माझे प्रेरणास्थान

आई-वडील हे आपले सर्वात पहिले गुरु. जगाची ओळख आपल्याला आई-वडिलांमार्फतच होते. आपल्या सर्वांकडेच आई-वडिलांच्या कितीतरी आठवणी असतात तशाच माझ्याजवळही आहेत. पण त्यातल्या काही मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. 

माझे बाबा जिल्हा हिवताप अधिकारी होते. त्यांची नुकतीच अकोल्याला बदली झाली होती. ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्यांनी जीपच्या ड्रायव्हरला ९:४५ वाजता बोलावले होते. ते स्वतः ९:४० पासूनच तयार होऊन येरझाऱ्या घालत होते. ९:४५ला ड्रायव्हर काही आला नाही. बॅग उचलून ते चालायला लागले. त्यांनी जरासुद्धा वाट पहिली नाही. आम्ही सगळे म्हणालो, थोडा वेळ थांबा येत असेल.. पण नाही. ते म्हणाले माझी १० वाजता मिटिंग आहे. मी वेळेवर पोचलो नाही तर जे ८-१० लोक मिटिंगसाठी आले आहेत त्यांचा वेळ वाया जाईल. मला गेलंच पाहिजे. वेळेला फार महत्त्व आहे. बाबा गेले आणि पाचच मिनिटात ड्रायव्हर आला. बाबा गेलेले पाहून ओशाळला आणि त्यांना रस्त्यात गाठून ऑफिसला वेळेवर पोचवले. त्यानंतर मात्र तो ड्रायव्हर कधीही उशिरा आला नाही. वेळेचं महत्त्व, दिलेली वेळ पाळणे, दुसऱ्यांच्या वेळेची कदर करणे ह्या सगळया गोष्टी ह्या एकाच प्रसंगातून शिकायला मिळाल्या.

बाबांची बदली नंतर परभणीला होती. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. बाबा हॉस्पिटलमध्ये भरती होते. दोन दिवस उपचार झाल्यानंतर प्रकृती थोडी बरी होती. मला वाटतं महिनाअखेर होती. ऑफिसची माणसं भेटायला आली. त्यांना बाबा म्हणाले, माझी प्रकृती बरी आहे, मी उजव्या हाताने सह्या करू शकतो, तुम्ही पेपर्स घेऊन या. सह्या झाल्या नाहीत तर उद्या सगळ्यांचा पगार होणार नाही. त्यांनी तश्या अवस्थेत सह्या केल्या. आम्ही सगळे आश्चर्यचकित होऊन बघतच राहिलो. जबाबदारीची जाणीव आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ देऊ नये ह्या दोन गोष्टी ह्या प्रसंगापासून मी शिकले.

सेवानिवृत्तीनंतर बाबांनी पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना ह्या संस्थांसाठी काम केलं. आठवड्यातून एक दिवस हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं. त्यांनी स्वतःचा वेळ नेहमीच चांगल्या कामांसाठी खर्च केला. 

लग्न झालं तेव्हा माझी आई मॅट्रिक पास झाली होती. तिला शिकायची खूप आवड होती. माझा भाऊ ३-४ वर्षांचा असताना तिने नासिक जिल्ह्यातील वणीसारख्या ठिकाणी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन B.A. पूर्ण केलं. १०-१२ वर्षांच्या खंडानंतर शिकणं खरं तर अवघडच. घरातली कामं, आम्ही लहान, बाबांची फिरतीची नोकरी, सगळं सांभाळून ती शिकली याचा मला खूप अभिमान वाटतो. 

तिला गाण्याची पण आवड होती. गाणं शिकायची पण खूप इच्छा होती. मी B.Sc. करत असताना माझ्या मैत्रिणीची आई गाण्याचे क्लासेस घ्यायची. एक दिवस मी आईला त्यांच्याकडे क्लासच्या प्रवेशासाठी घेऊन गेले. काकू म्हणाल्या, “आत्तापर्यंत आईच मुलीला घेऊन आली होती, तू पहिली मुलगी आहेस, जी आईला घेऊन आलीस.” तिने गांधर्व महाविद्यालयाच्या ४ परीक्षा दिल्या. पास झाली. पेटी घेतली. बरीच वर्ष रियाझ केला. स्पॉन्डीलॉसिस झाल्यावर मात्र गाणं बंद पडलं. नंतर तिने भजनी मंडळात जाणं सुरु केलं. त्यांच्या भजनी मंडळाचे T.V. वर देखील कार्यक्रम झाले आहेत.

स्वयंपाक, भरतकाम, शिवणकाम, विणकाम सगळ्यात ती पारंगत आहे. रोज दुपारी काहीतरी काम चालूच असतं. तिला शांत बसून राहिलेलं कधी बघितलंच नाही. ती सतत कामात व्यस्त असते. स्वच्छतेची देखील अतिशय आवड. तिची सौंदर्यदृष्टीही वाखाणण्यासारखी आहे. बेसनाच्या लाडूला काजू, बेदाणा लावताना मुलांसाठी ती हसऱ्या चेहऱ्याच्या (smiley) आकारात लावायची. दारात सुंदर रांगोळी रोज घालायची.
आमच्या आई-बाबांनी एकमेकांना संसारात छान साथ दिली. बाबांनी नेहमीच आईच्या शिकण्याला प्रोत्साहन दिलं. आईने बाबा फिरतीवर असताना उत्तमरित्या घर सांभाळलं. आतादेखील आमच्या दोघांच्याही संसारात ढवळाढवळ न करता ते दोघंचजण त्यांच्या स्वतःच्या घरात नांदेडला राहत आहेत. त्यांचं सहजीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

- माधुरी देशमुख-रावकेकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा