नवीन वर्षाचे स्वागत

नवीन वर्षाचे स्वागत करिता
प्रसन्न मन झाले 
आशाआकांक्षा पुलकित होऊनी 
निराशेचे फूल गळून गेले 

मनी साठवूनी ठेवीत होते 
यशांचे दीप 
प्रयत्नांची घेत असे 
गरुड झेप 

वर्ष संपले राहुनि गेले 
फुलांचे वास 
विणता विणता राहुनि गेले 
आशेचे श्वास 

रवी उदया नित्य येतसे 
उत्साह देई मनाला 
जुने जाऊनी नवे येतसे 
नवचैतन्य जगण्याला 

जुने वर्ष दडुनी जाई 
काळाच्या मागे 
आठवणींचे गोंडस बालक 
मम हृदयी नाचे 

अळवाच्या पानावरती 
आठवणींचे दवबिंदू राहती 
मनामनाच्या अपेक्षांना 
अर्धविराम देती

नका नका हो जाळू 
पुतळा पुरातन वर्षाचा 
त्यात साठविला आहे 
पूर सुखदु:खाचा 

पुरे होईल स्वप्न साजिरे 
नववर्षी अपुले
आकाशातून उजेड येईल 
प्रयत्न असो चांगलेअनुराधा रेगे