ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
काल, "ब्रिम" म्हणजे ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळ आणि "लास्ट मिनिट फिल्म डिस्ट्रीब्यूशन"च्या डिस्ट्रीब्यूटर अचला दातार यांच्यामुळे आम्हाला "पिंपळ" नावाचा हृदयाची धडधड वाढवणारा चित्रपट बघायला मिळाला. ब्रिस्बेन मध्ये मराठी चित्रपट बघायला मिळाला ह्या बद्दल अचला व ब्रिमचे आभार.
खरं तर ह्या चित्रपटात वेगळं असं काही नाही. पण पूर्वी होती तशी आत्ताच्या काळातली ही गोष्ट आहे. काळ बदलतो पण गोष्ट तीच असते. अमेरिकेत ज्यांना आपण एम्टी नेस्टर्स म्हणू अशा एका एम्टी नेस्टरची ही गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी मुले गावातून शहरात जात असत, तशी ती आता अमेरिका, कॅनडा, युरोप, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये जाऊन स्थायिक होत असल्याने त्यांचे आई वडील एम्टी नेस्टर्सच्या रांगेत हजेरी लावतात. मग जॉगर्स पार्क, लाफ्टर क्लब, तायची, योगा, आणि ब्रीज क्लबचे सदस्य बनतात. तेवढाच विरंगुळा. आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये अनेक गुगलींचा सामना करीत हे आजी वा आजोबा आपली बाजी सांभाळत एक-एक टप्पा पुढे सरकत राहतात. पण त्यांचं हे जगणं, जगणं म्हणावं का जिवंतपणे मरत राहणं. त्यातून जर आपला सवंगडी सुद्धा बाद झाला असेल, तर हा आयुष्याचा सामना एका फलंदाजावर किती काळ टिकेल हा प्रश्न.
परदेशी रहाणार्या बहुदा सर्वच मुलांना आपले आई व वडील आपल्या सोबत राहावेत असे वाटत असते पण जर त्यांना तसे वाटत नसेल तर 'मुलं बिघडली, आई वडलांना विसरली' अशी लेबलं लावून सगळेच मोकळे होतात. पण जर आई-वडिलांनाच मुलांकडे परदेशी राहायची इच्छा नसेल तर? कोणी कुठे राहायचे, कोणाबरोबर राहायचे हा प्रश्न कायम परदेशी राहणार्या मुलांना व त्यांच्या आई-वडिलांना डिवचत असतो. त्या प्रश्नामुळे अनेक वेळा रूसवे फुगवे होतात आणि संपायचे नावही घेत नाहीत. मग ते आपोआप कधीतरी संपतील ह्या आशेने सर्व वाट पहात राहतात. ह्या बाबतीत ना मुलं खूष असतात, ना आई-वडील.
"पिंपळ"ची गोष्ट अशाच एका एम्टी नेस्टर भोवती गुंफलेली आहे. चित्रपटातले हे आजोबा खूपच लाघवी आहेत. मध्य रात्रीचा गजर लावून, स्काईपवर नातवंडांना मराठी कविता शिकवणारे हे काळाप्रमाणे व परिस्थितीला सांभाळून पुढे चालणारे आजोबा. घरातल्या घरगड्यापासून, आपल्याहून अर्ध्या वयाच्या एका सुंदर मैत्रिण वजा डॉक्टरलाही हळवे करून सोडणार असे हे आजोबा. दिलीप प्रभावळकरांनी ही आजोबांची भूमिका खूपच छान रंगावली आहे. त्यांच्या त्या रुपात तुमचे वडील किंवा आजोबा, दररोज सकाळी मॉर्निग वॉकला दिसणारे किंवा शेजारी राहणारे आजोबा नक्की दिसतील. प्रिया बापटनेही आपल्या भूमिकेतून आधुनिक काळातली एक नव्या विचारांची, नव्या पिढीतील डॉक्टर व तिच्या पेशंट बरोबरचं नातं प्रेक्षकांपुढे मांडलं आहे. ही डॉक्टर जितकी केअर-फ्री आहे तितकीच केअरफुल. किशोर कदम ह्यांची भूमिकासुद्धा सामान्य कल्पनेच्या थोडी बाहेरची भूमिका आहे. काळजी घेणारा घरगडीसुद्धा आजोबांशी एक नातं जोडतो.
कथानकात जर काही वेगळं असेल तर ह्या चित्रपटात मुलांच्या, वडलांच्या काळजी पोटी असलेल्या भावना व वडलांच्या, त्यांचा पिता म्हणून असलेल्या भावना ह्या दोन्ही स्पष्ट मांडल्या आहेत. तसेच नवरा बायकोच्या विरहाच्या भावना, त्यातून दिसणारे प्रेम, त्यातून उद्भवणारी अपराधाची भावना अशा अनेक रसानी गुंफलेली ही माळ कशी तुमच्या अश्रुंच्या मोत्यांची माळ होते ह्याचा अनुभव हा चित्रपट बघताना येतो. लहान असो वा मोठे हा चित्रपट बघताना प्रेक्षक भावनिक झाले नाहीत तर नवलच! विचार करायला लावणारी व अतिशय प्रभावी अशी हया चित्रपटाची पटकथा आहे. गजेंद्र आहिरे दिग्दर्शित हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिस हीट होईल ह्यात वाद नाही.
कधीतरी आणि कोठे तरी एक पिंपळ लावायचा राहून गेला असतोच, केवळ ते ओळखणं बाकी असतं.
- अमृता देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा