थंडीत फुटलेला घाम

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

ही घटना आहे १९७५ सालची डिसेंबर महिन्यातली. डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं, आणि आम्ही गोव्याला जाण्यासाठी बसने निघालो. मुंबईपासून जवळजवळ १० तासांचा लांबलचक प्रवास, पण आरामबस असल्याने खूपच मस्त पार पडला. संध्याकाळी पणजीला पोहोचलो. स्नान आटोपून फ्रेश झालो आणि मस्तपैकी जेवण करून ताणून दिली कारण दुसऱ्या दिवसापासून गोवा पाहण्याचा कार्यक्रम सुरु होणार होता.

त्यावेळीच गोव्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थ, याचे लग्न, त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंदावरकर हिच्याबरोबर झाले होते. सिद्धार्थ हे गोवेकरांचे अतिशय लाडकं व्यक्तिमत्व, त्यामुळे त्यांच्या लग्नाची पार्टी गोव्यात धुमधडाक्यात होणार होती. पार्टीसाठी गोव्यात जोरात तयारी सुरु होती. सर्व गोवेकर मंडळी खूप खूष होती. सबंध पणजीमध्ये खूपच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली होती, पताका रस्त्यारस्त्यावर झळकत होत्या. पणजीचं हे सजलेलं रूप पाहून आम्हालाही खूपच छान वाटत होतं. जणू काही लग्नानंतर आम्ही येणार म्हणून आमच्या स्वागतासाठीच हि सजावट केली आहे असं आम्हाला वाटत होतं. 

दुसऱ्या दिवसापासून आम्ही गोव्यातील चर्च, समुद्रकिनारे आणि देवळे पाहण्याचा सपाटाच लावला होता. मंगेशीचं देऊळ, दोना पावला बीच, वगैरे वगैरे. त्यावेळी, म्हणजे ४० वर्षांपूर्वी, गोवा अतिशय शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले होते, आतासारखी गर्दी नव्हती, आणि आतासारखे कमर्शियलहि झाले नव्हते. त्यामुळे हिंडायला जाम मजा येत होती.

सिद्धार्थच्या लग्नाची १५ तारखेची वेडिंग पार्टी झाल्यावर १८ तारखेला गोव्याच्या "लिबरेशन डे इव्हला" पण खूप मोठी पार्टी होणार होती. त्यासाठी आम्ही उतरलो होतो त्या हॉटेलच्या समोरच्या मोठया पटांगणात जोरात तयारी सुरु होती. 

१८ तारखेला सकाळी आम्ही टुरिस्ट मॅप मध्ये पाहून गोव्यापासून साधारण २० किलोमीटर दूर असलेल्या बिचोली गावातल्या 'मायेम' लेकवर बसने जायचे ठरवले. हा तलाव अतिशय सुंदर आहे. तिथे बोटिंगचीही सोय होती. डिसेंबर महिना असल्यामुळे कडक ऊन पण नव्हते. त्यामुळे पूर्ण दिवस तिथे आरामात काढता येणार होता.

साधारण बारा-साडेबाराच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. खूप छान जागा होती. आजूबाजूला अजिबात लोकवस्ती नव्हती. आम्हाला खूपच आवडली जागा! गेल्यावर जेवलो, थोडं ऊन कमी झाल्यावर बोटिंग केलं, आणि आरामात शांतपणे बसलो. खूप प्रसन्न वाटत होतं तिथे. तिथून उठल्यावर भूक लागली समोर एक माणूस कांदा-बटाट्याची भजी तळताना दिसला. खमंग वास! अहाहा! एवढे छान वातावरण आणि समोर गरम गरम भजी. रहावले नाही. भज्यांची एक डिश लगेच संपली आणि वेळेचा अंदाज न घेता दुसरी डिश आम्ही ऑर्डर केली. ती द्यायला त्याने एवढा वेळ लावला, बहुतेक पीठ भिजवण्यापासून त्याने तयारी केली असावी. भजी खायला तर मज्जा आली पण खाण्याच्या नादात ६ कधी वाजले तेच समजले नाही. आजूबाजूला पाहिले तर तिथली बरीचशी गर्दी कमी झाली होती. 

बस पकडावी म्हणून आम्ही बाहेर रस्त्यावर आलो आणि पाहतो तर स्टॉपवर कोणीच नाही. बाजूला छोटीशी टपरी होती. तिथे चौकशी केली तर समजले कि इथून निघणारी शेवटची बस ३० मिनिटांपूर्वीच निघून गेली होती. आता उद्या सकाळपर्यंत बस नाही, आतापर्यंत लेकवर असलेले सर्वजण आपापल्या गाड्यांमधून निघून गेले होते. आम्ही आणि तो टपरीवाला माणूस याशिवाय तिथे चिटपाखरूही नव्हते आणि तिथे रहायचीही काहीच सोय नव्हती. आम्ही पणजीपासून २० कि.मी. अंतरावर, संध्याकाळी साडेसहाची वेळ, सगळीकडे मोठाली झाडे, त्यामधून डोकावणारा अंधार, भयाण शांतता आणि त्यातून येणारे रातकिड्यांचे कर्कश्श आवाज! आम्हाला काय करावं तेच सुचेना.आमचे दोघांचे वय त्यावेळी २० आणि २४ वर्षे. गाठीशी अनुभव अगदी कमी आणि परप्रांतात असा प्रसंग बेतलेला. आम्ही फारच भांबावून गेलो. आम्हाला असे भांबावलेले पाहून त्या टपरीवाल्याच्या लक्षात आले. तो म्हणाला, “इथून २ कि.मी. वर चालत गेलात तर तुम्हाला पणजीला जाणारी बस मिळेल. पोरांनो, आता वेळ घालवू नका लगेच चालायला सुरवात करा.” 

दोन कि.मी. चालत जायचे एवढ्या रात्री? रस्तासुद्धा नीट दिसत नव्हता. दोन्ही बाजूला जंगल. कोणताही प्राणी रस्त्यावर येण्याची भीती, रातकिड्यांचा आवाज. भीतीने आमचा आवाजही फुटत नव्हता आणि थंडीतही आम्हाला घाम फुटला होता. पण विचार करायला वेळही नव्हता. थोड्या वेळाने टपरीवाला माणूसही त्याच्या स्कुटरवर निघून गेला असता कि आम्ही दोघेच तिथे. 

आम्ही त्याचे आभार मानण्यातही वेळ न घालवता झपझप चालायला सुरवात केली. निर्मनुष्य रस्ता. आता अंधारही वाढला होता आणखी.थोड्या वेळापूर्वी ज्या झाडांचे आकार सुंदर वाटले होते तेच आकार आता अंधारात भेसूर भासू लागले होते. ‘आपण बरोबर रस्त्याने चाललोय ना’ हे विचारायलाही कोणी नव्हते रस्त्यावर. आम्ही तसेच पायात त्राण नव्हता तरी उसने अवसान आणून झपझप चालत राहिलो. दोन कि.मी.चे अंतर पटकन पार करायचे एवढा एकच ध्यास होता त्यावेळी. 

आम्ही १५/२० मिनिटे गेलो असू तितक्यात एक आशेचा किरण दिसला. म्हणजे आमच्या मागून कोणतं तरी वाहन येत होतं त्याचा दिवा दिसला. एक कार आमच्या बाजूने पुढे निघून गेली. आम्ही दोघांनी हात उंच केले. गाडीत कोण होतं काही दिसत नव्हते. त्यांना आमचे हात दिसले की नाही असा विचार करत असतानाच ब्रेक लागून गाडी थांबली आणि मागे येऊन आमच्यापाशी थांबली. गाडीत दोन पुरुष पुढच्या सीटवर बसले होते. आता आमच्यापुढे असा प्रश्न होता कि निर्मनुष्य रस्त्यावर कोणीतरी भेटले म्हणून खुश व्हायचे आणि त्यांची मदत घ्यायची की इथे थांबण्यामागे यांच्या मनात काहीतरी वाईट विचार असेल तर, म्हणून मदतीला नकार द्यायचा. काहीच कळेना. आम्हाला ह्या द्वंद्वातून बाहेर काढायचं काम त्यांनीच केलं. 

गाडीच्या खिडकीतून डोकं काढून त्यातला एक जण म्हणाला, "काय रे पोरांनो, अश्या अपरात्री या भयाण आणि निर्जन रस्त्यावरून दोघंच कुठे चालला आहात? तुम्हाला कल्पना आहे का कि इथे हिंस्र श्वापदंही हिंडत असतात या वेळी आणि इथून चालणं किती धोक्याचं आहे ते? चला गाडीत बसा बघू आधी."

त्याने असे म्हटल्यामुळे आम्हाला अजूनच भीती वाटून आम्ही गाडीत बसलो पटकन. ‘पुढे काय होईल ते पाहू नंतर, जंगली प्राण्यांपासून तर सुरक्षित झालो आपण’ असा विचार आला मनांत तेंव्हा. 

गाडीत बसल्यावर लक्षात आलं की ते दोघं कोकणी भाषेत काहीतरी बोलत आहेत. ‘सिनेमात आपण बघतो तसा कट तर रचत नसतील ना आपल्या विरुद्ध?’ असा विचार मनात आला आणि आमची धडधड वाढू लागली. बाहेर जंगली प्राणी आणि गाडीत, ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असे अनोळखी दोन पुरुष. आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. आम्ही शांत बसून राहिलो आणि मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. थोडा वेळ गेल्यावर आमच्या मनस्थितीची त्यांना कल्पना आली असावी म्हणून ते दोघे आम्हाला बोलतं करायचा प्रयत्न करू लागले. हळूहळू आमचीही भिती थोडी कमी झाली. 

आम्हीही त्यांना त्यांच्याबद्दल माहिती विचारली. कोण आहेत, कुठे चाललेत वगैरे. आणि त्यानंतरच्या एका क्षणात आमचं सगळं टेन्शनच नाहीसं झालं की! त्यातला एकजण, आम्ही पणजीत ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो त्या हॉटेलचा मालकच होता, आणि दुसरा त्याचा ड्राइव्हर. त्याने आम्हाला पाहिल्यावरच ओळखले होते त्यामुळे न विचारताच त्याने आम्हाला हॉटेलमध्ये सोडले. 

आम्ही देवाचे शतशः आभार मानले. त्यांच्या रूपाने अश्या अवेळी देवच आमच्या मदतीला आला होता जणू. नंतरचा २० किलोमीटरचा प्रवास मस्त गप्पा मारत पार पडला. हे सर्व इतक्या सहज घडलं म्हणून, पण तसं झालं नसतं आणि कोणी वाईट माणसं आम्हाला भेटली असती तर न जाणो त्या लहान वयात आम्हाला कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं असतं ते.. अजुनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. 

ह्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडलो. हॉटेलमध्ये येऊन जेवलो आणि झोपलो. रात्री १२ च्या सुमारास कसल्यातरी मोठ्या आवाजाने जाग आली आम्हाला. बाल्कनीत येऊन पाहिले तर पोलिसांच्या गाड्या आणि अँब्युलन्स समोर दिसत होत्या. खूप लोक जमले होते, काय झालंय काही कळायला मार्ग नव्हता. आम्हीही खूप दमलो होतो. विचार करत परत झोपून गेलो. 

दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला खाली उतरलो, तेव्हा समजले कि आमच्या हॉटेलच्या समोरच्या जागेत पटांगणावर सिद्धार्थ आणि लीना ‘लिबरेशन डे इव्ह’च्या पार्टीतील ‘रेड अँड ब्लॅक’ डान्सला सुरुवात करणार, तोच सिद्धार्थच्या ट्राउझरच्या खिशात असलेल्या पिस्तुलमधुन अचानक गोळी उडाली आणि सिध्दार्थच्याच पोटात घुसली होती. सगळीकडे जाम कोलाहल माजला होता. नक्की काय झालं ते कोणालाच समजत नव्हतं. हा घातपात आहे कि अपघात यावर सर्व जनता तर्क-कुतर्क लढवीत होती. सगळा रंगाचा बेरंग झाला होता. सिद्धार्थला मात्र तातडीने जसलोकमधे भरती केलं. गोव्यात आता दंगल होते कि काय अशी भीती आम्हास वाटू लागली. त्या दिवसानंतर पणजीमधलं सगळं वातावरणच बदलून गेलं. दुकाने बंद केली गेली आणि सगळीकडे स्मशानशांतता पसरली. 

हनीमून ही सर्वांच्या आयुष्यातील कायम लक्षात राहील अशी घटना असते हे खरे, पण काही कारणांनी त्यात काही नाट्यमय घडले तर मात्र त्याचा कायमचा ठसा मनावर उमटल्याशिवाय रहात नाही. आज ४३ वर्षं झाली तरी कालच घडल्यासारखं वाटतंय सारं. दुसऱ्याच दिवशी आम्ही मुंबईला पोहोचलो. घर सोडून १०/१२ दिवस झाले होते. गोव्यात आलो तेव्हाचा मूडही राहिला नव्हता. थोड्या दिवसानंतर समजले कि सिद्धार्थ यातून वाचू शकला नाही. फार वाईट वाटले. 

अशी ही आमची अविस्मरणीय गोवा ट्रीप आणि हनीमून.

- स्नेहल केळकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा