महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

गणेशोत्सव 

५ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी GIIS क्वीन्सटाऊन येथे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून यंदाच्या गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली.  
जे जे उत्तम 

पहिल्या दिवशी संध्याकाळी आरती आणि प्रसादानंतर 'जे जे उत्तम' कार्यक्रम सादर झाला. साहित्य वाचनाच्या या कार्यक्रमात यंदा 'ऐतिहासिक साहित्य' हा विषय होता. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पानिपत, स्वातंत्र्य समर यांसारख्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर आधारित पुस्तकातील उतारे वाचकांनी अतिशय उत्तम रित्या सादर केले. त्या त्या कालखंडाचे चित्रच डोळ्यासमोर उभे करण्यात वाचक नक्कीच यशस्वी झाले. अथर्व, अनुष्का सारख्या लहानग्यांनीही पावनखिंड आणि चंद्रगुप्ताच्या गोष्टी वाचून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. एकूण १२ सदस्यांनी साहित्य वाचन केले. कार्यक्रमाचे निवेदन केशव पाटणकर यांनी उत्तमरीत्या सांभाळले. प्रेक्षकांच्या उत्साही उपस्थितीमुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगला आणि गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाची यशस्वी सांगता झाली. अथर्वशीर्ष पठण 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, मंडळाच्या अध्यक्ष अस्मिता तडवळकर आणि श्री. योगेश तडवळकर यांच्या हस्ते गणरायाची महापूजा यथासांग पार पडली. त्यानंतर १५० हुन अधिक भाविकांनी एकत्रितपणे अथर्वशीर्ष पठण केले. श्री. जोशी गुरुजी यांचे मार्गदर्शन दोन्हीसाठी लाभले होते.
कॉर्पोरेट कीर्तन

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ वाजता, GIIS ऑडिटोरियममध्ये कॉर्पोरेट कीर्तन रंगले. भारतातून आलेल्या श्री समीर लिमये आणि श्री शरद पोंक्षे यांनी कीर्तन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री हर्षवर्धन भावे , श्री समीर लिमये, श्री शरद पोंक्षे, श्री नंदकुमार देशपांडे आणि सौ अस्मिता तडवळकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिका बनवण्यात ज्यांचे योगदान लाभले त्या ‘स्मरणिका-टीम’ ला मंडळातर्फे भेट देऊन गौरवण्यात आले.

गणेशोत्सवाला अनुसरून श्रोत्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन दोन्ही व्हावे ह्या हेतूने हा कार्यक्रम मंडळाने आयोजित केला होता. कीर्तनकारांना हार्मोनियमवर अक्षय अवधानी आणि तबल्यावर श्री संतोष अंबिके यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. समर्थ रामदास स्वामींच्या कालातीत विचारांवर आधारित हा कार्यक्रम, ३५० वर्ष झाली तरी समर्थांचे उपदेश आजच्या काळात तंतोतंत उपयोगी पडू शकतात, अशी अनुभूती देणारे कीर्तन सादर केले गेले. १५० हुन अधिक सदस्य आणि सदस्येतर श्रोत्यांनी कीर्तनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. महाराष्ट्र मंडळातर्फे सुचेता बाबर यांनी काढलेली गणपतीची चित्रे देऊन कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

- विशाल पेंढारकर 

संतवाणी 

गणेशोत्सवात चौथ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी, संतवाणी हा भक्तिगीते आणि अभंगांचा कार्यक्रम मंडळाचे सभासद आणि गणरायाच्या भक्तांच्या समोर सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या थोर सुपरिचित संतांच्या वांङ्मयातून निवडक रत्ने या सादरीकरणासाठी वेचली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांपासून, ते समर्थ रामदासस्वामी, सोयरोबानाथ यांसारख्या थोर संतांच्या अजरामर कार्याचा अनुभव व संगीतमय श्रवणाची मेजवानीच यावेळी श्रोत्यांना मिळाली. मंडळाच्या उत्साही, मेहनती आणि गुणवंत गायक-वादक कलाकारांनी हा अनुभव अविस्मरणीय करण्यात कसर ठेवली नाही, आणि सर्वांचे कौतुक पदरात पाडून घेतले!

ऑगस्ट महिन्यात दिनांक १३ रोजी, ’सिफ़ास’ (सिंगापूर फ़ाईन आर्ट्स सोसायटी) या कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेच्या खास आमंत्रणावरून म.मं.स्वरगंधने “संतवाणी” चे प्रथमतः सादरिकरण केले होते व त्या कार्यक्रमासही अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. पण हा प्रवास इथेच न थांबता, ’सिंगापूर रामकृष्ण मिशन’ या संस्थेच्या निमंत्रणावरून, नवरात्र-सोहळ्यात पुज्य-दुर्गादेवीच्या समोर, मिशनच्या मंगल वातावरणात, संतवाणी संक्षिप्त स्वरूपात सादर झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास अनेक कार्यकर्त्यांचे, कलाकारांचे आणि सभसदांचे सहाय्य लाभले त्या सर्वांचे आभार! 

- स्मिता अंबिके
गणपती विसर्जन मिरवणूक 

गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस गाजला तो मंडळाच्या उत्साही सभासदांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने. नेहेमीप्रमाणे गणरायाची आरती आणि प्रसाद झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु झाली. उत्तरपूजेनंतर ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर वाजत गाजत बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' असे आर्जव करीत भावपूर्ण निरोप दिला. 
विविध गुणदर्शन 

गणेशोत्सवाची सांगता शनिवारी १० सप्टेंबरला, विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने दणक्यात झाली. GIIS ऑडिटोरियममध्ये रंगलेल्या या कार्यक्रमात १०० हुन अधिक लहान-मोठ्या सभासदांनी सहभाग घेतला होता. या वेळच्या गणेशोत्सवाची केंद्र-कल्पना ही मराठी चित्रपटसृष्टीचा सोनेरी इतिहास अशी असल्यामुळे वेगवेगळ्या कालखंडातील चित्रपटांमधल्या गीतांवर आधारित नृत्य, संगीत यांनी ती संध्याकाळ अतिशय अविस्मरणीय झाली. 'लख लख चंदेरी तेजा' पासून 'झिंगाट' पर्यंत अनेक लोकप्रिय गीतांना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या निवेदनामधूनही मराठी चित्रपटसृष्टीचा सुंदर आढावा घेण्यात आला. 

झी टीव्ही तर्फे उत्तम सादरीकरणासाठी एक स्पर्धाही या वेळी घेण्यात आली ज्यासाठी शांता रती आणि सुबीना खनेजा परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. त्यांनीही एकंदर कार्यक्रमातील विविधता, नृत्य कौशल्य, त्यातून झालेलं महाराष्ट्र संस्कृती दर्शन याचं भरभरून कौतुक केलं. उत्कृष्ठ सादरीकरणाची स्पर्धेतली पारितोषिके पुढील गटांनी पटकावली - मोठा गट - सोनाली नाईक यांचा समूह आणि लहान गट - आरोही टेमुर्णीकर समूह.

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) साठी पुढचं पाऊल ठरणारी एक महत्त्वाची घोषणाही अध्यक्ष अस्मिता तडवलकर यांनी याच कार्यक्रमात केली ती म्हणजे MMS चे App त्यांनी यावेळी सादर केले. मोबाईल फोनवरूनच सर्व व्यवहार करणाऱ्या नव्या पिढीने याचे उत्साहाने स्वागत केले. 

४०० सभासदांची उपस्थिती लाभलेल्या रंगतदार सोहळ्याची सुग्रास सह-भोजनाने सांगता झाली.
भोंडला, गरबा आणि दांडिया

अश्विन शुद्ध प्रतिपदेस नवरात्र घटस्थापना होते. या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करतो आणि पावसाचा परतीचा प्रवास सुरु झालेला असतो. अचानक ढग दाटून येतात, विजा कडाडतात आणि धो धो पाऊस पडून परत शांत होतो. भोंडला म्हणजे रब्बीच्या हंगामातील पिकं अधिक जोमाने तरारून वर यावीत म्हणून त्यांना अभ्यंगस्नान घालणाऱ्या या हस्त नक्षत्राची पूजा.

महाराष्ट्र गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात गुजरातमध्ये गरबा ही नृत्यशैली देवीसमोर फेर धरून सादर केली जाते. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे आयोजित भोंडला, गरबा आणि दांडिया ९ ऑक्टोबरला ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे झाला. कार्यक्रमाची सुरुवात भोंडल्याने झाली. हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची मूर्ती मधोमध ठेऊन तिच्याभोवती लहान मुली आणि स्त्रियांनी फेर धरून भोंडल्याची गाणी गायली. 

भोंडल्यानंतर देवीची आरती झाली आणि मग पारंपरिक गुजराथी गाण्यांवर रंगीबेरंगी वेशभूषा करून आलेल्या आपल्या मंडळींनी फेर धरून नृत्याला सुरुवात केली. बच्चे कंपनीने सुद्धा खूप धमाल केली. गरब्याच्या फेरी नंतर बेस्ट ड्रेसची पारितोषिके जाहीर करण्यात आली. बेस्ट ड्रेस फिमेल- मीनल रायकर, बेस्ट ड्रेस मेल- सुगम काळे आणि बेस्ट ड्रेस चाईल्ड- ध्रुवी रुंगानी

ब्रेकनंतर दांडियाला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या गुजराती आणि बॉलीवूड गाण्यांनी रंगत वाढतच गेली. सनेडो- सनेडो या गाण्यावर सगळ्यांनी लयबद्ध नृत्य करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाची सांगता बेस्ट डान्सर्सची पारितोषिके देऊन करण्यात आली.

बेस्ट डान्सर मेल- सचिन वर्तक, बेस्ट डान्सर फिमेल - मीनल लाखे आणि बेस्ट डान्सर चाईल्ड - आरोही
टेमुर्णीकर यांना देण्यात आले. मंडळाचे सदस्य आणि सदस्येतर मिळून दोनशे नृत्य रसिकांनी या कार्यक्रमाची मजा लुटली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा