वेगळ्या वाटा

करिअर.. चांगले करिअर.. स्थिर करिअर.. हेच शब्द ऐकत आपण (तरुण पिढी) मोठे होतो, जे आपण खूप उत्तम पद्धतीने समजून घेतो आणि ते बरहुकूम पाळतोही... आणि पावलेही उचलतो. आपल्याला कायम आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा, मुख्यतः आपल्या आई-वडिलांचा मौलिक सल्ला, मार्गदर्शन मिळत असते. आपण आपल्या ध्येयाकडे, करिअरकडे कसे पाहावे, कसे यशस्वी व्हावे या बाबतीत!

म्हणूनच मला या सुंदर विषयाबद्दल लिहिताना सुरुवात करावीशी वाटते ती माझ्या बाबांपासून. माझे बाबा माझ्या या प्रवासात खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी आम्हाला हे शिकवले की आपण आपल्या करिअरवर लक्ष कसे केंद्रित करावे - ज्याला आजकाल मुले म्हणतात focus at your career - आणि आपल्या करिअरचा अभ्यास करून ते समजून कसे घ्यावे हे मी शिकले. 

मी निवडलेले करिअर - जे मी स्वतः माझ्या मनाने वयाच्या १६व्या वर्षीच ठरवले होते - ती खरं तर त्या काळात खूप वेगळी वाट होती.. खरोखर. 

Media - Mass Communication असे ज्याला म्हणतात हे त्या काळी इतके मोठे करिअर नव्हते, जसे ते आज आहे. त्यातून खूप जणांना हे ही माहिती नव्हते की त्या वाटेवर जायचे ते कसे? त्याचं असं झालं.. की मी माझ्या आईबरोबर एका ठिकाणी गेले होते, तेथे मी आईच्या एका मैत्रिणीला भेटले, जिची स्वतःची Advt. Agency होती, आणि तिनं गप्पा मारताना स्वतःच्या कामाचे स्वरूप आणि पद्धत समजावून सांगितली. त्याच क्षणी मी मनात ठरवले कि, मला हेच करायचंय... Mass Media... 

असं म्हटलं जातं की तुम्ही तरुणपणी तुमच्या करीअरबद्दल जे काही ठरवता ते प्रत्यक्षात उतरत नाही किंवा खूप गंभीरपणे घेतलं जात नाही, पण माझ्या बाबतीत अजिबात तसं काही झालं नाही. माझी स्वप्ने, माझ्या करिअरची निवड, mass media या गोष्टींनी माझ्या मनात पक्कं आणि कायमचं घर केलं होतं. त्यामुळे पुढच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहून तुमचं ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, प्रामाणिक प्रयत्न करता आणि शेवटी त्यात यशस्वी होताच.

अशाप्रकारे मी माझे करिअर निवडले आणि दाखल झाले मुंबई युनिव्हर्सिटीच्या - "Bachelors in Mass Media" च्या पहिल्या बॅचमध्ये. होय, माझी त्या कोर्सची पहिली बॅच होती. त्यानंतर entrance exam उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन, मुंबईतील - देशातील - एका प्रथितयश कॉलेज मधून एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यातूनच एका उच्च TV channel मध्ये यशस्वीरीत्या internship केली, आणि मग देशातील अव्वल नंबरच्या channel मध्ये आले. खूप अनुभव मिळाला. २००७ मध्ये लग्न करून सिंगापूरला आले आणि इथेच स्थायिक झाले. हे माझ्या आयुष्यातले एक नवे, वेगळे वळण होते; जिथे मी माझे भारतातले उत्तम करिअर सोडून, स्वप्ननगरी मुंबईमधून इथे आले.

माझ्या मुंबईमधल्या उत्तम करिअरला एक ब्रेक लागल्यासारखं झालं. या नवीन देशात येऊन काही क्षण भांबावले, पण लगेच सावरले, आई-बाबांचे शब्द आठवले.. देवाने माझी प्रार्थना ऐकली, आणि आयुष्याने शेवटी मला हवे तसे वळण घेतले.

पण मग मला अजूनही आठवते, मी २००७ मध्ये जेव्हा या करिअरसाठी चांगल्या संधी शोधत होते, माझ्या असे लक्षात आले की, Singapore media Industry हि भारतातील media industry पेक्षा खूप लहान आहे. एक वेळ अशी आली की, मी खूपच निराश झाले.. माझे media industry मधले करिअर हा माझा प्राण होता, आणि इथे तर.... अक्षरशः एका क्षणी तर मी नाईलाजाने माझे कार्यक्षेत्र बदलण्याचाही विचार केला, म्हणजे IT field किंवा finance field, ज्यासाठी सिंगापूर जगात ओळखलं जातं. मी इंटर्न म्हणूनसुद्धा या क्षेत्रात जाण्याचा विचार केला आणि खरोखर दोन रेझ्युमे बनवले, एक media field साठी आणि एक दुसऱ्या क्षेत्रांसाठी.

मला असं वाटतं की वयाच्या २४व्या वर्षी तुम्ही फक्त आणि फक्त हाच विचार करता की तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळावे, तुमच्यात असलेल्या जबरदस्त क्षमतेमुळे तुम्ही उत्तम काम करून चमकावे आणि जर तसे नाही झाले तर तुम्ही तीच क्षमता, ऊर्जा दुसऱ्या क्षेत्राकडे वळवता, जिथे तुम्हाला संधी मिळते.

तरीही माझ्या इच्छाशक्तीच्या बळावर माझ्या करिअर-निवडीबाबत ठाम राहिले आणि अखेर माझ्या ८ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर MediaCorp साठी कार्यक्रम बनवणाऱ्या एका स्थनिक production house मध्ये associate producer चे काम मिळाले. इथे मी एका अमेरिकन शो (Muay Thai) चे काम हाताळणार होते.

माझ्या लक्षात आले की, मी एका विकसित देशात आले खरी, कामही करते आहे, पण मला माझ्या अनुभव आणि क्षमतेच्या मानाने मोबदला कमी मिळत होता. त्याचे कारण कदाचित सिंगापूर मधील अनुभव कमी असलेली हि industry असेही असेल.. पण मी धीर न खचू देता, माझ्या करिअरवरचे ध्यान ढळू न देता, ठरवले कि मोठे काम करायचे, नाव कमवायचे, या छोट्याश्या बेटावर माणसं जोडून, असे काम करायचे कि लोकांनी तुम्हाला स्वीकारलेच पाहिजे, ओळखलेच पाहिजे, प्रेम दिले पाहिजे.

मला शक्ती मिळाली ती माझ्या आत्मविश्वासामुळे - कि होय, मी उत्तमच आहे आणि उत्तमच करेन. फक्त माझे डोळे अन कान कायम उघडे ठेवून माझ्या आवडत्या क्षेत्रातल्या संधीचे कसे सोने करता येईल, यासाठी सजग राहिले.

शिवाय सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळाच्या नाटकात, इथल्या इतर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला, नवीन माणसे जमवली, जोडली, नवा मित्रपरिवार जोडला, ज्यामुळे माझ्या १६ तासांच्या धावपळीच्या कामाच्या तासांमध्येही माझा कामातला interest वाढण्यास मदत झाली.

आणि माझ्या आयुष्यात ती जादू झाली जेव्हा मी रेडिओच्या क्षेत्रात पाऊल ठेवले; हे ते नव्हते ज्याची मी वाट पहात होते, पण हे ते निश्चित होते ज्याने माझ्या आयुष्याला आणि माझ्या करिअरला एक खूप छान वळण मिळाले.

ही अतिशयोक्ती नाही, खरंच सांगते, मी ज्या वेळी प्रथम (२००८ मध्ये) LIVE ON AIR गेले, त्यावेळी मला जाणवले कि, अरे हेच ते, जे मला करायचे होते. रेडिओच मला खुणावत होता. वेगवेगळ्या पार्श्वभूमींच्या, क्षेत्रातल्या असंख्य अनोळखी लोकांबरोबर बोलणे, विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण करणे, आणि सर्वात महत्वाचे, दिवसभर काम करून, दमूनभागून परत येणाऱ्या हजारो लोकांना तुमच्या बोलण्याने, संगीताने, हलके करून त्यांना आनंदाच्या परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन पोहोचवणे यासारखे दुसरे समाधान नाही. संगीत हा माझ्या आयुष्यातला, कामातला फार महत्वाचा आणि आनंदाचा भाग आहे, जो मला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो.

काम करताना मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला कि प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा उत्तम, आनंद, समाधान देणारा असेल. रेडिओमुळे मला माझ्यातली बोलण्याची आणि इतरांना मोकळे करून बोलते करण्याची कला सादर करण्याची संधी मिळाली, तिचे मी हर एक क्षणी सोनेच करण्याचा प्रयत्न केला.

रेडिओ तुम्हास ही जाणीव करून देतो कि तुम्ही तुमच्या बोलण्याच्या जादूने अनेक अपरिचित लोकांच्या जीवनात काहीतरी बदल घडवून आणला.. अनेकांना एक आनंद दिला..

आणि मला ही जाणीव पुरेपूर मिळाली! सिंगापूर मधल्या १० वर्षांच्या आयुष्यात अनेक आव्हानात्मक, परीक्षा घेणारे प्रसंग आले, अनेक असे लोक भेटले कि ज्यांनी लक्ष ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, खाली खेचण्याचाही प्रयत्न केला.. असे काही असुरक्षिततेची भावना असलेले लोकही भेटले.. पण मी न डगमगता पुढे जात राहिले..

म्हणूनच मला तुम्हा सर्वांना एकच सांगावेसे वाटते कि पूर्ण निष्ठेने तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या करिअरच्या सुरुवातीला जरी तुम्हाला अपेक्षेपेक्षा, क्षमतेपेक्षा कमी मोबदला मिळाला तरी, खूप खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चला, सकारात्मक (positive) लोकांमध्ये रहा.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आयुष्यात प्रत्येकाला खूष करू शकत नाही. आयुष्यात प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या कामामुळे एका माणसाला जरी आनंद दिलात, तरी ते तुमच्यातली स्फूर्ती, ऊर्जा कायम ठेवायला आणि वाढवायला पुरेसे आहे.. ध्येयाकडे पहा, स्वप्ने पहा, ती दूर नाहीत, फक्त काही अंतरावर आहेत. ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व द्या.

माझ्याकडून मी कमीतकमी ३ लोकांना प्रत्येक आठवड्याला भेटून त्यांना स्वप्नपूर्तीबद्दल नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न करते.


- हिमानी काळे कुलकर्णी 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा