ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
माझे मन मला कधी कळलेच नाही,
हे बंध रेशमाचे कधी जुळलेच नाहीत...
मनावरी विचारांचे धुके दाटलेले,
नदीतून वाहणारे पाणी साठलेले...
कुठून कोण जाणे विचार आला मनात,
मोर जसा नाचतो पावसाळी वनात...
मन बोले चल जरा फेरफटका मारू,
आकाशीच्या पाखरासवे उंच उंच फिरू...
घेऊन गेले मन मला वेगळ्या जगात,
अनोळखी होते परी नवी ओढ त्यात...
चोहीकडे आनंदाचे वाहत होते झरे,
जिथे माझ्या मनालाही पारावार न उरे...
दुःख नव्हते, चिंता नव्हती, नव्हती कसली भीती,
आनंदाने भरून गेली झोळी माझी रिती...
पावसाच्या सरींमध्ये चिंब चिंब भिजले,
बीज होऊन मातीमध्ये नव्यानं मी रुजले...
आज मोकळा झाला माझा कोंडलेला श्वास,
कितीतरी गाढ झाला मनावरचा विश्वास...
माझे मन हळू हळू मलाच कळले,
अलगद हळुवार नाते हे जुळले...
- प्रतिभा तळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा