ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २
"जीवन मे एक बार आना सिंगापूर" हे गाणं लहानपणी खूप वेळा रेडियोवर ऐकलं होतं. त्या वेळी असं वाटायचं की खरं का सिंगापूर इतक स्वर्गीय सुखाने ओतप्रोत आहे की कवी एवढं आवर्जून सिंगापूरला आयुष्यात एकदा तरी यायला हव असं म्हणतो? तो काळ वेगळा होता, मराठी माणूस तसा जन्मदरिद्रीच, तेव्हा घर सोडून स्वत:च्या देशातही विनाकारण फिरण्या करता जाण्याचा विचार ही करू शकत नव्हता. तेव्हा विदेशात जाण्याचा तर प्रश्नच उरत नाही. आमचे वडिल बंधु मुंबईला नोकरीत होते त्यांची नोकरी पूर्ण तेथेच झाली. ते ज्या वेळी इन्दूरला (म. प्र.) यायचे त्या वेळी सांगायचे की मुंबईच्या लोकांना इन्दूर म्हणजे एक छोटेसे गाव वगैरे असेल असं वाटायचं. तेव्हा आमचे बंधु त्यांना म्हणायचे "पाह्यला नाही माळवा आणि फिटली नाही भ्रांत" (इन्दूर माळव्यात आहे). खरोखर आमचे शहर सुंदर व प्रेक्षणीय आहे व खाद्यपदार्थांकरता प्रसिध्द आहे. तेव्हा मी ही म्हणू शकतो कि मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी इन्दूरला भेट द्यावी.
सिंगापूरचे म्हणावे तर माझ्या बाबतीत हा एक सुखद अनुभवच आहे की माझा छोटा मुलगा, चि.सुमित, ह्याने प्रेमविवाह केला व मुलगी सिंगापूरला स्थायिक झालेल्या तमिळ ब्राम्हण परिवारातली आहे. श्री. मोहन (आमचे व्याही), ह्यांच्या इच्छेनुसार लग्न इथे सिंगापूरला करण्याचे नक्की झाले व त्यायोगे पहिल्यांदा सम्पूर्ण वऱ्हाड निघालं सिंगापूरला. आम्ही थोडे जून्या वळणाचे; तेव्हा लग्नाला जाताना आपल्या कुळदेवता व उपासनेचे देव, श्री महालक्ष्मी व श्री रामचंन्द्र, ह्या मूर्ती बरोबर न्यायच्या की नाही हा प्रश्न पडला. तेव्हां आमचे स्नेही, स्व. नारायण कोरान्ने, ह्यांना विचारता त्यांच्या मते आपल्या कुळदेवता परदेशात न नेणेच योग्य असे ठरले. त्यांच्या मते फार तर आपण ह्या दोन्ही देवतांच्या तस्बीरी घेऊन जावे. पण परमेश्वराच्या इच्छेपुढे काहीही अशक्य नाही. येथे लग्न सोहळा सम्पूर्ण शास्त्रोक्त पध्दतीने, देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने, राममंदिरात पार पडला. आम्हाला तर साक्षात परमेश्वरच भेटल्याचा आनंद झाला!
आता ह्यावेळी मी व सौ. एक महिन्याच्या यात्रेवर सिंगापुरला आलो आहोत. आम्ही येथे दिनांक १५/५/१८ ला पोहोचलो. दूसर्या दिवसापासून भारतीय पंचांगानुसार अधिक मास (पुरुषोत्तम मास) प्रारंभ झाला. आमची सौ. थोडी धार्मिक प्रवृत्तीची; त्यामुळे तिची एकच चिंता कि पूर्ण अधिक महिना येथे केवळ फिरण्यात जाणार, काही देवधर्म वगैरे नाही. आमच्या विहीणी, सौ. विजया मोहन "आर्ट थेरेपिस्ट" आहेत. त्यांच्या धार्मिक प्रवृत्तीमुळे अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी वडभद्रकाली मंदिरात आम्हा उभयतांच्या हस्ते श्री रामाभिषेक करण्याचा योग आला. त्यानंतर शुक्रवारी त्याच मंदिरात चंडीहोममध्ये आमच्या सौभाग्यवतीला सुमंगली (सवाष्ण) म्हणून हवनास बसवण्यात आले. दिनांक ३१/५/१८ ला श्रीकृष्ण मंदिरात कुंभाभिषेकपूर्व झालेल्या महालक्ष्मी पूजनास बसण्याचा योग आला. दिनांक २/६/१८ ला चतुर्थीच्या दिवशी चायना टाऊन मधील श्री सिध्दीविनायक मंदीरात संकटहर चतुर्थी हवनात आम्ही दोघंही सहभागी झालो.
एक दिवशी विहीणिंबरोबर विवेकानंद सेवा संघ, सिंगापूर व महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेला "भारतीय पारंपरिक खेळ मेळा" पाहण्याचा योग आला. मेळ्यात आपले पारंपरिक खेळ जसे कबड्डी, खोखो, लिंबु रेस, थैला रेस, विटी-दांडू, दोरीवरच्या उड्या पाहून समाधान वाटले व अभिमानही वाटला की आपल्या मातीपासून इतके दूर राहूनही आपण सर्व मराठी लोक आपली संस्कृती आवर्जून जोपासत आहात. मुलगा ज्या वेळी अबुधाबी (दुबई) ला होता तेथेही महाराष्ट्र मंडळ ह्या सर्व गोष्टी खूप चिकाटीने जोपासत आहे हे पाहून आनंद वाटला होता.
शेवटी आपल्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन व असेच एकीने व प्रेमाने आपला संस्कृती व आचार विचार पाळावा ही विनंती व अनेक शुभाषिश.
मराठा तितुका मिळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा