महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

गुढीपाडवा

गुढीपाडवा - हिंदू नववर्षदिन. साडेतीन मुहूर्तापैकी एक. या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने ह्यावर्षी १० एप्रिल २०१६ रोजी ग्लोबल इंडियन शाळेत गुढीपूजन आणि सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळीच नटून थटून सर्व मंडळी पारंपारिक वेशात हजर झाली. पारंपारिक कडुलिंबाच्या चटणीने उपस्थितांचे स्वागत केले गेले. सर्व जण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमासाठी सभागृहात दाखल झाले.

नवपरिणीत दांपत्यांच्या हस्ते गुढीपूजन झाल्यावर सेक्रेटरी विशालने प्रास्ताविक केले आणि शौनक अभिषेकी यांच्या बहारदार कार्यक्रमाला सुरवात झाली. 'जय जय रामकृष्ण हरी' ने सुरुवात करून त्यानंतर एकसे एक नाट्यगीते गात अखेरीस सादर केलेली अभंगांची मेडली हा कार्यक्रमाचा कळस ठरला. 
संतोष अंबिके यांनी कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन तर केलंच पण पंडितजीना एका गाण्यात तबल्यावर साथही केली आणि आपल्या हरहुन्नरीपणाची झलक सादर केली.
तबल्यावर श्री नवाझ मिरजकर, पखवाजवर श्री सचिन भिडे, संवादिनीवर राया कोरगावकर यांची तर टाळ वादक प्रसन्न पेठे या सर्वांचीच अत्यंत समर्पक अशी साथ शौनकजींना लाभली.

नवीन कार्यकारिणीचा हा पहिलाच कार्यक्रम होता. अध्यक्ष अस्मिता तडवळकरने कार्यकारिणीची ओळख करून दिली. ऋतुगंध वसंत अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. श्रीखंड पुरीच्या खास बेताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यावेळी एका 'लकी ड्रॉ' चे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाला २५० हून अधिक सभासद उपस्थित होते.
- राजश्री लेले

शौनक अभिषेकी यांची शास्त्रीय गायन बैठक लहान मुलांची सहल

दिनांक २१ मे २०१६ रोजी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे लहान मुलांसाठी फॉरेस्ट अड्वेंचर, बेडोक येथे सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीला २१ लहान मुलांचा असा उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलांना साहसी अडथळे पार करताना खूप मजा आली. मुलांची मजा बघून त्यांच्या पालकांना सुद्धा उत्साह आला व काही पालकांनी पण या साहसी खेळांचा अनुभव घेतला. 
या खेळानंतर मुलांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर आईचं पत्र हरवलं, आंधळी कोशिंबीर सारखे पारंपारिक खेळ खेळण्यात आले. मुलांना व त्यांच्या पालकांना सहल खूप आवडली. अश्या सहली अधिक आयोजित कराव्या अशी प्रतिक्रिया मिळाली. या उपक्रमाचे आयोजन वेदश्री जठार व कौस्तुभ राव यांनी केले होते. तसेच जुई चितळे, अस्मिता तडवळकर, नलिनी थिटे, भूषण गोरे, विशाल पेंढारकर व पुष्कर प्रधान या कार्यकारिणी सदस्यांनी मोलाची मदत केल्याबद्दल त्यांचे आभार. 

- कौस्तुभ राव 

स्वरगंध निवड चाचणी

मंडळातील हौशी संगीत-कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांच्या कलेचे दर्शन रसिकांपर्यंत पोचविण्याचे कार्य आपली स्वरगंध ही उप-समिती करते. यासाठी सर्व कलाकारांची “चाचणी-परिक्षा” नुकताच आयोजित केली. दोन सदरांमधे विभागलेल्या चाचण्यांचे पहिले सत्र दि.२९ मे रोजी संपन्न झाले. यात मंडळाच्या मंचावर प्रथमच येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांचा समावेश होता. राहिलेले दुसरे सदर दि.१२ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. यात इतर सर्व कलाकारांचा समावेश असेल. या उपक्रमात आपल्या सर्वांना परिचित असलेले संगीत-तज्ञ आणि संगीत-अध्यापक श्री.रविंद्र परचुरे, व आपले सुपरिचीत सभासद श्री.सचिन भिडे हे दोघे परिक्षकांची भूमिका करीत आहेत. त्यांच्या सहकार्याबद्द्ल आणि आपला अमूल्य वेळ उपलब्ध करून दिल्याबद्द्ल त्यांचे अनेक आभार. 
- स्मिता अंबिके 


काम्पोंग चाय ची CC तर्फे आयोजित भारतीय नववर्ष उत्सवात महाराष्ट्र मंडळाचा नृत्याविष्कार 
कल्चरल फिएस्टा मध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे नृत्य सादरीकरण 
आगामी कार्यक्रम

  • सर्जनशील लेखन कार्यशाळा 
  • नाट्य शिबीर - प्रतिमा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन 
    • मोठ्यांसाठी अभिनय व दिग्दर्शन 
    • लहान मुलांसाठी अभिनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा