मालवून टाक दीप

मालवून टाक दीप हे गाणे मी वयाच्या १२/१३ व्या वर्षी ऐकले. गाणे शिकायला तेव्हा सुरुवात झाली होती. राग समजला नाही पण सा रे ग म प आणि कोमल ध हे स्वर हृदयाला भिडले आणि जे मनात रुतते तेच कंठातून येणार. "चेतवून अंग अंग" ही ओळ आली न आली की अम्माची हाक आली, "गाऊ नको ग हे गाणे, वय नाही आहे तुझे".

खरंतर शृंगार रस मराठी कवितेला नवीन नाही. लावण्या ह्या त्यात भिजल्या आहेत. लावणीचा शृंगार उघडा, मोकळा, गावरान मामला. सुरेश भटांची कविता मात्र मोकळी आहे पण उथळ नाही, शृंगारिक आहे पण अश्लील नाही. मर्यादेच्या सीमा रुंद झाल्या आहेत पण मोडल्या नाहीत. वासना आहे पण ती जाळून टाकणारी नाही. मालवून टाक दीप ही विराणी आहे. प्रियकराची असीम ओढ आणि त्याच्या विरहाचे किंवा त्याच्याकडून दुर्लक्षित झाल्याचे दुखः ...."गार गार या हवेत, घेऊनी मला कवेत मोकळे करून टाक एकवार अंतरंग". प्रेम म्हणजे समर्पण हे नायिकेला कळले आहे पण समर्पण हे दोन्ही बाजूने असते .... submission आणि surrender यात हाच तर फरक आहे!

वपुंचे एक अतिशय सुंदर वाक्य आहे, "समागमात स्त्रीला अंधार हवा असतो आणि पुरुषाला उजेड. स्त्रीने डोळे मिटले की ती चैतन्यापर्यंत पोहोचते, पुरुष "मृण्मयात" मातीच्या शरीरापाशी थांबतो". अगदी समागमाच्या क्रियेचा जरी विचार केला तर जे बीज गर्भाशयात रुजवले जाते त्या नंतर त्याचा सहभाग संपतो का? "A woman needs completion while man seeks a release!" याचा अर्थ एवढाच आहे का की स्त्री शरीराच्या माध्यमातूनही मनाचा तळ शोधते आणि तो, मनाचा ताबा शारीरिक पूर्ततेसाठी घेतो ? भटांच्या कवितेचे रसग्रहण मला शक्य नाही आणि तो प्रयत्न सुद्धा मी करणार नाही. त्यांच्या कवितेतील भावनांची खोली मोजता येत नाही. ती ज्याने त्याने त्याच्या वकूबानुसार अनुभवावी. मालवून टाक दीप, तरुण आहे रात्र अजुनी, आताच अमृताची बरसून रात्र गेली , मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली ... या सर्वच रात्रींचा रस शृंगाराचा, पण पोत मात्र वेगळा. रात्रीच्या प्रत्येक प्रहराचा मूड वेगळा. त्या जागवणाऱ्या स्त्रीचा रंग वेगळा. सुरेश भटांना स्त्रीचे कोणते रूप अभिप्रेत आहे, अभिसारिका की समर्पिता? मालवून टाक दीप मध्ये न विझलेल्या वातीसारखी रात्रीच्या सुखाची तृप्ती रेंगाळलेली आहे, सरल्या रात्रीचा अनुभव गात्रांगात्रांतून जागा आहे. जी जवळीक झाली आहे त्याच्या खुणा तिच्या अंगावरून आणि मनातूनही पुसल्या गेल्या नाहीत.

परोमा सिनेमा पहिला आहे का ? "परोमा" म्हणजे सर्वगुणसंपन्न स्त्री. असतेच ती, सून ,पत्नी, आई, काकी...मोठे कुटुंब आणि त्यांची लाडकी ती, पानही हलत नाही तिच्याशिवाय आणि तो येतो. राहुल, एक बंगाली पण आता अमेरिकन फोटोग्राफर, त्याला दुर्गा पूजा उत्सवाचे फोटो हवे असतात. तो तिला तिचे नाव विचारतो आणि ती गोंधळते, ती आई असते, काकी, ताई, कोणीही. चौकटीतली स्त्री … तू काहीही म्हण…ती गोंधळते खरंतर. पण तो तिला तिच्या नावाने हाक मारतो…परोमा. इथे एक वेगळा प्रवास सुरू होतो…तिचा स्वतःचा, तो फक्त सहप्रवासी. कलकत्त्याच्या गल्ल्या, तिचे माहेर, त्यातली खोली, गच्ची. त्यात लावलेले एक झाड पण त्याचे नाव नाही तिला आठवत…किती गोष्टी विसरल्या असतात या वीस बावीस वर्षात आणि त्याची तिला जाणीव नसते …इतरांना त्याची पर्वा नसते त्यापेक्षा त्याचे महत्त्व त्यांच्यासाठी शून्य असते… गंजत पडलेली तिची सतार. तो हातात देतो तिच्या आणि तारा जुळतात … त्याबरोबर मने आणि मग शरीरेसुद्धा … एक वेगळा अनुभव, पूर्णत्वाचा …असे नाही की ती नवऱ्याकडून दुर्लक्षित आहे. शारीरिक संबंधांना ती आसुसलेली नाही. जे घराघरात असतेच ते तिच्याही आहे. पण शरीराने एकत्र येणे ही क्रिया असते का? त्या तिथे फ़ुलाफ़ुलात, पेंगते अजून रात हाय, तू करू नकोस एवढ्यात स्वप्न भंग, भर ओसरला आहे, आवेग नाही, उन्माद नाही पण जडावलेल्या पापण्यांवर अजून धुंदी आहे. देहाला सुटलेली ती सूक्ष्म थरथर बाकी आहे. अपेक्षा आहे ती फक्त एका स्पर्शाची, रात्रीच्या घटनेशी जवळीक सांगणाऱ्या एका मिठीची. पण पाठ फिरवून झोपणाऱ्या तिच्या पतीला ही असोशी का समजत नाही हा मूक प्रश्न आहे. हे तुला कसे कळेल? कोण एकटे जळेल? सांग का कधी खरेच एकटा जळे पतंग? मालवून टाक दीपमध्ये आहे ती तृप्तीमधून आलेली अतृप्तता. ही अतृप्तता संपते ती राहुलच्या संगतीत. एकत्र आलेले दोन जीव, एकमेकांच्या कुशीत, नुसतेच पहूडलेले. जाग आलेली आहे तरीही उठावंसं वाटत नाही. राहुलच्या पाठीवर ती सतारीचे सूर छेडते ....तिचे यमन गुणगुणणे आणि त्याची फक्त डोळ्याने दिलेली दाद. काय हा तुझा श्वास , दरवळे इथे सुवास, बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग प्रेमाचा एक तरल आणि मदीर अनुभव... त्यातला जो सात्विक गोडवा आहे तो जसाच्या तसा लताबाईंच्या आवाजात आहे.

मालवून टाक दीप हे मराठी कवितेला पडलेले पहाटेचे स्वप्न आहे, हृदयनाथ यांच्या प्रतिभेने नटलेले. पण त्याचे खरे यश आहे ते लताबाईंच्या दैवी आवाजात. त्या आवाजातील आर्ततेने त्या गाण्याला एक वेगळाच स्तर दिला आहे....प्रेम रसाचे, शृंगार रसाचे भक्ती रसात परिवर्तन करून...

- प्रिया प्रभुदेसाई


७ टिप्पण्या:

 1. अप्रतिम रसग्रहण. हया गाण्याला जितकी दाद द्यावी तितकीच हया लेखाला.

  उत्तर द्याहटवा
 2. आपल्या ऋतुगंध अंकातील " मालवून टाक
  दीप" या लता मंगेशकर यानी गायलेलं, हृदयनाथ यांचं संगीत असलेलं आणि दिग्गज गजलकार सुरेश भट यांच काव्य असलेलं अप्रतीम भावगीतावरचं तेवढंच
  अभ्यासु व सुंदर रसग्रहण सौ प्रिया प्रभूदेसाई
  यांनी केलं आहे. वाचकांना एक चांगला
  लेख वाचल्याचं समाधान नक्कीच मिळेल.

  उत्तर द्याहटवा
 3. तुझी प्रतिभा सगळ्या सीमाच्या पलीकडचीच आहे, तुझ्यासाठी फेसबुक म्हणजे एक विहीर आहे.
  अभिनंदन !
  अशीच तुझी प्रतिभा दिगंतरात, साता समुद्रापार जावो.

  उत्तर द्याहटवा
 4. सुंदर, त्या नेहमीच असे सुंदर लिहितात
  उत्तर द्याहटवा