संपादकीय - जीवनलढा चिरायु होवो!

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

मानवी कल्पनाशक्तीला अंत नाही असं म्हणतात; परंतु मानवी कल्पनाशक्तीच्या परिघापेक्षाही विस्तीर्ण असे हे विश्व आहे. ह्या विश्वातला अगदी थोडा भाग आपल्याला ज्ञात असला, तरी त्या भागातही पृथ्वी म्हणजे एक यःकश्चित कण आहे इतपत ज्ञान आपल्याला झाले आहे. ह्या ज्ञात विश्वात ह्या कणमात्र ग्रहाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही प्रगत जीवन नाही. थंड, निर्विकार असलेल्या ह्या अफाट निर्जीवपणात प्राणाचा एक सूक्ष्म तेजाळ बिंदू ह्या पृथ्वीवर उमटला आहे. अमावस्येच्या ढगाळ रात्रीच्या काळोखात पेटलेल्या एका ठिणगीप्रमाणे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणार्‍या त्या प्राणाचे आपण अंश आहोत. पृथ्वीला आपण माता म्हणत असलो तरी चार अब्ज वर्षे वयाची ही पृथ्वी एखाद्या सायीसारख्या सुरकुत्या पडलेल्या आजीबाईसारखी वत्सल नाही; तर भौतिकशास्त्राचे नियम कठोरपणे पाळणारी योगिनी आहे. कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत तिच्याकडे दुजाभाव नाही की कोणाच्याही चुकीला क्षमा नाही. अशा आत्यंतिक प्रतिकूलतेच्या काळडोहात सोडलेल्या ह्या जीवनाच्या पणतीचं त्यामुळेच अप्रूप! कितीही अंधार दाटो, कितीही लाटा येवोत आणि कितीही उलथापालथ होवो, त्या सगळ्यातून मार्ग काढत जाणे हीच जिवंतपणाची खूण. अशा धडपडणार्‍या, संकटांना सामोरं जाणार्‍या जिवांना आपला हा अंक समर्पित आहे.

आपल्या मायदेशात ग्रीष्म ऋतु अशी जिवांची परीक्षा पाहणारा असतो. सगळीकडे उन्हाची काहिली, उजाड झालेले डोंगरमाथे, वाळून पिवळं पडलेलं गवत आणि रखरखीत धुळीचे भोवरे असं ह्या उन्हाळ्याचं स्वरुप असलं; तरी त्यातही तग धरायला प्राणी आणि माणसं शिकतात. माणसांच्या आयुष्यात तर अकाली आणि दीर्घकालीन उन्हाळेही न सांगता-सवरता येतात आणि सगळं उजाड करुन जातात. पण माणसं निसर्गाला हार जात नाहीत. चिकाटीने नुसती टिकतच नाहीत; तर वैराण आसमंतात स्वकष्टाने मरुद्यान (ओअ‍ॅसिस) निर्माण करतात. 

आपल्या ह्या अंकात अशा संकटांना तोंड देऊन जगण्याची धडपड करणार्‍या माणसांच्या कथा व अनुभव आहेत, दु:खाची मीमांसा करणार्‍या कथा-कविता आहेत, स्वतः अनुभवलेल्या संकटांचे किस्से आहेत आणि ग्रीष्माच्या प्रेमळपणाबद्दलचे लेखही आहेत. ह्याबरोबरच सिंगापूरला आलेल्या पाहुण्यांचे सिंगापुरातील अनुभव, सिंगापुरात राहणार्‍यांचे इतर देशांमधले अनुभव मांडणारे लेख व सहा-सहा महिने दिवस आणि रात्र पाहावे लागणार्‍या प्रदेशात साक्षात्कार झाल्याप्रमाणे स्थळमाहात्म्याचा छडा लावणारे गूढ लेखनही आहे.
काही दिवसांपूर्वी सिंगापुरात भारतीय नौसेनेच्या तीन युद्धनौका सदिच्छा भेटीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी आयएनएस शक्ती या युद्धनौकेचे प्रमुख कॅप्टन श्रीरंग जोगळेकर यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांची मुलाखत ह्या अंकात समाविष्ट आहे. ही मुलाखत घेण्यासाठी कॅप्टन जोगळेकरांचे सुहृद ह्या नात्याने श्री. योगेश गोंधळेकर यांनी सर्वतोपरी सहाय्य केले, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
अंक आपल्याला कसा वाटला हे जाणून घ्यायची उत्सुकता आम्हाला सदैव असते; त्यामुळे हा अंक वाचून त्यावरील प्रतिक्रिया ब्लॉगवर वा ई-मेलद्वारे आम्हाला अवश्य कळवा!


सस्नेह,
ऋतुगंध समिती २०१८-१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा