भीती/ फॅशनची भीती

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

भीती

भीती म्हटले की नेहमी वाईट गोष्टीबद्दलच असे वाटते, पण तसे नसते. चांगल्या गोष्टीबद्दल पण भीती वाटू शकते.

बंड्या एक साधा सरळ माणूस. नेहमी नोकरीवर जाणे व जी काय कमाई असेल त्यात बायकोमुलांची काळजी घेणे, त्याला एवढेच ठाऊक होते. उधार-उसनवारी, लांडीलबाडी त्याला कधीच जमत नसे. त्याने बायको मागे लागली, म्हणून एक लॉटरीचे तिकीट काढले व देवाच्या फोटोमागे ठेवून दिले; पण निकालाच्या दिवशी तिकिटाचा नंबर आला आहे का, हे लगेच बघायची त्याला अजिबात घाई नव्हती. कारण अजूनपर्यंत कसले बक्षीस मिळणे किंवा १०० रुपयाची पण लॉटरी लागणे बंड्याच्या नशिबात नव्हते.

अचानक बायको पेपर नाचवत आली की तिकिटाचा नंबर काय आहे. कंटाळतच बंड्याने तिकीट बायकोच्या हातात दिले. बायकोने कुतूहल म्हणून पाहिले व पुन्हापुन्हा डोळे ताणून लॉटरीचा रिझल्ट बघून खात्री करून घेतली की त्यांना १० कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. तिला तर एवढा आनंद झाला की नवऱ्याला ही शुभ वार्ता देण्यासाठी अतिआनंदाने तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. ही काहीच का बोलत नाही, म्हणून बंड्याने तिच्या हातातले वर्तमानपत्र व लॉटरीचे तिकीट घेतले व नाखुशीनेच लॉटरीचा निकाल पाहिला. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना की १० कोटीचे पहिले बक्षीस त्यांनाच मिळाले होते. क्षणभर त्याची अवस्था पण त्याच्या बायकोसारखीच झाली...दोघेही एकमेकांना आनंदातिशयाने बघत होते, पण तो आनंद कोणत्या शब्दात व्यक्त करावा, हेच दोघांनाही सुचत नव्हते, कारण ज्याची त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती, अशी गोष्ट घडली होती. जेव्हा लॉटरीचे तिकीट काढले, त्या वेळी तो आपल्या एका जिवलग मित्राला बोलला होता, कारण त्या मित्राला लॉटरीचे तिकीट खरेदी करायची खूप आवड होती, तो एकतरी तिकीट दर महिन्यात काढत असे, पण त्यालाही विशेष अशी लॉटरी कधी लागली नव्हती व बंड्या ह्या बाबतीत किती अनुत्साही आहे, हे त्याला माहिती होते, म्हणून त्या मित्राने बंड्याच्या तिकिटाचा नंबर स्वतःकडे लिहून ठेवला होता. 



खरे तर एवढी मोठी लॉटरी लागली, ही किती आनंदाची गोष्ट, पण आता सर्वांना आपल्याकडे एवढे पैसे आहेत हे कळणार, मग पैशासाठी कोणीही खून करायला पण मागेपुढे पाहणार नाही, ह्या विचारांनी बंड्याची झोप उडाली. रात्ररात्र डोळ्याला डोळा म्हणून लागेना. एव्हाना सर्वांना कळले होते की बंड्याला १० कोटीची लॉटरी लागली आहे. सगळीकडून अभिनंदनाचे फोन येत होते, ते स्वीकारण्यात त्याचा आराम हराम झाला होता. रात्रीची शांत झोप लागणे पण मुश्किल झाले होते. ४-५ वेळा तरी पुनःपुन्हा रात्री दरवाजा बरोबर लॉक केला आहे ना, चुकून खिडकी तर उघडी राहिली नाही ना, ह्याची स्वतः खात्री करत असे. बायकोला पण सांगून ठेवले, 'कोणाचा फोन आला तर उचलू नको’, कारण बायको काय बोलेल, ह्यावर त्याचा भरंवसा नव्हता. तिला खोटे बोलणे माहिती नव्हते, सर्वांना सांगून टाकेल की ‘पैसे कुठे ठेवले आहेत’. त्याची मुले लहान होती, ती कोणाला तरी सांगतील, 'आमच्या बाबांना भरपूर पैसे मिळाले, ते कुठे ठेवले आहेत’, म्हणून त्याने मुलांना पण घरात कोंडून ठेवले होते. त्यांना शाळेत किंवा दुसऱ्या मुलांसोबत खेळायला पाठवायला पण घाबरत होता की कोणीतरी किडनॅप करेल व पैशाची मागणी करेल व त्यांच्या जीवावर बेतेल. एवढ्या पैशाचे काय करायचे, हे ठरविण्याएवढा शांत वेळ मिळणे, त्याला मुश्किल झाले होते. दरवाजाची बेल वाजली की तो स्वतःच दार उघडायला जात असे व कोण आहे त्याची खात्री झाल्याशिवाय दार उघडत नसे. ह्यासाठी त्याने मुले, बायको कोणालाही दार उघडायला बंदी केली होती. स्वतः सुद्धा नोकरीवर जाण्याचे बंद केले होते की न जाणो कोणीतरी गरजू आपल्याकडे पैसे मागेल तर काही कारण पण सांगू शकणार नाही. पैसे बँकेत भरायला जायला पण त्याला भीती वाटत होती की बँकेतल्या लोकांना कळेल आपल्याकडे किती पैसे आहेत. 

शेवटी त्याने निर्णय घेतला की भारतात शांतीने राहणे मुश्किल आहे, त्यापेक्षा सिंगापूर सारख्या सुरक्षित शहरात जाऊ की जिकडे चोरी, खून ह्यांची भीती नाही. कधीतरी परदेश वारी करायची, ह्या विचाराने त्याने सर्वांचे पासपोर्ट्स काढून ठेवले होते, पण अचानक गाशा गुंडाळून परदेशात राहायला जाण्याचे काय कारण सांगायचे, हे त्याला समजेना. नोकरीचे कारण सांगावे तर तसे काही नव्हते. पण तो ऐकून होता की सिंगापूरला राहणीमान खूपच महाग आहे, शेवटी २ मुलांचे शिक्षण करणे, त्यांना आपल्या पायावर उभे करणे, त्यांची लग्नकार्ये करणे ह्याला हे पैसे कितपत पुरे पडणार, परदेशी राहून तिथल्या खर्चात हे करणे शक्य नाही, कधीतरी नोकरी ही करावीच लागेल. सिंगापूरला जाऊन नवीन नोकरी शोधण्यापासून सुरुवात होती. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळविणे हे सुद्धा कितपत जमेल, काहीच कल्पना नव्हती. भारतात मुलांच्या चांगल्या शाळेतून दाखला घेणे, त्याच्या नोकरीच्या ठिकाणी आधीच राजीनामा देणे, हेसुद्धा जबाबदारीचे काम होते, नाहीतर 'आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखे होईल’, त्यापेक्षा जे काय होईल ते आपल्याच देशात होऊ दे, असा विचार करून त्याने मुलांचे शिक्षण, त्यांचे भवितव्य ह्यासाठी लागणारे व आपल्या जरूरीपुरते पैसे बँकमध्ये ठेवून थोडे पैसे तिकडच्या अनाथाश्रमाला दान देण्याचा निर्णय घेतला, निदान रात्रीची शांत झोप तरी लागेल व काहीतरी सत्कार्य केल्याचे समाधान तरी मिळेल.

--------------------------------------------------------------------------

फॅशनची भीती

शांताबाई एक साधी गृहिणी. मोठ्या केसाची नेहमी एक वेणी घातली, साडी नेसली, तोंडावरून हलकासा पावडरचा हात फिरवला, कपाळावर गंध लावले कि झाले. त्यांनी विशेष कधी मेकअप वगैरे केला नव्हता. साधी लिपस्टिक लावणे म्हणजे फार काहीतरी वेगळे करणे, असे त्यांना वाटे. नेहमी घर आवरणे, छानछान पदार्थ करून नवरा-मुलांना खाऊ घालणे, ह्यातच त्यांना मोठी धन्यता वाटे. बाबा ऑफिसला जातात म्हणून मुलांना संध्याकाळी खाली जवळपास फिरवून आणणे, हे काम मात्र त्या चोखपणे करत. त्या निमित्ताने त्यांना सुद्धा जरा मोकळ्या हवेवर फिरल्याचे समाधान वाटे. जोपर्यंत मुले लहान होती तोपर्यंत सर्व व्यवस्थित चालू होते. पण जसजशी मुले मोठी होऊ लागली तसतसे त्यांना इतर बायकांच्या तुलनेत आपली आई एकदमच साधी वाटू लागली. बाकी मुलांच्या आया कशा केस वगैरे कापून छान सेट केलेले, मोठ्या गळ्याचे स्लिव्हलेस ड्रेस, कानात मॅचिंग इअरिंग्स, हातात नाजुक एखादी बांगडी नाहीतर ब्रेसलेट, गळ्यात नाजुक छोटेसे मंगळसूत्र किंवा चेन, उंच टाचांच्या सँडल्स, कोरलेल्या भुवया, ओठावर लिपस्टिक पाहून त्यांना आपल्या आईनेही असेच राहावे, असे वाटू लागले. मुलगी तर मागेच लागली, ‘आई तू पार्लर मध्ये जाऊन तुझे केस कापून छोटे व छान रंगाने हायलाईट करून घे, एवढे मोठे गंध न लावता छोटीशी टिकली लाव, मस्त फेशियल करून, आय ब्रोज करून घे, हातात एवढ्या बांगड्या घालायची जरुरी नाही, हवी तर एकच घाल, नाहीतर घालूच नकोस. हे असे सोन्याचे
मोठे मंगळसूत्र नको घालूस, ओल्ड फॅशन्ड वाटते, नाही घातलेस तरी चालेल, तुला हवेच आहे तर छोटेसे बनवून घे, साडी नको नेसू, माझ्या मैत्रिणींच्या आया कशा छानछान ड्रेस घालतात, शर्ट पँट्स घालतात, तसे घाल.’ सर्व ऐकून शांताबाईना भोवळ यायची बाकी राहिली होती.

आपल्या मुलांना आपण ह्या हातानी खाऊपिऊ घालून मोठे केले, स्वतःची हौसमौज बाजूला ठेऊन प्रथम त्यांचे लाड पुरविले व आता त्यांना आपल्या सोबत चालायची पण लाज वाटते, का तर म्हणे त्यांची आई एक गांवढळ बाई आहे. शेवटी त्यांनी विचार केला कि, आपणही फार नाही तरी थोडासा बदल केला पाहिजे, मुलांच्या मनासारखे थोडे केले तर बिघडले कुठे. त्यांनाही आपली आई मॉडर्न असावी, असे वाटत असेल. म्हणून त्या मुलीला विश्वासात घेऊन बोलल्या कि, ‘तुम्हाला आई छान दिसावी असे वाटते आहे ना, मग चल माझ्यासोबत, पण मी पार्लरमध्ये एकटी नाही जाणार’, कारण त्या एकदा त्यांच्या मैत्रिणीसोबत पार्लर मध्ये गेल्या होत्या तेव्हा त्यांनी पूर्ण हात-पाय वॅक्सिन्ग करून घेताना पाहिले होते व त्यांना वाटले होते की पार्लर मध्ये गेले की असेच करून घ्यावे लागत असावे. मुलीने समजूत काढली, ‘तू गेलीस की तू जे सांगशील तेच करणार, जबरदस्तीने कोणीच काही करणार नाही’. एक दिवशी मुलगी आईला घेऊन गेली पार्लर मध्ये व आईला फेशियल, आय ब्रोज व हेअर कट कसा असावा, ते मुलीनेच सांगितले. पार्लर मध्ये गेल्यावर तिकडचे एकंदर वातावरण, मोठमोठे आरसे, वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या खुर्च्या, केसाला रंग लावला की धुण्यासाठी छोटेस वॉश बेसिन, लागलेले मंद संगीत सर्व बघून शांताबाईना एकदम छान वाटत होते. पहिल्यांदाच आय ब्रोज साठी बसल्या तेव्हा त्यांना वाटत होते की ही बाई आता माझ्या सर्व भुवया उपटून सपाट करून टाकेल की काय, प्रत्येक केस उपटताना जोरजोरात ओरडत होत्या, कारण आधी कधी केलेच नव्हते. सारखे पुरे पुरे चालले होते.

मुलीला सारखी आईची समजूत काढावी लागत होती, 'आई घाबरू नकोस, तुझ्या सर्व भुवया नाही काढणार, फक्त आहे त्यांना तुझ्या चेहऱ्याला शोभेल असा आकार देणार'. नंतर फेशियल साठी त्यांना ऍप्रन घालायला सांगितला, पण त्या घालायला तयारच होईनात, तेव्हा मुलीनेच समजूत काढली. फेशियल चालू असताना ही बाई कायकाय फासते आहे, माझ्या चेहेऱ्याची वाट तर लावून नाही न ठेवणार, म्हणून त्यांची घाबरगुंडी उडाली होती. नंतर केस कापायला बसवले तर माझे सगळे केस कापून तर नाही न टाकणार, म्हणून धाकधूक होत होती. मग सर्व झाल्यावर मुलीला वाटले, पहिल्या खेपेत एवढे पुरे आहे, केस हायलाईट वगैरे नंतर बघू. आधी आई एवढे करून घ्यायला तरी तयार झाली, म्हणून तिला कौतुक वाटत होते. नंतर निघतांना पैसे द्यायच्या वेळी शांताबाईना किती पैसे उगीच फुकट गेले, काही गरज होती का ह्या सर्वाची, म्हणून रुखरुख लागली होती. पार्लर मधून बाहेर पडायलाच त्यांना भीती वाटत होती. उगीचच माणसे आपल्याकडेच बघत आहेत का, की ही बाई नेहमी कशी असते, आज हिच्या कानात काय वारा भरला, 'म्हाताऱ्या बैलाला घुंगुरवाळा' म्हणून आपल्याला आजूबाजूच्या बायका हसतील, म्हणून त्यांना घरी जाऊच नये, असे वाटत होते व मुलीला आपल्या आई सोबत चालायला आज खूपच छान वाटत होते. संध्याकाळी मुलांचे बाबा ऑफिसमधून आल्यावर काय म्हणतील, त्यांना हे सर्व आवडेल का, म्हणून त्या फार घाबरत होत्या. पण जसजसे त्यांचे घर जवळ येऊ लागले, तसतशी सर्व माणसे आपापल्या उद्योगात मग्न आहेत, कोणाचे कोणाकडे एवढे विशेष लक्ष नाही, हे बघून त्यांना बरे वाटले व मुलांच्या बाबांना पण बायकोमध्ये झालेला बदल बघून आपणच स्वतः तरुण झाल्यासारखे वाटत होते. शेवटी शांताबाईना आपण उगीचच इतके दिवस घाबरत होतो, असे वाटले व आपल्या मुलीबद्दल कौतुक वाटू लागले.

- प्रतिमा जोशी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा