दुविधा (मुखपृष्ठ कथा)

माझं नाव पक्या , वय असंल आट - दा वरसाचं , ह्यो सोबत्यांच्या व जग्गू दादाच्या बोलण्यावरनं केलेला अंदाज. मला आटवतंय तवा पासनं म्या रस्त्यावर भीक मांगतो, जमलं तर पाकीट मारतो व कंदी मंदी दुकानातून चीज वस्तू उडवतो. जग्गू दादा यात भारी हुशार. सम्दा त्यानीच शिकवलं. कसं करायचं ते बी दाऊन दिलं. तसा तो दिलदार पण सायंकाली, खाली हात घरी आलं तर जाम हानतो. तसे माझे दिस लै मजेत चालले वते. सकाली हूट्लं की असल त्या अवतारात, फाटक्या कपड्यात सांगितलेल्या चौकात उब रायचं. टर्न बाय टर्न छोट्याला कडेवर घेऊन हे काम करायचं, बाकी दिवशी स्वतंत्र, मजेत भीक मागायची. कारच्या काचंला त्वांड लावायचं नी, कधी हात कपालाशी तर कधी पोटाशी न्यायचा , थोबडा रडल्यावानी करायचा. बस ! बाया बापडयांना दया आलीच बगा… कदी मी आनि ना-या शिंडिकेड करून कार सीटवरचा मोबाईल अनि पाकीट बी उडवायचो , मंग त्या दिवशी लगेच चौक बदलायचा, कारन लकसात येऊन त्यो बाप्या परत आला तर हो ?

दुपार झाली, की दादा खायला बी आनून द्यायचा, वर कदी केक, कदी आईसक्रीम सुदा. की परत चौकात कामाला सुरवात. सांच्याला जमलेली पुंजी दादाला दिली की हुल्लडबाजी करायला आमी पोरंसोरं स्वतंत्र. अरे हो, तुमची सगल्यांशी ओलख रायलीच की. माज्या सोबत खोलीत गोट्या, नाम्या,शेवंता, ना-या , दगड्या, व सुगंदा पन रहायाचे.

मी हितं कसा आलो मला म्हाईत नाय. मला थोडं आटवतंय ल्हानपनचं. मला गोल्या, चाकलेट भारी आवडायची. म्या हट्ट करायचो, भोकाड पसरायचो. कोनी मला द्यायचे न्हाई , दात का काय खराब होतील असं म्हनायचे, कोन ते आटवत नाही. जग्गू दादा मला बगिच्यात भेटायचा, चाकलेट द्यायचा. आताबी खुश झाला की देतो. कदी मंदी शिणेमा बी दावतो.

सा मैनाआंदी हितं बकुला ताई बी रायची. आमची बकुला ताई मोटी व्हती. टकाटक साडी नेसायची, लय ग्वाड ग्वाड बोलायची. तिच्या कामावर जग्गू दादा लै खुश असायचा. हल्ली ती दिसत नाय, म्हनून जेवता जेवता ,दगड्याने दादाला इचारलं, "बकुला ताई कुटं गेली, दादा?" दादा म्हनला, " तिला मोटा चानस मिलला, बडती मिलाली, आजाद झाली, सोतंत्र झाली, परदेसात गेली... भू SSSर." त्या नंतर जग्गू दादा कडं मोटर गाडी आली. आमाला पन फिराया घिऊन जाया लागला. कदी वरली तर कदी जुहू बीच. तिथे लै मालदार लोक राहतात म्हनं. आमी ईचारलं आमाला कदी आजाद करनार? कदी परदेसात धाडनार? म्हनला, "तुमचा तिथे काय बी उपयोग नाई , पन लहानग्या छोटू चा लग्गा लागल असं वाटतया." आमाला वाटलं मजाक करतोय. पन म्हनला, तेला शर्यतीला पाठवायचंय. आमी एकमेकाकडे बघत रायलो. या छोटूला चालता बी येत नाय, कडेवरचं पोर हे. पन दादाला कोन इचारनार, जाऊद्या झालं. मग समजलं कुठेशी उंटाच्या शर्यतीला छोटी पोर सोर लागतात. छोटू गेला तर आमी सारे मजेत आनि सोतंत्र होऊ, तेसनी कडेवर घिऊन उनात भीक मागताना लै दमाया होतं हो. शेवंता आनि सुगंदानी बी ईचारल, "आमी कधी सोतंत्र होनार रे दादा? " दादा खेकसला " तुमाला स्करट बी नीट बांधता येत नाई आन चालल्या फारेनला. साडी घालता येऊ लागली की बगू. चला झोपा आता गुमान." 

गेल्या हप्त्याला आमच्या खोलीत आनी तीन मुलं आली. पाशा, अब्दुल आनि रेहाना. अब्दुल सारखा रडत व्हता. तिघेही लहान व्हते चार पाच साल उमरचे, अब्दुल च्या गुडग्याशी पॅटला रक्ताचे डाग दिसत व्हते. हातात कुबड्या व्हत्या. दादा त्याचे जास्तच लाड करत व्हता. जेवण भरवत व्हता. म्हनत व्हता.. " थोडं सबूर कर बेटा. तू लै कामाचा मानुस हायेस. " आमच्या नंतर द्यानात आलं की तेचा गुडग्या पासनं पाय कापलेला व्हता. या तिघां मुळे आमाला खोलीत अडचन भासाया लागली. आमचं सोतंत्र कमी झाल. जागा पुरेना झाली.

आज सकाली चौकात मोटरसायकल वर एक मिशीवालं काका आलं. म्यां रोजच्या परमानं हात पसरला, "पाच रुपे तरी द्यावा की ओ काका”. त्यानी पचास दिले व खिशातून फोटु काढून इचारलं, “हा मुलगा पाहिला का रे कुठे?" मी म्हटलं, "ह्यो तर आपला अब्दुल, तुमी डागदर हाय का? तेला मलम पट्टी करायला आलाया का? तुमाला दावतो चला.” काकाजी पन लय भारी. खोलीपातुर आला आनि काई न बोलता तेला न बगता गुमान निगून ग्येला.

आज चांगली पुंजी जमली... सांच्याला घरी खोलीवर जाईस्तवर आबाळ भरून आलं व्हतं. ईजा पन कडकडू लागल्या व्हत्या. सारं आगलं वेगलंच भासत व्हतं… जमलेली पुंजी आमी सारे दादाला देत व्हतो नि कुनितरी दार ठोकलं . जेवन आलं असंल , अस समजून म्या दार उगडलं...

आयचांन मी उडालोच. त्यो मिशीवाला काकाजी, पुलिस मामाच्या युनिफार्मात भायेर उबा. समजायच्या आत जग्गू दादाच्या कानाखाली चार लाफा बसल्या व दादा जमिनीवर आडवा. सोबतच्या खाकी युनिफार्म मधल्या शिपाई मामा आनि मावश्यानी खोलीचा ताबा घेतला. दादाला दोरांनी बांदलं. आमाला वर्दीतल्या पोलीस मावशींनी बाजूला ऊबं केलं. आधार दिला. आमाला जेवन खान दिलं. एक एक करून मोटर व्हॅन मधे बसवलं. पुलिस मावशी नॉनस्टॉप बडबडत सांगत व्हती, “मुलांनो, बरेच दिवस आम्ही जग्गू दादाला पकडायचा प्रयत्न करत होतो. सबूत व ठाव ठिकाणा लागत नव्हता. आता तुम्ही सारे त्याच्या कैदेतून सुटलात, आझाद, स्वतंत्र झालात. तुम्हाला, तुमचे आई, बाबा शोधून देऊ व तुमच्या घरी पाठवू, शाळेत जाता येईल,चांगल्या घरात राहाता येईल.... ." व्हॅन तोपर्यंत सिग्नल पाशी थांबली. पाऊसबी जोरात सुरु झाला व्हता. काचंवर पानी आपटत व्हतं. ओघलत व्हतं. मी खिडकीला नाक लावून बाहेर बघत व्हतो. सुसाट वारे झाडांला वाकवून टाकत व्हते. रस्त्यावर लोक बिनदास्त चालताना पाहून व पान्यात खेलनारी पोरं पाहून माज्या मनामंदी तुफान येऊ लागलं.

मला त्या व्हॅन मधे सोतंत्र झाल्या वानी न वाटता अडकल्या वानी वाटू लागलं. "आता आपन कुटं जानार? एकटं कसं रानार? शिणेमात दावतात, तसं टाईमात उठायां लागनार, शालेत जावून, बुकं वाचावी लागनार. चाकलेट खायचं नाय, खाताना सांडायचं नाय, रस्त्यावर वुंडरायचं नाय , पाण्यात खेलायाचं नाय... " अचानक चालून आलेल्या आनि सोतंत्र मंजे काय हे ठावं नसलेल्या लाईपचा इचार करत असताना व्हॅनच्या बाकड्यावर मला पेंग येउन गेली… झोप लागली .......

-श्रीरंग केळकर



1 टिप्पणी: