आर्टिस्टची गॅलरी

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

एक दिवस जवळच राहणारी मैत्रीण म्हणाली, “भाजी आणायला येतेस का?” शांघायमध्ये नवीनच असल्याने मी लगेचच तयार झाले; कारण भाज्या इथे कशा मिळतात याची मला फारच उत्सुकता होती. मग आम्ही निघालो आणि आमची गाडी एका गोडाऊन पुढे थांबली. अगदी भारतात असतं तसं गोडाऊन पाहून मी जरा दचकलेच आणि जरा संकोचतच मैत्रिणीला म्हणाले, “अगं आपण आधी भाजी घ्यायला जाऊया का?” त्यावर ती खूप खळखळून हसली आणि म्हणाली, “अगं हो हो, भाजीच घेऊया आधी.. आणि इथेच!” 

आम्ही आत शिरलो तसे बरेच भाजीवाले दिसले पण सगळीकडे ओले ओले झाले होते… त्यांचे ‘वेट मार्केट’ पण तिथेच होते ना… मी आपली गुपचूप तिच्या मागून चालू लागले. माझी जरा तारांबळ उडाली होती, कारण मला आता वेट मार्केटमधून जाताना खेकडे, मासे, झिंगे आणि अनेक वळवळणारे प्राणी दिसले आणि विचित्र वास येऊ लागले. मला क्षणभर हे मत्स्यालय आहे असेच वाटले आणि शाळेत शिकलेली झूलॉजी आठवली. हे लोक एखाद्या झूलॉजी लॅबला इथूनच सप्लाय करतात कि काय असे मनात येऊन गेले.

मी शुद्ध शाकाहारी. भारतात कधी वेट मार्केट मधून इतक्या सहजपणे जाण्याचा प्रसंगच आला नाही, त्यामुळे पुढच्या काही मिनिटात त्या विचित्र वासाने मला मळमळू लागले बाई. मी तडक नाकाला रुमाल लावला आणि जरा पळतच भाज्यांच्या सेक्शनकडे वळले.

इकडे मात्र चित्र खूप वेगळे होते. रंगीबेरंगी भाज्यांनी सजलेले स्टॉल पाहिले आणि थोड्या वेळासाठी हायसे वाटले. जेवढे सुंदर रंग भाज्यांचे होते तेवढेच सुंदर चेहरे भाजी विक्रेत्यांचे होते. सुंदर, देखण्या, हसऱ्या स्त्रिया आमचे स्वागत करत होत्या. मला खूप छान वाटत होते. किती प्रसन्न दिसत होत्या त्या. त्यांच्याकडे हसून पाहताना त्यांच्या स्वच्छ टवटवीत भाज्यादेखील तितकेच लक्ष वेधून घेत होत्या. बापरे सगळ्याच भाज्या जम्बो आकारात होत्या. जम्बो वडापाव नाही हं… मला हसूही आलं आणि तितकच आश्चर्यदेखील वाटलं. एक टोमॅटो एका हातात मावत नव्हता. तसेच कांदे, बटाटे आणि इतर भाज्याही तितक्याच जंबो होत्या. मनात आले कि एक टोमॅटो, एक बटाटा आणि एक कांदा आपल्याला आठवडाभर पुरेल!

सगळ्याच भाज्या सुरेख दिसत होत्या. पांढरा शुभ्र मुळा, केशरी टवटवीत गाजर आणि हिरवागार दुधी भोपळा तर एकमेकांशेजारी असे बसले होते कि स्पर्धाच जणू 'सर्वात उंच कोण आहे'! पालेभाज्याही भरपूर होत्या त्यामुळे मला फार हायसे वाटले. पण लगेच मनात दुसरा विचार असाही आला कि इथली माणसे तर जवळपास सगळ्याच झाडांची पाने खातात कि काय? सगळंच ‘हेल्दी’. पालेभाज्यांमध्ये मेथी कुठेतरी लपून बसली होती तर पालक कितीतरी प्रकारचा होता. कांद्याच्या पातीकडे मी जरा दोनदा तीनदा पाहिले. मला ती रोगट वाटली. मग मैत्रिणीला विचारल्यावर कळले कि ती लसणाची पात होती. एक चायनीज भाजी तिथे मला दिसली तिचा आकार छान बदकासारखा होता. ते गोडाऊन, तिथल्या भाज्या पाहून मी खूप आनंदीत झाले होते. मला ते भाजी विक्रेते, विक्रेते कमी आणि आर्टिस्ट जास्त वाटत होते. भाज्या किती सुंदर रचल्या होत्या. जणू आर्टिस्टने सजवलेली सप्तरंगांची गॅलरीच. ते बघून वाटले कि एखाद्या पेंटरचे ते पॅलेट आहे! 

हे भाजी मार्केट मला एखाद्या प्रदर्शनासारखे वाटायचे आणि सर्व भाज्यांचे स्टॉल पाहताना वेगवेगळ्या आर्टिस्टच्या कलाकृती आपण पाहत असल्याचे फीलिंग यायचे. मी तर रंगरूप पाहून भारावून गेले होते, पण माझी गम्मत तर पुढे यायची. “ए कशी दिली भेंडी?” असं कसं विचारणार? आपल्याला भाजीचा दरंच जर माहिती नसेल तर कमी किंमत लाव म्हणणार कसे आणि घासाघीस करणार कशी! मी त्यांना हातवारे करून विचारायचे आणि ते पण तितक्याच उत्साहाने मला हातवारे करून समजेपर्यंत सांगायचे. हार अजिबात मानायचे नाहीत. वजन दाखवून, पैसे दाखवून ते मला सांगण्याचा जो प्रयत्न करायचे तो फार गोड वाटायचा. मला कळले कि त्यांना फार आनंद व्हायचा. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी माऊंट एवरेस्ट गाठल्याचा आनंद असायचा. 

मी मनाशी निश्चय केला कि आपण येथेच भाजी घायला येत जायचे आणि त्यासाठी या लोकांशी मोडका तोडका तरी संवाद साधता आला पाहिजे. या गोड भाजीवाल्यांशी फाडफाड नाही बोलता आले तरी चालेल पण कामापुरते बोलता येईल इतकी त्यांची भाषा नक्कीच शिकायची. 

हळूहळू मी त्यांची भाषा शिकू लागले आणि मला भाजी खरेदीचे काम फार मनापासून आवडू लागले. मी जेव्हा वेट मार्केटच्या (मासे, खेकडे) भागातून नाक दाबून पळत जायचे तेव्हा सगळे विक्रेते माझ्याकडे पाहून खळखळून हसत आणि म्हणत, “व्हेरी नाइस, बाय इट, बाय इट”. त्यांना एव्हाना कळले होते कि मी शाकाहारी होते आणि म्हणून मी पण हसत तिथून निघून जायचे. 

दिवसरात्र कष्ट करूनदेखील हि माणसं किती आनंदी राहतात, हसतमुखाने काम करतात याचे मला फार आश्चर्य वाटायचे. कधीही चिडका, रागीट चेहरा नाही. भाजी घ्या किंवा घेऊ नका पण विचारल्यावर सगळी माहिती पूर्ण आणि अचूक देणार आणि आनंदाने देणार. नंतर नंतर ते लोक कोथिंबीर देऊ लागले कारण आपण ती जेवणात भरपूर वापरतो याचा अंदाज त्यांना माझ्या कोथिंबीर खरेदी वरून आला असावा. पत्ताकोबी पण आपल्याला फुटबॉलच्या आकाराइतका मोठा लागतो, क्रिकेटच्या बॉलसारखा छोटा नाही हे देखील त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीने ताडले होते. आम्हा भारतीयांच्या अनेक गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या होत्या. 

एक दिवस भाजी घेत असताना अचानक ३-४ चिनी आजोबा दिसले. मला पाहून ते जवळ आले आणि चक्क गायला लागले, “आवारा हूं … आवारा हूं”. त्यांना गाताना आणि नाचताना पाहून मला खूप छान वाटले. मीपण त्यांच्याबरोबर गाऊ लागले आणि पाहता पाहता गर्दी जमा झाली. मी खूप लाजले आणि “बाय बाय” म्हणून जायला निघाले. त्यातल्या एका आजोबांनी मला चेरी खायला दिली. मी खुशीत घरी पोहचले. 

संध्याकाळी माझ्या यजमानांना मी घडला प्रकार सांगितला. आणि त्यांच्या प्रतिक्रियेने मला क्षणभरासाठी वाटले कि मी पाहिलेल्या आर्टिस्टच्या गॅलरीमध्ये अचानक काळ्या रंगाचा ठिपका आला. सुधीर मला म्हणाले कि, “मॅडम, शांघायच्या भाजीबाजाराची तुमची हि शेवटची व्हिजिट होती आणि त्या आजोबांनी तुला फूल देऊन निरोप दिला असं समज.” मी काही मिनिटांसाठी शांत झाले. असा हा अविस्मरणीय अनुभव.

“The call was too sudden to say goodbye. But memories of Shanghai will never die.” 

- अश्विनी कुलकर्णी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा