एक नाजूक कळी

एक नाजूक कळी, बागेत एकटीच नांदायची
सख्यांची आठवण काढत, ती सतत रडायची
सोडून गेल्या सर्व तिला, वाट न पाहिली उमलायची
दुःख व रागाची भावना, सदा तिच्या सोबत राहायची...

बघता-बघता मोठी झाली, झालं फूल एक सुंदर
पण चेहऱ्यावर न दिसला आनंद, नाही आवडले तिला हे रूपांतर
रुसून बसलेल्या ह्या फुलाची हरवली ती मोहर
धरून ठेवलेल्या जुन्या आठवणींनी आजच्या सुखाला केले छूमंतर...

आता वाटू लागली भीति, त्या हळ्व्या मनाला
कीट-पतंग त्रास देतील त्याच्या छोट्या पाकळ्यांना
हे भय डोक्यात ठेऊन येऊ न दिले पाखरांना
फुलाचे रूप बघवले नाही माती व आकाशाला...

खूप प्रयत्न केले त्यांनी, खूप वेळा समजावले
कालचं दुःख, उद्याची चिंता - व्यर्थ आहे सांगितले
कोमेजून गेलेले फूल, पुन्हा उमलू न शकले
आयुष्याचे सर्व सुख स्वत:पासून हिरावून घेतले...

आता खूप उशीर झाला आहे, फूलाला कळून चुकले
ना आनंद, ना शांती, त्याने रडत-रडत डोळे मिटले...


अनुष्का कुलकर्णी