नमस्कार मंडळी,
'ऋतुगंध वर्षा २०१६' चा अंक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
नाती-गोती मालिकेमधील हा दुसरा अंक. आई-वडील व मुलांच्या नात्यावर आधारित असलेल्या या अंकासाठी आम्हाला लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि त्यावरून हा सगळ्यांच्याच किती जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे हे लक्षात आलं.
कष्टाच्या आणि शिस्तीच्या आयुष्यात आई-वडिलांविषयीचे प्रेम कधी त्यांच्याजवळ व्यक्त करता आले नाही, अशा अबोल भावनांना कोणी वाट मोकळी करून दिली, तर कोणी आपण स्वतः आई-बाबांच्या भूमिकेत गेल्यावर आपल्या आई-वडिलांविषयीचा आदर आणखी दुणावल्याचं म्हटलं आहे. म्हातारपणात आईला आपल्या मुलीसारखं सांभाळलं पाहिजे असे मार्मिक विचार कोणी मांडले आहेत, तर एका चिमुरडीने आपल्या आई-बाबांविषयी वाटणारे कौतुक तिच्याच शब्दात मांडले आहे. आई-वडिलांच्या नात्यातले असे अनेक पदर ह्या अंकात उलगडले आहेत. स्मिता कुलकर्णी ह्यांनी आपल्या विशेष पाल्याविषयी लिहिलेल्या प्रेरणादायी लेखाचीही वाचकांनी आवर्जून नोंद घ्यावी.
ह्या विषयांतर्गत घेतलेल्या छायाचित्र स्पर्धेविषयीही तुम्ही उत्सुक असाल. त्याचा निकालही आम्ही ह्या अंकात जाहीर करत आहोत. स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन व सर्व स्पर्धकांचे आभार.
याशिवाय मागच्या अंकापासून चालू केलेली सदरे - आरोग्यम् धनसंपदा, वेगळ्या वाटा, सिंगापूरच्या आठवणी ही देखील वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील.
तर मंडळी, ऋतुगंध वर्षा जरूर वाचा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
आपलीच,
ऋतुगंध समिती २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा