जागरुकता

दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशामधल्या बीरमध्ये असलेल्या Deer Park नावाच्या संस्थेमध्ये गेले होते. फिरता फिरता एका पाटीकडे लक्ष गेलं. त्या पाटीवर लिहिलं होतं - Your body is here, but where is your mind? हिमाचल प्रदेशातल्या आणि सिक्कीममधल्या बौद्ध विहारांमध्ये छोट्या छोट्या घंटा टांगलेल्या दिसतात. वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्या वाजत राहतात. तिथल्या भिक्षूंनी सांगितलं की या mindfulness rings! ही जागरूकता, हा अवेअरनेस कशाबद्दलचा? आजूबाजूला जे घडतं आहे त्यातल्या आपल्या सहभागाबद्दलचा. किंबहुना, त्यात आपला सहभाग कशा प्रकारचा असावा याबद्दलचा. 

कधी-कधी आपण परिस्थितीच्या आहारी जातो, कधी जे घडतंय् ते आपल्याला पटलं नसलं तरीही नाइलाज म्हणून आपण जे काही होतंय् ते फक्त बघत राहतो. खूप वेळा असंही होतं की एखादी दुःखद घटना मनात घर करून राहते, एखादा अपमान, एखादा नकार जिव्हारी लागतो. आणि मग पुन्हा पुन्हा तेच तेच आठवत राहतं, भुलभुलैय्यात अडकल्यासारखी गत होते आपली. शरीर वर्तमानात अन् मन भूतकाळात असे दोन स्वतंत्र संसार सुरू होतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला प्रियकर अथवा प्रेयसीशिवाय दुसरं जग राहात नाही. प्रेमाच्या व्यक्तीपासून थोडंही दूर राहावं लागलं तरी तिचा जीव कासावीस होतो. आपण सगळेच यातल्या कुठल्या ना कुठल्या परिस्थितीला शरण गेलेलो असतो, जात असतो. आपापल्या परीनं स्वतःच्या वागण्याचं समर्थनही करत असतो. एकदा का बुद्धाशी ओळख झाली की हळूहळू का होईना पण या परिस्थितीत बदल घडायला लागतो. 

कुठल्याशा जपानी लोककथेत आहे त्याप्रमाणे एक पक्षी आपल्या खांद्यावर येऊन बसतो आणि आपली प्रत्येक कृती, मनात आलेला प्रत्येक विचार हा चांगला आहे का, तो आपलं आणि इतरांचं कल्याण करणारा आहे का, हे तो सांगत राहतो. अपरिहार्यपणे पंचशीलांचं स्मरण होत राहातं. वेळ मारून नेण्यासाठी एखादी थाप मारताना पटकन् "मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि" (खोटं बोलण्यापासून दूर राहणं ह्या नियमाचा मी स्वीकार करतो) हे आठवतं. मग खोटं बोलण्यासाठी जीभ रेटतच नाही. ही जागरूकता, हा अवेअरनेस वाढायला लागतो तसंतसं मनात येणारे विचार, हातून घडणारी कृती ह्या सर्वांवर आपलं नियंत्रण यायला लागतं. एखादी कृती हातून घडण्यापेक्षा ती जाणीवपूर्वक केली जाते किंवा टाळली जाते. वागण्यातला मेकॅनिकल आस्पेक्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. अन् त्यामुळेच भावनेच्या आहारी जाऊन जरी एखादी चुकीची कृती घडली तरी अपराधीपणाची, पश्चात्तापाची भावना मनात येण्याऐवजी ती कृती घडण्यामागची कारणपरंपरा शोधण्याचं काम हाती घेतलं जातं अन् पुन्हा तशी चूक घडणार नाही याची दक्षता घेतली जाते. कारण, नुसतं अपराधी वाटून, पश्चात्तापाच्या आगीत जळत राहून उपयोगाचं नाही. तसं करणं म्हणजे पुन्हा भूतकाळात गुंतणं. त्याऐवजी तसं पुन्हा घडू नये यासाठी काय करता येईल हा विचार जास्त महत्त्वाचा. बुद्धानं ही जागरूकता फक्त विचारांच्या किंवा स्थूल कृतींच्या संदर्भातच सांगितलीय् असं नाही. तर, चालणं, उभं राहाणं, बघणं, शरीराच्या निरनिराळ्या हालचाली करणं, झोपणं, जागं होणं यासारख्या यांत्रिक रीतीने केल्या जाणाऱ्या क्रियांच्या बाबतीतही त्यानं तितकंच जागरूक राहायला सांगितलं आहे. 

याच्या जोडीला बोलताना आणि मौन पाळतानाही व्यक्तीनं जागरूक राहाणं आवश्यक आहे असं तो सांगतो. जेव्हा एखादी व्यक्ती यापुढे जाऊन ध्यान करायला सुरुवात करते तेव्हा ती त्या-त्या वेळचं स्वतःचं शरीर, सुखदुःखादि मानसिक संवेदना, उच्च आणि नीच मानसिक अवस्था, आणि लोभ-द्वेषादि मनोवृत्ती यावर लक्ष केंद्रित करायला लागते. मनात येणाऱ्या विचारांबरोबर वाहून न जाता, त्यांच्यावर काही प्रतिक्रिया न देता विचारांकडे तटस्थपणे बघणं हे यात महत्त्वाचं आहे. या जगात काहीही नित्य, शाश्वत नाही; सारं काही अनित्य आहे, सतत बदलणारं आहे. याचं भान ठेवण्यासाठी बौद्ध तत्त्वज्ञानात जी साधना सांगितली गेली तिला अशुभभावना असं म्हणतात. यात साधक प्रेताच्या विविध अवस्था पाहून स्वतःचं शरीरही त्या प्रेतासारखंच नश्वर आहे यावर चिंतन करतो. अशा रीतीनं मरणाचं सतत भान ठेवणं म्हणजे जीवनाकडे निराशावादी दृष्टीकोनातून बघणं नव्हे तर अधिक जागरूकपणे जीवनाकडे बघणं, भूतकाळात किंवा भविष्यात गुंतून न पडता वर्तमान चांगल्या पद्धतीनं जगणं.

डॉ. लता देवकर 

संस्कृत व भाषाशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर संस्कृत या विषयामध्ये पीएच्.डी. पदवी प्राप्त केली. २००० ते २०१२ या कालावधीत उत्तर प्रदेशातील सारनाथ, वाराणसी येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटन स्टडीज या विद्यापीठाच्या तिबेटी-संस्कृत कोशप्रकल्पात नोकरी केली. त्यानंतर फिलिप्स विद्यापीठ, मार्बुर्ग, जर्मनी येथे पोस्ट-डॉक् करण्यासाठी २०१२ ते २०१४ या कालावधीसाठी अलेक्झांडर फॉन हुंबोल्ट फाऊंडेशनची प्रतिष्ठेची फेलोशिप मिळाली. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत. अभिजात तिबेटी भाषा, हस्तलिखितशास्त्र, टेक्श्च्युअल क्रिटिसिझम, रिसर्च व मेथडॉलॉजी हे विषय शिकवतात.