केल्याने होत आहे रे…

भारताबाहेर काही वर्षं काढल्यावर परत भारतातले वास्तव्य सुखकारक वाटत होते. नुकतेच रुळलो होतो की परत deputation साठी US गाठावे लागणार होते. यंदा आई अन् बाबांना पण घेऊन जावे म्हणून त्यांचा पासपोर्ट काढायला पासपोर्ट ऑफिसला गेलो. फॉर्म भरून लाइनीतच उभा होतो तेव्हा अचानक जाणीव झाली की कुणी तरी आपल्याकडे सतत पाहत आहे. नजरेला नजर भिडली तेव्हा चेहेरा ओळखीचा वाटला. लगेच त्याच्याकडून अभिवादन आले. मी थोडा वेळ ही व्यक्ती कोण ह्याचा विचार करत राहिलो. माझा फॉर्म submit करून झाला, लक्ष्यात आलं की तो माझीच वाट पहातोय. मी ऑफिसच्या बाहेर पडणार तेवढ्यात त्याने मला गाठले. पुढे होऊन नमस्कार केला. क्षणात ओळख पटली अन् स्वतःवर विश्वासच बसेना! हा तर आमच्या स्वयंपाकिणीचा नवरा … वाटलं कदाचित हा ड्रायवर असावा कुणाचा तरी … मी त्याची विचारपूस केली तेव्हा बोलता बोलता कळले की तो पण पासपोर्ट काढायला आला आहे. माझं विचारचक्र सुरु झालं अन् शेवटी विचारूनच घेतलं, "काय करता आजकाल आपण?" त्याला माझ्याशी बोलण्यात उत्साह आहे जाणवले आणि त्याने "मिळून कॉफी घेऊ या का?" विचारले. मी पण होकार भरला. 

कॉफी पिता पिता गप्पांतून असे लक्षात आले की आज तो एका मोठ्या कारखान्याचा मालक आहे अन् दुसरा कारखाना सुरु करण्याच्या तयारीत आहे. मी अवाकच झालो. तो बोलू लागला, '' सर, मी तुम्हांला कधीपासून शोधतो आहे. तुमचे आभार मानायचे राहूनच गेले. तुम्ही परदेशी निघून गेलात अन् मी पण माझ्या व्यापात गुंतून गेलो होतो." त्याला माझ्या मनातला गोंधळ कळला असावा. तो बोलू लागला, " सर, माझी बायको ललिता तुमच्याकडे स्वायंपाकला येत असे, त्यावेळेस मॅडम तिच्याकडून मसाले पण तयार करून घेत असत. अजूनही काही ठिकाणी ती स्वयंपाक करत होती तेव्हा … माझे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते. त्यामुळे माझी नोकरी साधारण होती. संसाराला हातभार म्हणून ललिताची मदत होत होती. पण अचानक माझी नोकरी गेली अन् सर्व भार तिच्यावर पडला. पैसा कमी पडू लागला तसे तिची काळजी पाहून मॅडमनी सुचवले की तू इतके चांगले मसाले बनवतेस तर तेच करून विकत का नाहीस? ललिताने माझ्याकडे सहजच बोलून दाखवले… काही दिवस नोकरीची शोधाशोध केली पण यश हाती आले नाही. तेव्हा व्यवसाय करावा डोक्यात आले पण नोकरी नाही अन भांडवल पण नाही. तेव्हा आपण अन मॅडमनीच ललिताला ५०० रुपयांची मदत केली होती. मीच स्वत: रुपये घ्यायला आलो होतो. पुढे २-३ महिन्यातच तुम्ही परदेशी निघून गेलात अन् ललिताचे काम सुटले. 

आम्ही त्या पैश्यातून मसाल्याचे सामान आणले. ललिताने सर्वप्रथम गोडा मसाला तयार केला. माझ्याकडे सायकल होतीच तेव्हा. मी तो मसाला पिशवीत भरत असे अन् दारोदारी जाऊन विकत असे… थोडेसे पैसे जुळत होते अन् लोकांकडून मागणी पण वाढत होती. तेव्हा पाण्यापावसाचा विचार न करता मी मसाले विकू लागलो… मग काही दिवसातच ललिताने पण स्वयंपाकाची कामे सोडली अन् मग गोड्या मसाल्यासोबत काळा मसाला, गरम मसाला तयार करून आम्ही पाकिटातून विकू लागलो. खूप कष्ट झाले पण अंती नफा दिसत होता अन् गिऱ्हाईकांचे समाधान. मागणी बघून आम्हाला पण उत्साह मिळत होता. हळूहळू मागणी वाढायला लागली, ललिता एकटी अपुरी पडायला लागली. मग हाताशी दोन बायका कामाला ठेवल्या. मी पण दुचाकी गाडी घेतली. व्यवसाय वाढत होता. प्रयत्न हाच केला की क्वालिटीमध्ये समझोता करायचा नाही … 

दिवसेंदिवस व्यवसाय वाढतच गेला. आधी घरोघरी मग आठवडी बाजार. मग छोटीशी जागा घेऊन दुकान थाटलं. ललितालापण हाताशी ५-६ बायका मिळाल्या. घरातली जागा अपुरी पडायला लागली म्हणून शहरापासून जरा दूर जागा घेतली. तिथेच छोटासा कारखाना उभा केला. बाजारातील जागा अपुरी पडायला लागली म्हणून मोठी जागा घेऊन दुकान थाटलं. अर्थातच कायद्याच्या चाकोरीत राहून. आज आमच्या कारखान्यात एकूण ३२० लोकं काम करतात अन् दुकानात पण ५६ लोकं काम करतात. मी त्याच्या मुलांची चौकशी केली तेव्हा कळले की मोठा मुलगा US हून MBA करून त्याच्या बरोबर व्यवसाय सांभाळतोय. मुलगी वकील झाली आहे अन् गवर्न्मेण्ट ऑफिसला नोकरी करून व्यवसायासाठी सल्लामसलतपण करते. आता मुलाची इच्छा परदेशात पण मसाले पाठवण्याची आहे. म्हणून माझ्या पासपोर्टची गरज भासली. 

त्यांनी सर्व काही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मी मात्र अवाक झालो होतो. घराचा पत्ता घेऊन ललितासह घरी येण्याचे आश्वासन देऊन तो निघून गेला. मी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताच बसलो … एकेकाळी ज्याला नोकरी नव्हती आज तो कितीतरी जणांना रोजगार देतो आहे, त्याच्यातली जिद्द, कष्टाळू स्वभाव, ईमानदारी, अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यातील माणूसकी! खरंच, त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच… आजच्या पिढीला प्रेरणादायक ठरेल असे मनगटाच्या बळावर निर्माण केलेले त्याचे छोटेसे पण प्रशंसनीय साम्राज्य पाहून मी पण मनोमनी प्रसन्न झालो. 

नंदिनी धाकतोड नागपूरकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा