ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २
ही गोष्ट आहे पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची. त्यावेळी माझ्या बाबांची बदली रत्नागिरीला झाली होती. दर दोन ते तीन वर्षांनी बाबांची बदली व्हायची आणि आम्ही विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या म्हणीप्रमाणे सगळा बाडबिस्तरा घेऊन नवीन वाटेने चालू लागत असू.
दरवेळी नवीन वाट, नवीन मुक्काम. तोही दोन ते तीन वर्षांपुरता. म्हणजे शब्दार्थाने काय किंवा लक्षार्थाने 'मुक्काम ' कायमचा असा नाहीच. मग या चिमुकल्या वास्तव्यात अनेक व्यक्ती (आणि वल्ली) यांची गाठ पडायची. काही माणसे त्यांच्या चांगुलपणाने आजतागायत हृदयात घर करून राहिली आहेत, तर काही माणसे त्यांच्या वेडगळ स्वभावामुळे आणि विचित्रपणाने विसरली गेली नाहीत. काहीजण मात्र अगदी साधारण, तुमच्या आमच्यासारखेच असूनही त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाने माझ्यासाठी कायमच प्रेरणादायक आहेत.
या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती पाहून
ऋतू येती ,ऋतू जाती
वाटा बदलती
बदलली जगरहाटी
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती
अशी काहीशी कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे माझी मनःस्थिती होते खरी!
तर ही गोष्ट आहे कुसुम मावशींची! रत्नागिरीला आम्ही गेल्यावर थोड्याच दिवसात, पाच मिनिटांवर असणारं, लालभडक फुललेल्या गुलमोहराखालचं टुमदार घर म्हणजे कुसुम मावशींचं हे कळलं. एके दिवशी शाळेतून आले तर स्वयंपाकघरातून आईशी कोणीतरी बाई बोलत असल्याचा आवाज आला. मी दप्तर जागेवर ठेवून, हातपाय धुवून कपडे बदलून आले तरी त्या बाई बसल्या होत्या. छोटासा अंबाडा, भलंमोठं कुंकू, ते ल्यालेलं रुंद गोरं कपाळ, गळाभरून दागिने, हातात गोठ, पाटल्या, काचेच्या बांगड्या आणि प्रिंटेड साडी. मला बघून, "अरे वा! हा तर लाल गुलाब फुललाय तुमच्या घरी!" त्या हसून म्हणाल्या. मला लाजल्यासारखे झाले.
"आगोबाई, हा गुलाब आणखीनच लाल झाला लाजून!" त्या मोठ्याने म्हणाल्या. मला काय म्हणावे कळेना. कुणीतरी बाई पहिल्याच भेटीत माझी एवढी स्तुती करीत होती. "तुला चुंदा आवडतो का ग कैरीचा? थोडासा आणलाय तुला चाखायला."
"हो. खूपच." मी तात्काळ उत्तरले आणि माझ्या या अधीरपणाने पुन्हा लाजले. त्यानंतर आमच्या घरी कुसुम मावशींनी बनवलेले अतिशय रुचकर, कैरीचे, मिरचीचे लोणचे, आवळ्याचे सरबत, कोकम सरबत असे खास कोकणात घरोघरी बनवले जाणारे पदार्थ येऊ लागले. कुसुम मावशींना स्वयंपाक आणि अनेक पदार्थ करायची फारच आवड होती. (पुढे पडत्या काळात त्यांची ही आवड त्यांच्या कामी आली.) त्या अतिशय प्रेमळ होत्या आणि त्यांचा हात सढळ होता याची आम्हाला लवकरच खात्री झाली. गावात कोणाच्याही मदतीला त्या पुढे असायच्या. नवीन ठिकाणी आम्ही स्थिर होईपर्यंत जी मदत लागली ती सर्व काही त्यांनी अगदी आपुलकीने देऊ केली, मोबदल्यात कसलीही अपेक्षा न ठेवता! आई घरी दिसली नाही कि समजायचे आज कुसुम मावशींकडे पापडाचा, कुरडयांचा बेत आहे. किंवा कुठेतरी प्रवचन, सत्संग आहे.
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघंही माझ्याच शाळेत शिकत होती. मुलाची नाव अभ्यासात जेमतेम
तरत चालली होती. मुलगी हुशार होती. आमचे घर खूप प्रशस्त होते. कुसुम मावशी त्यांच्या मनीषाला माझ्या बरोबर अभ्यास करायला पाठवत. परंतु तिचीही प्रगती ठीकच म्हणायची. कुसुम मावशींनी "आमच्या मनीषाला शिकव गं गणित" म्हणून माझ्या मागे लकडा लावला म्हणून त्यांच्यासाठी मी तिला गणित शिकवण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आणि लागोपाठ दोन वर्षे मनीषाला गणितात वीस पंचवीस गुणांनी बढती मिळाली. मावशी खूष झाल्या. त्यावर्षी त्यांनी स्वतः बनवलेले पेढे आणून माझ्या तोंडात कोंबले आणि मला जवळ घेऊन मनापासून आशीर्वाद दिला.
तो आनंदाचा क्षण मी कधीच विसरणार नाही कारण त्यानंतर एका वर्षातच मावशींच्या आयुष्यात सुखाने कायमची पाठ फिरवली. त्यांच्या घराचे वासे फिरले कि काय म्हणतात तसे झाले. मावशींचे यजमान ज्या कारखान्यात काम करीत ते युनिट कायमचे बंद पडले. घरातला मुख्य कमवता माणूस असा अचानक घरी बसल्यामुळे मावशींच्या घरावर काय आपत्ती कोसळली असेल ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्या काळात दुर्देवाने बँकेत पैसे ठेवणे, गुंतवणूक करणे अशा गोष्टी लोक करत नसत. अशावेळी मावशींचे दागिने एकेक करून घराचा डोलारा सांभाळायला उपयोगी पडले. कुसुम मावशींनी पापड, लोणची, सरबते करून विकायला सुरुवात केली. माझी आई मुद्दामहून मग त्यांना थोडीफार पैशाची मदत व्हावी म्हणून जास्तीची ऑर्डर देऊ लागली.
हौस म्हणून पदार्थ करणे वेगळे आणि अत्यंत गरज असताना पैसे कमावण्यासाठी पदार्थांची ऑर्डर घेणे वेगळे. ते दिसते तेवढे सोपे नव्हते. त्या काळात घरोघरी फोन नव्हते, मोबाईलची तर गोष्टच सोडा. सुरुवातीला त्यांना लोकांकडे जाऊन ऑर्डर घ्यावी लागे. माल आणणे, पोचवणे, अशी सगळी कामे त्यांनाच करावी लागत. महिन्याभरात त्या निम्म्या दिसायला लागल्या. मूळचा गोरा रंग काळवंडला. काकांना पाच-सहा महिन्यांनी साधारण पगाराची नोकरी मिळाली होती, पण तेव्हढ्यावर भागणे कठीण दिसत होते, म्हणून मावशींनी लोकांकडे स्वयंपाकाचे कामही सुरु केले. महागाई वाढत होती. मुलाचे शिक्षणात लक्ष नव्हते. मुलगी मात्र समजूतदार होती. ती अभ्यास करून आईला मदत करत असे. जेमतेम वर्षभर काकांची नोकरी झाली असेल आणि त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आजारपण, औषधपाणी, हॉस्पिटल आले की भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. एकट्या मावशींनी कोणाच्या आधाराशिवाय कसे काय हे सगळे सांभाळले असेल ?! त्यावेळी माझे वय लहान, मावशींना मदत कशी करता येईल या विषयी घरात चर्चा होई तेव्हढेच मला आठवते. पण बाहेरून माणूस किती मदत करणार? शिवाय प्रत्येकाला स्वतःचा प्रपंच. बहुतेक मराठी माणूस हा सरळ नाकासमोर चालणार. बाहेरचे 'इन्कम' (कमाई) वगैरे शक्यच नाही. मावशींची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झाली असणार. थोड्या दिवसांनी त्यांनी घर विकायला काढले आहे असे कळले. स्वतःचे राहते घर पैशासाठी विकायला लागणे याच्या किती वेदना गृहिणीला सोसाव्या लागत असतील ते अशा अडचणीत सापडलेल्या स्त्रियाच जाणोत. मोठे घर विकून त्यांनी शहरापासून दूर दोन खोल्या भाड्याने घेतल्या. मावशींचे स्वतःहून आमच्याकडे येणे बंद झाले. दोन्ही मुलांना खाजगी शाळा सोडून पालिकेच्या शाळेत जावे लागले. मावशींकडे बघून घशात आवंढा येई. याच का त्या पूर्वीच्या मावशी यावर कोणी विश्वास ठेवला नसता. मावशींच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र तेच! त्यात किंचितही फरक पडला नाही. मला भेटल्या कि, "काय, आमचा लाल गुलाब कसा आहे? " मोठ्याने हसून म्हणत. कुसुम मावशींचे यजमान त्या आजारातून कधीच बाहेर आले नाहीत. दरम्यान बाबांची बदली झाली. मी मुंबईला जाऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कोकणातले संबंध दुरावले. आईकडून अधून मधून मावशींविषयी कळत असे. त्यांचे यजमान त्या आजारपणातच गेले. मावशींनी दिवसरात्र मेहनत करून पैसे कमावले. दोन्ही मुलांना कॉलेजात घातले. मुलगी पदवीधर झाली. एका क्लिनिकल लॅब मध्ये नोकरीला लागली. मुलाने मात्र शिक्षण अर्धवट सोडले. ते दुःख मावशींना कायमचे होते. मुलगा गावभर भटकून कुचाळक्या करतो असे कानावर येत असे. अशावेळी माझ्या मनात प्रश्न उभा राहत असे, एका घरात जन्म घेऊन, एकाच परिस्थितीत राहूनही दोन मुले अशी वेगळी कशी निपजू शकतात? मुलगी सुरुवातीपासून अभ्यासू, कामसू आणि अगदी त्याविरुद्ध मुलगा. मावशींनी दोन्ही मुलांवर सारखे संस्कार केले असताना एकाच झाडावर एक गोड, चवदार आणि दुसरे किडके फळ कसे लागले?
मग एका सुट्टीत मला कळले की मावशींनी खानावळ सुरु करून, डबे पोचवण्याचे काम सुरु केले होते. नंतरच्या काही वर्षात अपार श्रम घेऊन मायलेकींनी लहानसेच पण स्वतःचे घर घेतले. घराच्या अंगणात बाक टाकून घरगुती खानावळ चालू केली. मुलीचे लग्न झाले. मुलीने मावशींच्या प्रेमाचे ऋण फेडले. तिने मावशींची साथ कधीही सोडली नाही.
मावशींना एकदा भेटायला गेले. माझ्या पगारातले पैसे मावशींना देऊ केले. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले. मला जवळ घेतले, "जेवून जा पोरी." त्या दिवशी त्यांच्या हातचे रुचकर जेवण पोटभर जेवले.
मला पोचवायला नको म्हणत असतानाही एस.टी. स्टॅन्ड पर्यंत आल्या. नेहमीसारखे गोड़ हसत म्हणाल्या,"गुलाबाला चाफा भेटला कि भेटायला घेऊन ये." मला खुद्कन हसू फुटले. त्यांचे बोल खरे ठरले. मला माझा चाफा भेटला. संसार सुरु झाला. जसे जमेल तसे तसे त्यांना मी पैसे पाठवत असे. उन्हाळ्यात त्यांच्याकडून कोकणातल्या मेव्याची भेट न चुकता येत असे. त्यांनी स्वतः वाढवलेली आंबा, फणस, काजूची झाडे मोठी होऊन इमानदारीने त्यांना सावली देत होती. तसे चांगले दिवस आले असताना मुलाच्या रूपात परत एकदा दुर्दैवाने त्यांची परीक्षा घेतली. मुलाला एड्स झाल्याचे कळले. तुळशीवृंदावनात भांग उगवली होती. मावशींना जबरदस्त मानसिक धक्का बसला. यावेळी मात्र सर्वांनी मावशींना आधार दिला. मुलाला एका नर्सिंग होम मध्ये दाखल केले. पण मावशींमधली माता मुलाला जास्त दिवस दूर ठेवू शकली नाही. त्याच्या शेवटच्या दिवसात मावशींनी त्याची दिवसरात्र सेवा केली. मुलाने आईची माफी मागत शेवटचा श्वास घेतला. ते दुःख त्या माउलीने किती आणि कसे सहन केले असेल याची कल्पनादेखील आपण करू शकणार नाही.
थोड्या दिवसानंतर माझ्या नवीन घराच्या गृहशांतिला मी मुद्दामहून मावशींना आराम करायला म्हणून घेऊन आले. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणे हा त्यांचा स्वभाव मला माहित होता. त्यांनी आनंदाने चार दिवस आमच्याबरोबर घालवावे हा हेतू साध्य झाला. मला तोंडभरून आशीर्वाद देताना आणि परत जाताना त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले दोन अश्रू मला आयुष्यात खूप काही शिकवून गेले. आजच्या काळात एकीकडे उठसुठ आत्महत्या करायला जाणारी तरुण पिढी आहे तर दुसरीकडे सारी सुखे हात जोडून उभी आहेत म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन व्यसनाधीन होणारी तरुणाई आहे. कुसुम मावशींच्या मुलासारखी आईवडिलांना फक्त दुःख आणि दुःखच देणारीही पिढी आहे. अशा पार्श्वभूमीवर कुसुम मावशींचे हसत हसत दुर्दैवालाही खाली पाहायला लावणारे धैर्य आणि त्यांची सकारात्मकता खचितच प्रेरणा देणारी ठरते. त्यांच्या गावात त्यांनी एड्सग्रस्त तरुणांसाठी लहानसेच का होईना पण एक सुश्रुषागृह सुरु केले आहे.
त्यांच्या 'कुसुम' या नावाप्रमाणेच सतत दुसऱ्याला सुगंध देण्याचे काम त्या परोपकारी वृत्तीने आजतागायत करत राहिल्या आहेत.
मोहना कारखानीस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा