आठवणीतील एक दिवस

शनिवारी जरा सकाळीच उठलो. सर्व तयारी पटापटा केली. बायकोने केलेल्या चहा आणि नाश्त्यावर मस्तपैकी ताव मारला. आठवड्याचे पाचही दिवस खूप काम केल्यामुळे थोडा थकवा होताच पण आज कुठेतरी भटकायला जायचं आहे ह्या विचाराने आनंदात होतो. शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावामध्ये जायचं ठरलं होतं. थोड्याच वेळात शहराचं प्रदूषण, गर्मी आणि माणसांनी गच्च भरलेले रस्ते ओलांडून शहराबाहेरचा प्रवास सुरु झाला. आज आसमंत नीळ दिसत होतं. दोन्ही बाजूंनी डोलणारी झाडे आम्हाला रस्ता मोकळा करून देत होती जणू. स्वच्छ हवेचा स्पर्श मन ओलेचिंब करत होता.  

काही क्षणातच आम्हाला गावाच्या वेशीवर आमच्या स्वागतासाठी सज्ज असलेली एक कमान दिसली. त्यावर ‘समस्त गावकरी आपले स्वागत करीत आहेत’ हे वाचून आपलेपणा जाणवला. आत शिरल्यावर चहू बाजूने शेतीच शेती होती. निसर्गाने चोहीकडे हिरवा गालीचा पसरवलेला आहे याचा भास होत होता. लगेचच एक शंकराचं भलं मोठ्ठ  मंदिर लागलं. बाहेर नंदी पहारा देत होता. आतील गाभारा अति थंड आणि वातावरण मनाला सुखावणारं! दर्शन घेऊन बाहेर पडल्या पडल्या आमची नजर बाजूला असलेल्या तलावावर पडली. गावकरी काठावर बसून मस्तपैकी मासे पकडत होते. शेती सांभाळता सांभाळता मासेमारी करणे हा त्यांचा छंदच होता म्हणे. आम्हीही त्या नयनरम्य ठिकाणी बसून क्षणभर विश्रांती घेतली. आठवडाभर जो थकवा होता तो आता पार नाहीसा झाला.

थोड्या वेळाने गावाच्या मागच्या दिशेला असलेल्या कृषी पर्यटन केंद्रात गेलो. तिथल्या लोकांनी हसून आमचे स्वागत केले आणि शीतपेय सुद्धा दिले! प्रवेशद्वाराजवळ मोठे हत्तीचे पुतळे लक्ष वेधून घेत होते. आतील परिसर हा एक छोटेखानी गावच असल्यागत भासत होते. जागोजागी बांबूच्या झोपड्या होत्या. त्यात लोकं निवांत आराम करत बसलेले दिसत होते. लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर पर्याय.. जसे झुला, घसरगुंडी इत्यादी होते. मुले मनसोक्त खेळण्यात गुंतलेले होते. त्याच्या मागच्या बाजूला उंट, जिराफ, बैल असे मातीचे प्राणी ठेवले होते. काही हौशी लोकं तिथे उभे राहून फोटो काढण्यात गुंग होते. मोठी माणसे लहान मुलांबरोबर दंगा-मस्ती करत होती. थोडा वेळ आम्हीही त्यांच्यासोबत खेळलो. आता आम्हाला जोरात भुका लागल्या  म्हणून आम्ही सरळ जेवायला बसलो. सुग्रास महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंदच वेगळाच! पोटभर जेवणानंतर तिथे असलेल्या कॉटेज मध्ये आराम केला. पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्हाला काही तासातच जाग आली. थकवा होता पण परिसर पूर्ण फिरून घ्यावा म्हणून आम्ही मागच्या दिशेला फेरफटका मारला. मागे प्रांगणात आंब्याची आणि चिंचेची झाडे दिमाखात उभी होती. एका मोठ्या काठीने चिंचा आणि आंबे पाडून खाण्याचा आनंद औरच! मध्यभागी बैलगाडी आणि ट्रॅक्टर ठेवलेले होते. विरंगुळा म्हणून आम्ही सुद्धा बैलगाडीने पूर्ण परिसर पिंजून काढला. शहरीकरणामुळे आणि तांत्रिक युगामुळे मातीचा विसर लोकांना झाला आहे खरा पण या अश्या संकल्पनेतून मुलांना परत गावाची ओढ लागते. 

संध्याकाळ होत होती म्हणून आम्ही घरी जायला निघालो तर वाटेत मोर पिसारा फुलवून आम्हाला निरोप द्यायला तयार होते. निसर्गाच्या सहवासात घालवलेला हा एक अविस्मरणीय दिवस होता. अशीच करमणूक सतत् सर्वांना लाभो !!!!

                                                                                                                                  - प्रफुल्ल मुक्कावार















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा