एक अदृश्य नाळ

प्रिय बाळा,

तुझं बाळ म्हणून जन्मणं आणि माझं बाबा म्हणून जन्मणं हे किती एकाच वेळी आणि सहज घडलं ना. खरं तर तू आईच्या उदरात आलास तिथूनच आपली ओळख झाली. काही ओळखीच अश्या असतात की त्यांना दिवस, मास, तास, वर्ष अशी कालमापनाची परिमाणं लावताच येत नाहीत. त्या एका क्षणात दृढ होतात आणि अनंतापर्यंत तशाच बरोबर असतात. अगदी तसंच झालं. आपण कधीच एकमेकांना अनोळखी वाटलो नाही. माझ्या समजण्या-उमगण्यातला हा असा पहिलाच अनुभव - एका क्षणात दृढ आणि घट्ट ओळख होण्याचा. माझ्या आई-बाबांशी पण माझी कदाचित अशीच ओळख झाली असेल, पण त्या वेळी मी समजण्या-उमगण्याच्या राज्यात नव्हतो.

आपली काही कारणानं आधीही ताटातूट झाली आहे, पुढंही होईल. जगाचे आणि जगायचे व्यवहार कोणाला चुकतात? पण म्हणून काय फरक पडतो?? आपण एकमेकांना गाणी म्हणून दाखवली, गोष्टी सांगितल्या, तू त्या कश्या विसरशील! तुझ्या लाथा-बुक्के अलगदपणे झेलले, तुला हत्ती-घोडा करून हिंडवलं ते तू कसा विसरशील! आणि मीही कसा विसरेन !!! तुझं रडणं-हसणं डोळे भरून साठवलंय आणि साठवतोय मनात - आयुष्याची पुंजी म्हणून.

तुझं मोठं होत जाणं, तुला आठवडे, महिने, वर्षात मोजणं; पण हे सगळं बाहेरच्यांसाठी. तू तर क्षणाक्षणाला बदलत होतास, आहेस, राहशील. आणि ते मला जाणवत राहिलंय आणि पुढेही राहील - तुझ्या जवळ असलो किंवा नसलो तरीही. खरं तर तुझ्यातले सूक्ष्म बदल, भावनांचे तरंग तुझ्या जवळ, अवतीभवती असणाऱ्यांना जाणवणारही नाहीत कदाचित, पण माझ्या मनात त्याचे पडसाद उमटत राहतात. तुझ्या आयुष्यातल्या वसंतात मी बहरून येतो, तर तुझ्या डोळ्यातल्या काळ्या मेघात माझं मन ओलंचिंब होतं. ते तुला किंवा बाहेरच्या जगाला दिसेलच असं नाही.

कारण आपली ओळख ही फक्त डोळे, कान, नाक, स्पर्श एवढ्यापुरतीच संकुचित नाहीच मुळी. ती तर आहे जन्मजन्मांतरीची. जणू काही एका अदृश्य नाळेनी जोडली गेलेली. बाबाची पण मुलाशी जोडली गेलेली काही अदृश्य नाळ असते का रे? जगाला आईशी जोडलेली बाळाची नाळ दिसते, पण बाबाची नाही दिसत. पण म्हणून तिचं अस्तित्वच नाकारणं बरोबर आहे का तूच सांग !!!

- तुझाच बाबा

- कौस्तुभ पटवर्धन


२ टिप्पण्या:

  1. क्या बात है!! फार मन:पूर्वक लिहिले आहे. आईशी नाळ जोडलेली असणे जीवशात्रीय सत्य आहे आणि म्हणूनच सार्वत्रिकदेखील. पण अशी भावनिक नाळ जुळू शकणारे बाबा मात्र काही भाग्यवान लेकरांनाच मिळतात!

    उत्तर द्याहटवा
  2. Mast lihiley👍Agdi manapasun . Hya naleche astitv tuzya lekhatun adhikch drudh hotey.

    उत्तर द्याहटवा