आवड

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३

घरच्यांच्या आवडीतच माझी आवड असते 
माझी मी अशी कधीच वेगळी नसते 
लहाणपणी आवडत होती छोटुकली भातुकली 
बाहुलीचे लग्न, मज्जाच अनोखी 

आवडीने करायचो लग्नाचा सोहळा,
समारंभाला बोलावायचो पाहुणे सत्राशे सोळा 
ताई शिवायची तिची डिझायनर साडी 
शिंप्या कडून चिंध्या आणायची जबाबदारी माझी 

करायचो तिचे सोळा शृंगार 
माझेच दागिने घाल सगळ्यांचा हट्ट फार 
मुलीकडचे असून आमचाच तोरा मोठा 
इकडुन तिकडून फिरवत मुरका घ्यायचो खोटा 

ती पण खूप लाजायची नाही 
रडणं खूप दूर मुसमुसायची पण नाही 
तिच्यासारखी कोणी नशीबवान नाहीच 
कारण लग्नानंतर तिची परातबांगडी घरीच 

मंगलाष्टक, वरात, मिरवणूक सोहळा 
पाहिल्या पंगतीत बसायला टॉस चा हिंदोळा 
सोहळा बघण्यात व्हायचे आई बाबा मग्न 
लग्न लागताच होती आईच्या पापण्या चिंब 
तेंव्हा वाटायची आई खूपच हळवी 
नेहमीच कागं तिच्या डोळ्या पाणी येई? 

मोठी झाले तेव्हा गर्भित अर्थ उमगला 
लेक मोठी होत आहे... माझीही तीच अवस्था 

- सुचित्रा खुराना



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा