आनंद

(आ)नंदलाल ! 

‘चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं’असे एक बोधवाक्य आहे. अर्थात ‘मन प्रसन्न तर सर्व जग आपल्याला प्रसन्न वाटते’. प्रसन्नतेचा हा चष्मा एकदा का चढवला ना की ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’अशी स्थिती गाठायला फारसा वेळ लागत नाही. 

समाधान, प्रसन्नता, संतुष्टी अशा पायऱ्या चढत आपण आनंदाच्या दरवाजापाशी जाऊन पोचतो असे मला वाटते. सत,चित आणि आनंद . जितके हे शब्द लहान तितका त्यांच्या पोटात सामावलेला अर्थ महान ! 

मला लहानपणापासून सगळ्या वस्तूंचे बारसे करण्याची हौस. बाहुल्यांचे, माझ्या आवडत्या वस्तूंचे,पुस्तकांचे, माझ्या संपर्कात येणाऱ्या बहुतेक व्यक्तींचे नामकरण करण्याचा मान स्वतःच पटकावलेला. अर्थात हे माझे टॉप सिक्रेट बरे का! मग या नामकरणाच्या आनंदाला मी न मुकता आनंदाचेच नाव (आ)नंदलाल ठेवले. या (आ) नंदाची आणि माझी गट्टी, अगदी एखादी गोष्ट,घटना लक्षात यायला लागल्यापासूनची. साधारण वयाच्या ३-४ वर्षांपासून. ....अगदी गळाभेटच व्हायची आमची. तेव्हापासूनची दोस्ती टिकली ती अगदी आत्तापर्यंत . 

मी ‘लहानपण देगा देवा’असे मुळीच म्हटले नाही आणि म्हणणार नाही. आयुष्यातली प्रत्येक फेज म्हणजे पायरी म्हणूया , मी ‘एन्जॉय’ केली. अर्थात या (आ)नंदलालाची आणि माझी ‘ तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा’असे म्हणण्याइतकी घट्ट मैत्री असल्यामुळेच हे शक्य झाले. 

‘लहानग्या जास्वंदीच्या,मोगरीच्या कळीचे स्वागत करताना, लाल लाल मातीवर पहिल्या पावसाचा शिडकावा बघताना,तो वास नाकात भरून घेताना, फ्रॉकमध्ये गारा गोळा करताना, बाहुलीचे स्वतः केलेल्या पाळण्यावर बारसे करताना, शाळेला दांडी मारून स्वतःच कविता धडाधड पाठ करून म्हणताना, एखाद्याच (खडूस) शिक्षकां कडून ‘हिचे काही खरे नाही’ असा शेरा ऐकून त्यांच्या नाकावर टिच्चून स्कॉलरशिप मिळवताना, शाळेत ‘स्कॉलर’च्या मुखवटा घालून मस्तीत द्वाडपणा करताना (आणि शिवाय नामानिराळे राहताना)...पुस्तकाचा कोरा वास हृदयात साठवताना ,त्या पुस्तकातच आठवणींचे मोरपीस लपवताना ...कित्ती कित्ती वेळा मला हा (आ) नंदलाल भेटत गेला. 

वर्षे आली गेली. आवडी निवडी बदलल्या. गरजेप्रमाणे स्वभावही बदलवला. पण ते वरून वरून. मूळ माणूस थोडाच पूर्णतः बदलतो?जास्वदींच्या,मोगरीच्या कळ्या तश्श्याच फुलतात निरागसपणे.पण आपली दृष्टी तशीच राहिली तरच त्या तशा फुलताना दिसतात. लाल माती लालच असते. फक्त तिला तशी लालेलाल बघायला आपली नजर स्वच्छ लागते. अहो, कितीही ‘ग्लोबल वॉर्मिंग’झाले तरी गारा पडायच्या तेव्हा पडतातच, फक्त आपल्या साडीच्या किंवा फारतर टॉपच्या किनारीला फ्रॉक समजून त्या वेचायला सज्ज व्हायचं असतं. मग समजा (आ)नंदलाल तुमचाच. फक्त बाहेरून नाही तर अंतर्यामी. 

एक मात्र खरं की नंदलालाशी मैत्री करताना , फारशा लोभाच्या मागे न पळता, कुणाशी कसलीच शर्यत न लावता, कष्टाने , माणुसकीची इवली रोपटी लावत आले. स्त्रीच्या सन्मानाची कोडी न घालता अखंड कविताच करीत आले . कधी जमलं कधी फसलं.पण नेटाने रेटले.

हल्ली कधी जोडीदाराच्या नजरेतून , तर कधी माझ्या चिमणीच्या नजरेतून बोलवते मी त्याला. थकलेल्या, गढूळलेल्या माऊलीच्या चार चार डोळ्यातूनही भेटतो तो मला. त्यासाठी मला मदर्स डे नाही साजरा करायला लागत. माझ्या सख्यांच्या सहवासात, पुस्तक मित्रांच्या गोतावळ्यात तो दडलेला असतोच असतो. खरं सांगायचं तर त्याला हल्ली तसं शोधावेच लागत नाही. हे लिहीत असताना तर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ याहून वेगळी अवस्था नाही.

असो. जाता जाता, फक्त इतकंच म्हणेन , 

एखादा दरवाजा ... तुम्ही बारकाईने पाहिलात का कधी ? तो दरवाजा एकाच बाजूने उघडतो. बाहेरच्या बाजूला किंवा ...आपल्या बाजूला...

अरे, आणि हा तर आनंदाचा दरवाजा ...बघा,बघा लक्षपूर्वक त्याच्याकडे. तो नेहमी ‘आपल्या’बाजूला उघडतो. ‘नेमके तेच आपल्या लक्षात येत नाही’. धक्का देऊन देऊन आपण तो बाहेरच्या बाजूला उघडण्याचा प्रयत्न करतो. सगळं आयुष्य ‘आनंद’बाहेर शोधण्यात घालवतो. असा चुकीच्या दिशेला दरवाजा उघडायचा प्रयत्न केलात तर तो कसा यशस्वी होणार ? बघा ना तो निरागस ‘आनंद’आपल्याला कवेत घ्यायला केव्हाचा वाट बघतोय. मग आता विलंब कसला ? बोलवा त्याला . घट्ट कवेत घ्या त्याला. कधीही न सोडण्यासाठी!


मोहना कारखानीस 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा