालू नेसली हिरवा

- वैशाली वर्तक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा