मैत्रीचे इंद्रधनुष्य

मैत्री...एक निखळ, पारदर्शक नातं ! त्या नात्याला अनेक पदर असतात. अनेक रंग असतात. मैत्रीचा अमुक एक रंग असतो असे नाही म्हणता येणार. अनेक रंगांची सरमिसळ आहे ही. प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, लटक्या रागाचा, हक्काचा, खोडकरपणाचा आणि मस्तीचा असे सात रंग एकमेकात मिसळून अनोख्या रंगाचे बनलेले मैत्रीचे इंद्रधनुष्य हे! जाणकार तज्ज्ञ मैत्रीला अनेक उपमा देता येतील. मैत्रीच्या अनेक व्याख्या आहेत आणि असतील परंतु मला असे वाटते कि जी मैत्री कोणत्याही परीस्थितीत बदलत नाही ती खरी मैत्री. खऱ्या मैत्रीला वयाची, संपत्तीची, पोझिशनची बंधने बांधून ठेवू शकत नाही.

लहानपणी वाचलेली दोन मित्रांची गोष्ट मला आवर्जून आठवते. दोन मित्र जंगलातून चाललेले असतात. तेव्हढ्यात तिथे एक भलेमोठे अस्वल येते. अस्वलाला पाहिल्यावर एक मित्र घाबरून धूम ठोकतो आणि झाडावर चढून लपून बसतो. दुसरा मित्र बघतो की अस्वल अगदी जवळ आले आहे. तात्काळ तो प्रसंगावधान साधून मेल्याचे सोंग घेऊन पडून राहतो. अस्वल त्याला हुंगून थोड्या वेळाने जंगलात निघून जाते. ते बघून झाडावर चढलेला मित्र खाली उतरतो. "अस्वलाने तुला काहीच इजा केली नाही. हे कसे काय?" दुसरा मित्र हसतो आणि म्हणतो, "मला एकट्याला या अवस्थेत बघून अस्वलाला माझी दया आली. त्याची माझ्याशी कसलीच दुष्मनी नव्हती. म्हणून मला कसलीच इजा न करता ते निघून गेले. परंतु जाताना मला एक मोलाचा सल्ला देऊन गेले. ते म्हणाले, "मित्रा, तुला एकट्याला संकटात सोडून जाणाऱ्या त्या भित्र्या प्राण्याशी पुन्हा मैत्री करू नकोस." पंचतंत्रात वाचलेल्या अशा अनेक लहान गोष्टीतून मोठी गोष्ट शिकायला मिळाली. समोरून शत्रुत्व पत्करणारे लोक एकवेळ बरे परंतु तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या किंवा संकटात स्वार्थ साधून पळून जाणाऱ्या लोकांपासून सांभाळून राहावे. त्यांना मित्र म्हणून कसे संबोधावे? सुदैवाने मला असे लोक फारसे भेटले नाहीत. आमचे एक कवी मित्र त्यांच्या साबीरवाणी मध्ये म्हणतात ,

योग्य मित्र अन योग्य औषधी,
मित्रा निरखून घ्यावे,
दुजाभाव दिसताच क्षणाला, 
आपण सावध व्हावे !

किती योग्य सल्ला आहे हा!

असो. मला मैत्रीच्या इंद्रधनुषी रंगात एकदाच नाही तर अनेकदा रंगायला मिळाले. बाल्यावस्थेत, नंतर शाळकरी वयात, त्यानंतर कॉलेज मध्ये आणि अगदी प्रौढ वयात मला मनाने अतिशय सुंदर असणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या. असे म्हणतात मैत्री आणि प्रेम एकदाच होते. पण ह्या बाबतीत मला अपवादात्मक अनुभव आला. माझी मैत्री अनेकदा वयाच्या वेगवेगळ्या वळणावर झाली आणि आज पर्यंत मैत्रीच्या या तारा एकसंध आणि मजबूत असून मैत्रीचं हाय वोल्टेज नातं घट्ट पेलून आहेत.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या आणि माझ्या स्मरणात ध्रुवा सारख्या अढळ पद पटकावणाऱ्या काही मैत्रिणी. त्यातील एक, माझी प्रायमरी शाळेतील बाल मैत्रीण. एकमेकींचा डब्बा आम्ही कधीच शेयर केला नाही. एकत्र बसून अभ्यास केला नाही .. तसे आमच्यात काहीच कॉमन नव्हते. कोणत्याच आवडी निवडी जुळत नव्हत्या. ती बडबडी, भटकी, कधी कधी चक्क लोणकढ्या ठोकणारी आणि मी थोडीशी गंभीर, पुस्तकात रमणारी आणि सत्यवचनी. तरीही आमची मैत्री होती. एकमेकांना भेटल्या शिवाय आम्हाला करमत नसे. कधी कधी सारख्या आवडींमुळे नाही तर विरुद्ध स्वभावामुळे मैत्री होत असावी आणि मला या मैत्रित काहीतरी विशेष दिसले असावे त्या वयात. मी शाळेचा अभ्यास / गृहपाठ अगदी न चुकता करत असे आणि माझी मैत्रीण? कधीतरी चुकून गृहपाठ केला तर केला अशी परिस्थिती होती. तिचा अभ्यास मीच करून ठेवत असे. तो करण्यात मला आनंद मिळत असे. किती अजब मैत्री होती आमची. कालपरत्वे आम्ही एकमेकींपासून लांब गेलो. पण मनाने कायम जवळ राहिलो.

तरुणपणात झालेली मैत्री पहाटेच्या पहिल्या वाहिल्या कोवळ्या किरणांसारखी असते. सुखद, आशादायी, तारुण्यासारखीच टवटवीत. या वयात आपली मते, आवडी निवडी या आकार घेत असतात. मन थोडे उनाड, थोडे खट्टे, थोडे मीठे, आंबट गोड बोरांसारखे असते. त्यात शबरीच्या बोरांचे उष्टेपण दडले असले तरी शबरीचे पावित्र्य, तिच्यातील श्रद्धा आणि विश्वास यांचे आवरण त्यावर चपखल बसलेले असते. शाळेत कुमार वयात झालेल्या मैत्रीची तुलना कच्च्या कैरीशी करावीशी वाटते. तिला एक वेगळीच चव असते. अढीत घातलेल्या कैरीचे रूपांतर थोड्याच कालावधीत जसे मधुर, केशरी आम्रफळात होते तसेच काहीतरी या वयातील मैत्रीविषयी वाटते. कॉलेजमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या. यावेळी मनाची द्वारे आणखी सताड उघडली होती. विचारी मनाला भावुकतेचे पदर सुटले होते. डोळ्यासमोर एक लक्ष्य निश्चित झाले होते. त्यामुळेच कि काय आपल्या विचारांशी साधर्म्य असणाऱ्या मैत्रिणी या वयात मला मिळाल्या. तो काळ खूप वेगळा होता. आता विचार केला तर त्या वयातील आमचे भावविश्व् खूपच स्वप्नाळू, निष्पाप आणि प्रामाणिक होते, असे वाटते. त्या मैत्रिणी अजूनही मैत्रीचे नाते अगदी घट्ट टिकवून आहेत. पिढ्या बदलतात , विचार बदलतात , 'सोशल मीडिया 'या अलीकडे आपल्याला मिळालेल्या वरदानामुळे मैत्रीच्या व्याख्या बदलत आहेत. काही वर्षांपूर्वी आमच्या हातात कधी मोबाईल सारखी महागडी उत्पादने नव्हती पण आमच्या मैत्रीला कायम समृद्ध ठेवायला ना कधी मोबाईल लागला, ना कधी फेसबुक किंवा व्हाट्सऍप च्या कुबड्या लागल्या. अर्थात दूर राहणाऱ्या मित्रमैत्रिणींना जोडणारे हे माध्यम शक्तिशाली आहे ह्यात शंका नाही.

त्यानंतर प्रौढ वयात झालेली मैत्री आणखी निराळी. मैत्रीच्या व्याख्या काहीशा बदललेल्या. ओळखीच्या कक्षा रुंदावलेल्या. अनुभवाचे लोणचे मुरलेले असते. कच्ची कैरी पूर्ण पिकून मधुर आम्रफ़ळ बनलेले आयुष्य पूर्णत्वाच्या क्षितिजाकडे वाटचाल करत असते. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला कि आपल्या आवडी बदलतात आणि त्या प्रमाणे आपल्या भोवती असणारी माणसे ! हा बदल सकारात्मक असेल तर मैत्रीला जागणारी, मैत्रीच्या व्याख्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी माणसे आपल्या भोवती असल्याचा आपल्याला साक्षात्कार होतो. अगदी अलीकडे झालेल्या मैत्रिणी, 'हे विश्वची माझे घर' ह्या मानसिकतेतुन येऊन मला बिलगल्या आहेत.


- मोहना कारखानीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा