संपादकीय

ऋतुगंधच्या शरद २०१६ - 'मैत्री' विशेषांकात सर्व मित्र-मैत्रिणींचे स्वागत !! 

नाती-गोती मालिकेतील तिसरा अंक आपण मैत्री या अनोख्या नात्याला वाहिलेला आहे. मैत्री हे नाते खरंच खूप विशेष आहे कारण इतर अनेक नातेबंधांनादेखील मैत्रीचे रूप घेण्याचा मोह आवरत नाही. जसं की - मुलं मोठी झाली की आई वडिलांचं मुलांशी मैत्रीचं नातं तयार होतं. आपल्या जोडीदाराविषयी सुद्धा सर्वांना असंच वाटतं की तो आपला सगळ्यात चांगला मित्र झाला पाहिजे. त्यामुळे तसं पाहिलं तर सर्वसमावेशक असं हे नातं पण तरीही प्रत्येकासाठी मैत्रीचा अर्थ, संदर्भ वेगळा; प्रत्येक मैत्रीची गाठ वेगळी आणि वीणही वेगळी असते. वर्गात एका बाकावर बसणारा, शिक्षेपासून परीक्षेतल्या उत्तरांपर्यंत सगळं आपल्याशी वाटून घेणारा मुलगा आपला मित्र असतो, परदेशातल्या अनोळखी वातावरणात प्रेमाने आपणहून ओळख करून घेणारे शेजारचे आजोबा आपले मित्र असतात, कधीही प्रत्यक्ष भेट न झालेला पण समान आवडीनिवडींमुळे धागा जुळलेला फेसबुकवरचा मित्राचा मित्रही आपला मित्र असतो.

अश्या विविधरंगी मैत्रीचे अनेक पैलू आपल्याला या अंकात बघायला मिळतील ज्यात कोणी आपल्या आत्तापर्यंतच्या मित्र - परिवाराचा प्रेमळ आढावा घेतला आहे, कोणी वेगवेगळ्या रूपात मैत्र कसे भेटते हे सांगितले आहे, एक यंत्रमानवाच्या मैत्रीची आगळी वेगळी विज्ञानकथाही अंकात आहे तर कोणी निसर्गच सख्खा मित्र म्हणून लाभल्याचं म्हटलं आहे. त्यांचे लेख वाचताना तुम्हालाही आपल्या मित्र-मैत्रिणींची आठवण आली आणि धावपळीच्या दिनक्रमातून वेळ काढून त्यांच्याशी बोला-भेटायची इच्छा झाली तर या अंकाचा उद्देश यशस्वी झाला असं म्हणता येईल!

याशिवाय वेगळ्या वाटा, आरोग्यम धनसंपदा, पाककृती आणि सिंगापूर सिरीज ही आपली विशेष सदरे आणि इतर कविता, प्रवासवर्णनही वाचनाची रंगत नक्कीच वाढवतील. 

तेंव्हा मित्रांनो लवकर वाचा आणि अंक कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 


आपली,
ऋतुगंध समिती २०१६


२ टिप्पण्या:

  1. मुखपृष्ठ फार सुरेख आहे. सुखद, मनमोहक रंग आणि आकार! ""तसं पाहिलं तर सर्वसमावेशक असं हे नातं पण तरीही प्रत्येकासाठी मैत्रीचा अर्थ, संदर्भ वेगळा; प्रत्येक मैत्रीची गाठ वेगळी आणि वीणही वेगळी असते."" हे फार आवडले!

    उत्तर द्याहटवा
  2. अंक वाचत आहे. पण प्रथम दर्शनीच मुखपृष्ठ बघून आणि संपादकीय वाचून अंक आवडला . ऋतुगंधच्या टीम चे अभिनंदन.पुढील प्रतिक्रिया अंक वाचताना कळवते .
    मोहना

    उत्तर द्याहटवा