बालपण

कधी कधी असंही होतं आठवणींच्या दुनियेत हरवून जाणं 
वय मोठं झाल्यावर वाटे, किती सौख्य देऊन संपते बालपण 

बालपणाचा काळ सुखाचा आठवतो मनोमनी 
दिवस ते आता कधी येतील का परतुनी 

नसे कशाची चिंता परि आनंद अविरत असे 
अंगणात खेळता, पळती प्रहर उभ्या दिवसाचे 

दिवस संपता जीवावर येई घरी परतायचे 
सवंगड्यांसवे खेळण्यात गोडी अवीट वाटे 

नव्हता कधी ताप मध्यान्हीच्या उन्हाचा 
सभोवती फुललेला आनंद जीवनाचा 

शेताच्या बांधावर झाडाच्या फांदीवर 
चढून बसणे अन उड्या मारणे 

पारंब्यांचा करून झुला झुलत राहणे 
रानफुलांच्या घमघमाटात स्वतःलाही विसरणे 

कानावर पडता हाक वडिलांची 
फुलपाखरांची पाठ सोडून चोरासारखे घरात शिरणे 

भोवरा-गोट्या, लंगडी-लपंडाव, बुद्धीबळातलं चेकमेट 
बर्फगोळा लिमलेट गोळी आणि रावळगावचे चॉकलेट 

कागदाच्या होड्या आणि पावसात भिजणं 
रोजच कल्पनेच्या दुनियेत जगणं 

निरागस डोळ्यातून बालपण खूप काही बोलतं, मोकळेपणाने गोड हसतं 
कधी अबोल कधी अल्लड, कधी हट्टी कधी खेळकर 
बालपण असंच बाल सुलभ असतं 

विचार येई मनामध्ये - कधी जगलो शेवटचं असं लहान होऊन 
निरागसपणे आणि छोट्या गोष्टीत रमून 

न कळे काळ बदललाय की आपणच पुढे आलोय 
बालपण आपलं हरवून बसलोय 

ठरवलं मी आता लहान होऊन आपणच मागे जायचं 
प्रार्थना करून देवाला आपणच लहान व्हायचं 

पण काय - काळ पुढे सरकतच राही, नसे थांबत एकही क्षण 
वेडं मन समजून जातं - आयुष्यात एकदाच येतं बालपण !

- कल्याणी पाध्येकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा