स्वतःचे ट्रस्टी व्हा!

तुम्हाला खरेच शिकायचे असेल तर स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हा !
--- स्वतःच लिहिलेय

नाते (ना - ते) हा विषय आकलन होणे फार कठीण आहे बुवा! आज मीच (माझ्यासमोर) हात टेकलेत. आधीच ‘आत्मनिरीक्षण’ ही गोष्ट आकलनाच्या पलिकडची आणि स्वतःबद्दल विचार करताना तर गैरसमजुतींचे प्रमाण अधिक. बाकी इथे ‘गैरसमज’ हा शब्द मोठा गमतीदार वाटतो नाही? म्हणजे आपल्याबद्दलचा समज हा ‘गैर’ म्हणजे अन्य, आपला नसलेला कसा?... असो.

मोठ्या उत्साहात लिहायला सुरुवात केली खरी, पण सूर सापडणे फार कठीण झालेय. बरोबरच आहे. अहो, “शब्दाविण संवादिजे” या प्रांतात एकदा प्रवेश केल्यानंतर शब्दांचे थिटेपण जाणवणारच. यावेळी नवशिके, भोपळे बांधून पोहोणारे कसं पाणी जास्त उडवतात, तशी शब्दांची आतिषबाजी करून कागद भरून काढावासा वाटतोय.

“आपले स्वतःशी असलेले नाते” या संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे स्वतः! म्हणजेच “अहं”. काय मजा आहे, स्वतःला आरसा मानले तर प्रतिबिंब तरी कोणाचे बघायचे, तर स्वतःचे! “स्वतः”त खोलवर डोकावले तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपण सर्व गोष्टी फक्त आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी करतो. इथे विल्स्टन चर्चिल यांची एक गोष्ट आठवली. एकदा चर्चिल एका पत्रकाराबरोबर त्यांच्या गाडीतून चालले होते. त्यांच्या परोपकाराविषयी गप्पा चालल्या होत्या. आपण सर्व गोष्टी आपल्या स्वार्थासाठीच करतो असा चर्चिल यांचा सूर होता. अचानक त्यांना एक कुत्र्याचे पिल्लू एका जाळीत अडकलेले दिसले. चर्चिल यांनी त्वरीत गाडी थांबवून त्या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. चर्चिल गाडीत येऊन बसल्यावर पत्रकाराने पहिलाच प्रश्न विचारला, “महोदय, या कुत्र्याची सुटका करण्यामागे आपला काय स्वार्थ होता? हा तर सरळसरळ परोपकारच नाही का?” चर्चिल यांनी स्मितहास्य करून उत्तर दिले, “नाही तर, हाही माझा स्वार्थच आहे. जर मी त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाकडे दुर्लक्ष करून तसाच पुढे गेलो असतो, तर दिवसभर मला त्याच्या वेदना दिसत राहिल्या असत्या, माझा दिवस फार वाईट गेला असता. माझ्या स्वार्थापोटीच मी त्या पिल्लाला वेदनेतून मुक्त केले, बरे का !”

याच सदसद्विवेकबुद्धीच्या पोटी क्रांतिकारकांनी अनंत वेदना सहन केल्या, समाजसुधारकांनी जीवाचे रान केले, तर हठयोग्यांनी शरीराला परम कष्ट देणाऱ्या तप:साधनेचा अवलंब केला. रघुनाथ पंडितांनी रामायणाचे भले-मोठे बाड लिहिल्यानंतर काही लोकांनी त्यांना विचारले, “अहो महाराज, हा एवढा मोठा ग्रंथ वाचणार कोण?”, रघुनाथ पंडितांनी त्यांना फार छान उत्तर दिले आहे. ते म्हणतात, “स्वान्त:सुखाय, रघुनाथ गाथा”. वाक्याचा मतितार्थ असा, ग्रंथ लिहिण्यामागे स्वसुख हा माझा उद्देश होता, लोकांचे सुख नव्हे.

आपल्याला आपण जर इतके महत्त्वाचे वाटतो तर आपणच आपली काळजी नको का घ्यायला? व. पु. काळे यांच्या “बॉस” या गोष्टीत त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. एक वृद्ध माणूस असतो. वयपरत्वे त्याच्या डोळ्यांत मोतीबिंदू होतो. डॉक्टर त्याला ऑपरेशन करायला सांगतात. तो म्हणतो, घरात तीन मुले आहेत, तीन सुना आहेत, भरपूर नातवंडे आहेत, हेच सगळे माझे डोळे. तो ऑपरेशनला नकार देतो. दोन - तीन महिन्यांत त्याची नजर जाते. दुर्दैवाने एके दिवशी त्याच्या वाड्याला आग लागते. सर्व परिवार पळत वाड्याबाहेर पडतो. आंधळा म्हातारा घरातच अडकतो. संपूर्ण वाडा परिचयाचा असल्यामुळे तो कसातरी पडत धडपडत बाहेर येतो. गोष्टीचा मतितार्थ असा – स्वतःची वाट शोधायची असेल तर त्यासाठी स्वतःचेच डोळे लागतात, आपले स्वतःशी असलेले नातेच शेवटी आपल्या उपयोगाला येते.

आपणच आपली काळजी घ्यायची, हे तर मान्य. पण एक मोठी गल्लत होते ती म्हणजे, आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट याचा निवाडा कसा करायचा? आपण कसे वागावे हे आपण कसे ठरवायचे? यासाठी एक चांगला कानमंत्र आहे, “स्वतः स्वतःचे ट्रस्टी व्हा !”

“ट्रस्टी” (Trustee) या शब्दाचा अर्थ आहे विश्वस्त. एखाद्या धनाढ्य जमीनदाराने त्याच्या शेकडो एकर जमीन-जुमल्यासाठी नेमलेला एक विश्वासु माणूस. संपूर्ण इस्टेटीची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करणारा, परंतु “इदं न मम” ही जाणीव सतत मनात बाळगणारा. सुरेश भटांनी लिहिल्याप्रमाणे “रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा वेगळा”. आपले मन एका ओढाळ मुलासारखे जिकडे तिकडे धावत असते. त्याला आवर घालण्यासाठी एका तर्कदृष्ट लगामाची गरज असते. हा लगाम म्हणजे आपली सद्सद्विवेकबुद्धी. कधीतरी केलेली एक छान चारोळी आठवली.

“तरंगणाऱ्या एका छोट्याश्या होडीला
समुद्राचं अथांग पाणी बुडवू शकत नाही
पण जर होडीनेच पाणी आत घेतले
तर तिला कोणी वाचवू शकत नाही”

जगातले सर्व वाईट विचार मिळूनसुद्धा तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यांना तुमच्या मनात थारा देत नाही. कधी कधी मायेपोटी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे मनावरचे नियंत्रण सुटते, यावेळी हा कानमंत्र जरूर लक्षात ठेवा, ““स्वतः स्वतःचे ट्रस्टी व्हा !”

- राजीव खरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा