The Pursuit Of Happyness – अर्थात शोध आनंदाचा
या वेळच्या ऋतुगंध अंकाचा विषय वाचला आणि काही दिवसांपूर्वीच पाहिलेल्या एका सुंदर चित्रपटाची आठवण झाली. २००६ साली आलेला “The Pursuit Of Happyness” हा तो चित्रपट. चित्रपटाच्या शीर्षकातले हॅपिनेसचे स्पेलिंग मुद्दामहून चुकवले आहे. चित्रपटाचा हिरो ख्रिस गार्डनर (विल स्मिथ) आपल्या मुलाच्या डे केअर सेन्टरच्या भिंतीवर चुकीचे स्पेलिंग बघून वैतागतो आणि म्हणतो, “The spelling is wrong. There should be I in Happiness”. बास, इथेच हा चित्रपट आवडायला सुरवात होते. 

चित्रपटाची कहाणी ख्रिस गार्डनर आणि त्याचा ५ वर्षांचा मुलगा ख्रिस्तोफर जुनिअर (जेडन स्मिथ – विल स्मिथचा खरा मुलगा) या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरते. ख्रिस हा पोर्टेबल एक्स-रे स्कॅनर्सचा एक फिरता विक्रेता आहे, ज्याला आपल्या कुटुंबाची (बायको आणि मुलगा) रोजीरोटी सुरु ठेवण्यासाठी फार पायपीट करावी लागते, कष्ट करावे लागतात. एके दिवशी ख्रिस Dean Witter Reynolds या ब्रोकरेज कंपनीत काम करण्याचा धाडसी निर्णय घेतो कारण त्याला – त्याच्या मते – गणिताची आवड असते आणि analytical प्रॉब्लेम्स सोडवणे त्याला सहज जमू शकेल असा त्याचा विश्वास असतो. या निर्णयाला वैतागून त्याची बायको त्याला आणि स्वतःच्या पोटच्या मुलाला सोडून घरातून निघून जाते. 

ब्रोकरेज कंपनीच्या इंटरव्ह्यूची आदली रात्र त्याला पार्किंग बिल्स न चुकवल्याने पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये काढावी लागते. इंटरव्ह्यूच्या वेळी तर त्याचा अवतार झालेला असतो. तरी देखील तो अधिकाऱ्यांना प्रभावित करून नोकरी मिळवतो. नोकरी कसली तर शिकाऊ उमेदवाराची! बिनापगाराची! ६ महिन्यानंतर काम आवडले नाही तर रिकाम्या हातांनी बाहेर पडावे लागणार या धास्तीची! 

त्याच्यावरच्या संकटांची मालिका इथेच संपत नाही. प्राप्तीकराची (income tax) थकबाकी म्हणून त्याच्या बँक खात्यातून ६०० डॉलर्स जप्त होतात, आणि त्याच्या खात्यात २२ डॉलर्स शिल्लक उरतात - फक्त २२ डॉलर्स! परिणामी राहती भाड्याची जागा सोडून त्याला मुलासकट एक रात्र रेल्वे स्टेशनच्या रेस्टरूममध्ये (योग्य शब्द – मुतारीमध्ये) घालवावी लागते. त्यावेळी विलने जो अभिनय केला आहे त्याला खरोखर तोड नाही. विल एक पाय दुमडून भिंतीला पाठ लावून बसलेला, त्याच्या मांडीवर त्याचा मुलगा दमून झोपलेला, आणि बाहेरून दार ठोठावण्याचे आवाज, मध्येच ऐकू येणारे अर्वाच्य शब्द, ते मुलाच्या कानावर पडून त्याची झोपमोड होऊ नये म्हणून त्याच्या कानावर हात ठेवून स्वतः अश्रू गाळत बसलेला विल प्रेक्षकांच्या डोळ्यात खरेच पाणी आणतो. 

अशाच पुढील प्रसंगांमध्ये त्या दोघांना बेघरांसाठी बांधलेल्या निवाऱ्यामध्ये राहावे लागते. ख्रिसला रोज ५ वाजता ऑफिस सुटल्यानंतर मुलाला डे केअर सेन्टरमधून घेऊन रात्रीपुरता निवारा मिळावा म्हणून धर्मशाळेसमोर रांगेत उभे राहावे लागते. संध्याकाळची बस गाठण्यासाठी ख्रिसने केलेली यातायात, बिघडलेला एक्स-रे स्कॅनर दुरुस्त करण्यासाठी रात्रभर जगणारा ख्रिस, आणि मधूनच होणारे बापलेकांचे उद्बोधक संवाद.... सारेच प्रसंग आपल्याला चटका लावून जातात. 

या सर्व प्रसंगांमध्ये मला सर्वात भावलेला मंत्र म्हणजे “वर्तमानात जगा!” हा होय. ख्रिस बऱ्याच ठिकाणी म्हणून जातो, “आजचा दिवस निभावला, पुढचे पुढे.” असे दिवस काढत असताना ख्रिस कधीही आपल्या मुलाची आबाळ होऊ देत नाही. इतकेच नव्हे, तर सहकाऱ्यांनादेखील आपल्या परिस्थितीची कल्पना येऊ देत नाही. 

होता होता ख्रिसचे शिकाऊ उमेदवारीचे ६ महिने संपतात आणि वेळ येते निकालाची! दरम्यान ख्रिसने काही लोकांना पॉलिसी विकून आपले लक्ष्य पुरे केलेले असते; त्यानंतर त्याला लेखी परीक्षाही द्यावी लागते. निकालाच्या दिवशी ख्रिस नवीन शर्ट घालून ऑफिसमध्ये जातो; बॉसला सांगतो की आज शेवटचा दिवस आहे म्हणून मी नवीन शर्ट घातलाय. मॅनेजर हसून म्हणतो, "उद्या तुला ऑफिसला येताना हाच शर्ट घालावा लागेल कारण तुला कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे." गेल्या ६ महिन्यांमधील तगमग आठवून ख्रिसच्या – आणि प्रेक्षकांच्यादेखील - डोळ्यांमधून अश्रू ओघळतात. ख्रिस तसाच कंपनीतून बाहेर पडतो, रस्त्यावर येतो आणि मनसोक्त रडून घेतो. त्यानंतर तो मुलाला डे केअर सेंटरमधून घेतो आणि चित्रपटाच्या शेवटी बापलेक आनंदाने गप्पा मारत जातात. 

चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारलेली असून ख्रिस गार्डनर (जन्म : ९ फेब्रुवारी १९५४) खरेच अस्तिवात आहे. १९८० च्या सुरुवातीला बेघर असणारा आणि आपल्या मुलाची (ख्रिस्तोफर जुनिअर) जबाबदारी वाहणारा ख्रिस आज एका ब्रोकरेज फर्मचा अतिश्रीमंत मालक आहे. त्याच्या आठवणींचे एक पुस्तक त्याने लिहिलेय, ज्याचे नांव आहे “The Pursuit Of Happyness”. या चित्रपटाच्या अगदी शेवटी बापलेक गप्पा मारत चाललेले असतांना एक सूटबुटातला माणूस त्यांच्या बाजूने गेलेला दाखवला आहे. हाच खराखुरा ख्रिस गार्डनर बरे का! 

चित्रपटात एके ठिकाणी ख्रिस त्याच्या मुलाला म्हणतो, “तुझ्याकडे एक स्वप्न आहे आणि तुलाच ते पुरे करायचे आहे. लोक स्वतः काही काही गोष्टी करू शकत नाहीत; मग ते तुला सांगायला येतात की बाबा रे! तुला हे जमणार नाही बरे का. दुर्लक्ष कर त्यांच्याकडे! तुला जे हवंय ते मिळव, बास, संपले!” “वर्तमानात जगा” याचा यापेक्षा सोप्या शब्दांत अर्थ दुसरा कोण सांगू शकेल ? 

या चित्रपटाचा मराठी रीमेक २०११ साली “अंकगणित आनंदाचं” या नावाने आलाय. रसिक वाचकांनी दोन्ही चित्रपट पाहून ठरवावे आपल्याला कोणता आवडतो ते, काय!राजीव खरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा