मलाच मी नव्याने कळले

मुलगी म्हणून बालपणी मुक्तछंद बागडले
मोठ्या कुटुंबात अगदी लाडाकोडात मी वाढले।।
आईवडिलांचा धाक, काैतुकाची थाप मिळणारे प्रसंगही घडले
आणि काळजीपोटी त्यांचे अनेकदा धपाटेही खाल्ले।।
नवजात फुलाला पाकळीरुपी जणू अंकुरच फुटले
आयुष्यात अश्या एका वळणावर मुलगी म्हणून मला माझे नाते उलगडले।।१।।

लहान भावंड येताच घरात ताई मी झाले
लुटूपुटूची भांडणे आणि चुका पोटात घेऊन त्यांना नेहमीच सावरले।।
कितीही मोठे झालो तरी नात्यातला ओलावा आणि चिरंतन प्रेम तसेच टिकले
असे बहीण भावाचे नाते आमचे शब्दांच्या पलिकडले।।
देठाच्या आधाराशिवाय फूल कधी उमलूच नसते शकले
अश्याच एका वळणावर बहीण म्हणून मला माझे नाते उलगडले।।२।।

शाळेत असताना डबा आणि कॉलेजच्या कॅंन्टिनचे चहा वडापाव वाटून खाल्ले
खाचखळग्याच्या प्रत्येक टप्प्यावर ब-यावाईटाच्या फरकाचे मोलाचे मिळाले सल्ले।।
धमाल मस्ती मधली ही वेगळीच दुनियादारी जगले
इतक्या सुंदर मैत्रीशिवाय हे आयुष्य कदाचित अपूर्णच असते राहिले।।
पाकळीला पाकळीची साथ मिळून जसे हळुवार फूल उमलू लागले
अश्याच एका वळणावर मैत्रीण म्हणून मला माझे नाते उलगडले।।३।।

प्रेयसीची होऊन मी बायको घराचे मापटे ओलांडले
नव्या नात्याची झालर लावून सुखी संसारात रमले ।।
रूसवे-फुगवे, चढ-उतार ,तसेच अनेक सुखः-दुःखाचे क्षण एकत्र आम्ही पाहिले
पण या आंबट-गोड अनुभवातून नवरा-बायकोच्या नात्याचे गुपित उमगले।।
ऊन-पावसाच्या खेळानंतर जसे प्रेमाचे रंग पसरले
अश्याच एका वळणावर पत्नी म्हणून मला माझे नाते उलगडले।।४।।

मातृत्वाची चाहूल लागताच अक्षरशः गहिवरले
बाळंतपणाच्या कळांनंतर आई होताना पुन्हा एकदा जन्मले।।
चिऊ-काऊचे घास ,उंच उंच झोक्याचा ध्यास , आणि बडबडगीत कानी पडले
पिल्लांसोबत खरंच माझे बालपण मी पुन्हा एकदा अनुभवले।।
जशी कळीची पाकळी अन् पाकळी उमलून सुंदर फूल बहरते
अश्याच एका वळणावर आई म्हणून मला माझे नाते उलगडले।।५।।

प्रत्येक टप्प्यावरच्या नात्याकडे जेव्हा मी डोकावून पाहिले
मला माझ्यातल्या वेगवेगळ्या भूमिकांचे जणू प्रतिबिंबच दिसले ।।
इतका नात्यांचा साज घालण्याचे सुख बहुदा स्त्रीलाच असावे लाभले
स्त्री म्हणून माझी ओळख सांगताना अगदी धन्यच मी पावले।।
आयुष्यरुपी फूल पाकळीगणिक उमलताना स्वत्व विसरून खुलले
तसे प्रत्येक वळणावर स्त्री म्हणून मला माझे नवे नाते उलगडले।।६।।

-अमृता महेश कुलकणीॅ.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा