संपादकीय


नमस्कार!
गणरायाच्या भेटीनंतर ऋतुगंधचा सृजनाब्द हा वर्षा विशेषांक प्रसिद्ध करत आहोत.

तीव्र उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाने सकल सृष्टी हिरवीगार होऊन सुखावते. अशा प्रत्यक्ष उन्हाळ्याने वा संकटांच्या, कष्टांच्या तापाने त्रस्त झाल्यानंतर पावसाच्या किंवा साफल्याच्या धारांनी सुखावलेल्या आयुष्याबद्दल हा अंक आहे. अशा अनुभवांच्या कथा-कविता-लेखांबरोबरच दोन नवी सदरे ह्या अंकापासून सुरू करत आहोत.

हिंदी चित्रपटांचा आढावा घेणारे जुईली वाळिंबे यांचे “सिनेसफर” हे सदर ह्या अंकापासून प्रत्येक अंकात आपल्याला घेऊन सिनेजगताच्या वेगवेगळ्या भागांची सफर घडवणार आहे. ह्या अंकात मध्यमवर्गीय नायकांच्या मध्यममार्गी सिनेमाच्या सफरीवर आपण जाणार आहोत.

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर “कवी शब्दांचे ईश्वर” नावाची मालिका प्रदर्शित झाली होती हे आपल्यापैकी काहींना आठवत असेल. सौ. माधवी वैद्य यांनी आपल्या चमूसह अथक प्रयत्नांनी बनवलेली ही मालिका बरीच गाजली होती. १३ भागांच्या ह्या मालिकेत १३ वेगवेगळ्या कविंच्या मुलाखती त्यांच्या घरी जाऊन घेतल्या गेल्या होत्या व त्यांच्या कवितेविषयी दस्तुरखुद्द कविंनी आपले मन मोकळे केले होते. ती मालिका बनवताना काय काय अनुभव आले त्यावर माधवीजींनी पुस्तक लिहिण्याचा प्रण केला आहे. ह्या प्रस्तावित पुस्तकाचा काही भाग “कवी शब्दांचे ईश्वर साकारताना” या सदरात प्रसिद्ध केला जाईल. अत्यंत वाचनीय असे हे अनुभव असतील यात शंका नाही. पावसाच्या शिडकाव्याने व गणरायाच्या भेटीने आलेल्या प्रसन्नतेत ऋतुगंधच्या ह्या अंकाने भरच पडेल अशी आशा आहे.

पावसाच्या व गणनायकच्या भेटीने आलेली प्रसन्नता असली तरी मायदेशी केरळ, नागालॅंड व इतर काही राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ह्या प्रसन्नतेच्या काळवंडलेल्या किनारीची दखल घ्यायला हवी असे वाटते. हवामान बदलामुळे अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत आणि पुढे येणाऱ्या काळाची चुणूक दाखवत आहेत. ह्या अतिवृष्टीत बळी पडलेल्या देशबांधवांना श्रद्धांजली वाहून व अशा संकटांचे निवारण करण्याचे साकडे गणरायाला घालून हा अंक सप्रेम सादर करत आहोत.

सस्नेह
- ऋतुगंध समिती २०१८-१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा