आज भारतात उत्सवाचा दिवस आणि इथे अमेरिकेत आमच्या बस-टूअर चा पहिला दिवस, अर्धी अधिक बस चायनीज पर्यटकांनी भरलेली असताना माझा सोबती ठरलाय तो एक गोड ६ वर्षाचा मराठी समजणारा मुलगा. त्याचे आई-वडील पुढच्याच आसनावर बसलेत, त्यांचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. थोड्या थोड्या वेळानी मुलगा नीट गेम खेळतोय ना का झोपलाय ते बघत होते. मी त्याच्या आयपॅडवर चालू असलेल्या गेम मध्ये रस दाखवला आणि लगेच तो माझा मित्र झाला. त्याच्या आई-बाबांशी सुद्धा ओळख झाली. मूळचे ठाण्याचे, गेल्या आठ वर्षां पासून न्यू-जर्सी इथे स्थायिक आहेत. घरी नेमाने मराठीत बोलतात. मुलाला मराठी सगळं समजतं पण बोलत अजिबात नाही अशी तक्रार त्यांनी केली.
पुढे प्रवासात एक गोष्ट सारखी खटकत होती ती त्या मुलाच्या वडिलांची. एक नवरा आणि वडील म्हणून खूप धाक दाखवत होता तो व्यक्ती. आपल्या मुलानी आणि सौंने सगळं काही त्यांना विचारून करायचं. नाही केलं तर चीड-चीड, अगदी आजूबाजूच्या लोकांना कळेल एवढी. सुरवातीला मी कुणाबद्दल कुठचीही धारणा बनवायचं टाळतो, असेल काही कारण म्हणून मी दुर्लक्ष केलं. लांबचा प्रवास आणि थंडी असल्यामुळे बस दीड दोन तासांनी एकदा रेस्टरूम ब्रेक साठी थांबत होती. पण स्टॉप वर उतरायचं की नाही हे साहेब ठरवत होते. एका स्टॉपवर फक्त सौ उतरल्या मुलाला घेऊन, आणि मुलासाठी काही स्नॅक्स घेतले - केला असेल मुलाने हट्ट, तर साहेबांनी खूप थयथयाट केला. थोड्या वेळानी लंचसाठी थांबणार होतोच तर कशाला आत्ताच स्नॅक्स घ्यायचे वगैरे.. लंच घ्यायचा की नाही, घेतलं तर कुठे हे साहेबच ठरवणार. मी पहिल्या दिवशी दोन वेळा प्रयत्न केला; विचारून बघितलं एकत्र ब्रेकफास्ट किंवा लंच घेता येईल का ते, तेवढ्याच गप्पा झाल्या असत्या मायदेशाच्या आणि त्यांचे अमेरिकेतील अनुभव ऐकायला मिळाले असते, पण साहेब असले विलक्षण ‘कंट्रोल फ्रिक’ होते, की ते आधी उतरून फूडकोर्ट मधल्या स्टॉल्सची पाहणी करून, ठरवून, मग मंडळींना घेऊन यायचे. असे दोनदा झाल्यावर मी परत प्रयत्न केला नाही. हे सगळं चालू असताना सौंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. पण काय करणार..
नेहमी स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न, कोणी नसेल नियंत्रणात तर त्यांना बदलण्याचा प्रयत्न, नाहीच झालंतर मानसिक त्रास करून घेणे आणि देणे, अश्या स्वभावाच्या लोकांना ‘कंट्रोल इश्यू’ आहे असं म्हणू शकतो. अश्या वागण्याची नकळत इतकी सवय होत जाते की त्यात काही गैर आहे किंवा आपल्या वागण्यामुळे आपण कुणाची कुचंबना करतोय का? कोणाचे स्वातंत्र्य दडपतोय का याचे भान ह्यांना रहात नाही. नेहमी स्वतः ड्राइव्हिंग सीटवर असावं असं वाटण्यात गैर नाही पण दुसरं कोणी ड्राइव्ह करत असेल तर वळणा-वळणावर त्यांच्या ड्रायविंग स्किलचा मानसिक त्रास करून घेणं हे गैर आहे. हे गुण कुणातही असू शकतात, पण निसर्गाने हे गुण पुरुषांमध्ये जास्त दिलेत. स्त्रियांमध्ये आहेत, पण माझ्या निदर्शनात आलेल्या महिलांमध्ये हे गुण व्यावसायिक दुष्परिणामांमुळे आलेत. उदा. शाळेत आणि घरी दोन्हीकडे शिक्षिके सारखेच वर्तन, घरच्यांना वर्गातल्या विद्यार्थी सारखी वागणूक मिळताना मी पाहिली आहे. स्वतः कंट्रोलमध्ये असणं किंवा तसं भासवणं (कधी न रडणं, आपल्या भावना व्यक्त न करणे, आपला कमकुवतपणा कळू न देणं ) आणि दुसऱ्यांना आपल्या मनासारखे कंट्रोल करण्यात यांचे आयुष्य जाते.
पशूं मध्ये नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या ‘सर्व्हाइवल’ साठी. माणसा सारखे त्यांच्यात नाती-संबंध नसतात आणि म्हणून मर्यादा सुद्धा नसतात. मनुष्य संबंध बनवतो जीवन सुखी होण्यासाठी आणि वेग-वेगळ्या कारणाने मनुष्यच मर्यादा ओलांडतो, त्यातील एक कारण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण आणून. प्रत्येक संबंधातील मर्यादा आपण ओळखायला हवी, अदृश्य लक्षमण रेषाच ती.
पुराणात नेहमी आढळतं की असा स्वभाव असलेली लोकं-पुरुष मंडळी, तपस्या करून आपले नियंत्रणाची कक्षा वाढवत वाढवत जातात आणि शेवटी सगळ्यांना त्रास देतात. तपस्या हे स्वतःला बदलायचे साधन आहे हे विसरून, ही मंडळी निसर्ग बदलण्यात, दुसऱ्यांचे प्राण घेण्यात-देण्यात, शाप देण्यात धन्यता मानतात. नियंत्रण वाढवण्यासाठी ज्या सिद्धी लागतात त्या मिळवण्यासाठी तपस्या करत राहतात. काही वेळा तर प्रत्यक्ष परमेश्वराला अवतार घेऊन यांना धडा शिकवावा लागतो. तर असे हे तपस्वी पुरुष धक्के खात खात जीवनाचे आणि अध्यात्माचे धडे शिकतांना आपल्याला पुराणात दिसतात. तिकडे स्वर्गात इंद्र देव कल्पवृक्ष आणि अप्सरा असून सुद्धा स्वतःला अत्यंत त्रस्त आणि असुरक्षित समजतो. आपलं नियंत्रण जाणार तर नाही ना? या भीतीत सतत वावरतो. कोणी तपस्या करायला लागलं की आपले नियंत्रण कमी होण्याच्या धोक्याने व्याकुळ होतो. नवं-विध कारस्थानं करून तपस्या भंग करायचा प्रयत्न करतो. स्वर्गात राहून सुद्धा आहे त्याला शांतता-समाधान ?
या उलट पुराणातील स्त्रीयांनी तपस्या आणि आत्म- चिंतन करून दुसऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याऐवजी स्वतःला पात्र बनवलं, फार शांतपणे आणि कमी वेळात अलौकिक ज्ञान संपादन तर केलंच. जेव्हा संधी मिळाली तेव्हा उपनिषदं आणि वेदांच्या रचनेत योगदान केलं. स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या मोक्षाचे निमित्तही बनल्या. गार्गी, मैत्रेयी, अरुंधती, लोपमुद्रा अशी काही उदाहरणं आठवतात.
अहिल्या किंवा रेणुका सारखे अपवाद वगळता, प्रकर्षाने पुरुषांचा अहंकार आणि मूर्खपणा दर्शवणाऱ्या पुराणातील कथा, ह्या पुरुषप्रधान कश्या काय? काय माहीत?
आजच्या दिवशी जी मला गोष्ट आठवतेय त्यात सुद्धा ‘कन्ट्रोल फ्रिक’ आहेत. एक संपूर्ण सृष्टी नियंत्रणात आणायच्या प्रयत्नात तर दुसरा असमाधानी आणि आपले भविष्य नियंत्रणात आणण्याच्या.
अंग राज्यात विभंदक ऋषी आणि त्यांचे पुत्र ऋश्यश्रींगी रहात होते (का आणि कसे ते अजून केव्हा तरी). ऋश्यश्रींगी यांच्या तपस्येमुळे इंद्र देव अंग राज्यात येऊ शकत नव्हते, इंद्र नाही तर पाऊस नाही, सगळीकडे दुष्काळ आणि जनता त्रस्त. हे ऋषी स्वतःला लागणारे पौष्टिक घटक हवेतून घ्यायचे म्हणे, लोकं मरु देत, आपल्याला काय. त्यांना पूर्ण सृष्टीवर नियंत्रण मिळवायचे होते. त्या राज्याचा राजा -Rom आणि त्याची बायको V यांना सुद्धा याच कारणामुळे की काय पण मूल - बाळ नव्हते. अश्या ऋषी-तपस्या समस्येला ज़ालीम उपाय म्हणजे अप्सरा, पण त्या सुद्धा ऋश्यश्रींगी जवळ जाताच भस्म व्हायच्या. शेवटी या Rom राजाने आपले साडू भाऊ म्हणजे D राजाकडे धाव घेतली. त्या D राजाला एक खूप सुंदर, गुणवान आणि खूप हुशार, शांता नावाची कन्या होती. घरात प्रत्यक्ष ‘शांता’ असून सुद्धा हा D राजा नेहमी नाराज असायचा कारण त्याला हवा होता मुलगा, जो त्याची म्हातारपणी काळजी घेईल, मृत्र्यूसमयी जवळ असेल आणि त्याच्या चितेला अग्नी देईल. Rom राजाने D राजाकडे प्रस्ताव मांडला की शांता ऋश्यश्रींगी ऋषींची तपस्या भंग करू शकेल. ती सुंदर आणि हुशार तर आहेच, त्यांच्या जवळ जाण्याचा मार्ग पण ती शोधेलच. एकदा का ऋश्यश्रींगी ऋषींना शांता आवडली की ते तपस्या सोडून तिच्याशी विवाह करतील. मग D राजाला मुलगा होण्यासाठी ऋश्यश्रींगी ऋषी यज्ञ करतील. अंग राज्यात पाऊस पडेल आणि सगळीकडे खुशाली पसरेल, D राजाला पुत्र प्राप्ती होईल. एकूणच काय तर विन-विन सिचुएशन. त्या ऋषीं बरोबर आयुष्य काढावे लागेल ते शांताला, पण तिला विचारतेय कोण. शांता सारखी कन्या असून सुद्धा, मुलगा हवा म्हणून D राजाने अजून दोन लग्न केली, तीन राण्या असून सुद्धा, मुलगा काही झाला नाही. Rom राजाचा हा प्रस्ताव उत्तम होता. ठरल्या प्रमाणे शांता ऋश्यश्रींगी ऋषींच्या जवळ जाऊ शकली. त्यांच्याशी तिचे लग्न झाले. पुढे त्यांनी उत्तम संसार केला. ऋश्यश्रींगी ऋषींनी यज्ञ करून D राजाला एक नाही दोन नाही तर चार पुत्र दिले.
शेजारच्या विदेह राज्याचा राजा J, त्याला सुद्धा मूळ-बाळ नव्हते. ऋश्यश्रींगी ऋषींची तपस्या भंगल्यानंतर विदेहात पण पाऊस सुरु झाला. पहिली नांगरणी करायला शेतकऱ्यांनी J राजाला निमंत्रण दिले. नांगरणी करताना भूमीतल्या एका भेगेत तान्हं बाळ J राजाला दिसलं. त्याने लगेच त्या बाळाला उचलून घेतलं.
J राज्याचे डोळे भरून आले त्याच्या भावना उफाळून आल्या आणि त्याने जाहीर केले, “आज पासून ही माझी कन्या”. गावकरी म्हणाले, “महाराज, हिचा जन्म तर तुमच्या किंवा राणीच्या बीजातून नाही झाला, ही अशी सोडून दिलेली मुलगी कशी काय तुमची होऊ शकते?”, “तुम्हाला लवकरच नैसर्गिक रीतीने पुत्र / पुत्री प्राप्त होईल (आत्ताच कशाला घाई करताय)”.
J राजा म्हणाला, “पितृत्वाची भावना ही हृदयात जन्म घेते, बीजातून नव्हे. या बाळाला बघितल्यावर माझ्या मनात पितृत्वाच्या भावनेचा जन्म झाला, ती भावना आणि तिचा जन्म जास्त महत्वाचा, नाही का? मला संतती असती तरीसुद्धा मी हिला माझीच मुलगी मानली असती, इतकी प्रबळ आहे ही भावना”
दोन राजांच्या मनाचा आणि हृदयात किती तफावत. एका राजाला घरात ‘शांता’ असून पितृत्वाची भावना नाही, शांती नाही, आणि दुसरा राजा भूमीत सापडलेले, कोणीतरी त्यागलेले बाळ हातात घेऊन तृप्त होतो.
पुढे जाऊन J राजाच्या पत्नीने तीन कन्या रत्नांना जन्म दिला. J राजाने पुत्र प्राप्तीसाठी कुठला यज्ञ केला नाही. त्याने आपल्या चारही मुलींना खूप चांगलं शिक्षण दिलं, नेहमी दरबारात बसवलं. J राजाच्या दरबारात नेहमीच याज्ञवल्क्य सारखे तत्वज्ञानी, संत, ऋषी-महात्म्यांची रेलचेल असायची. दरबारातील आध्यात्मिक आणि तत्वज्ञान विषयी चर्चा यांच्यातून एका ग्रंथाची उत्पत्ती झाली, ज्याला ‘बृहदारण्यक उपनिषद्’ म्हणून आपण ओळखतो. शेवटी J राज्याला मोक्ष प्राप्ती झाली.
असं काही D राजाच्या बाबतीत घडलं नाही. चार पुत्र असून सुद्धा मृत्यूसमयी एकही मुलगा जवळ नव्हता.
- विशाल पेंढारकर
काही वाचकांना लिंक लागावी म्हणून-
उत्तर द्याहटवाRom- राजा रोमपद (कौशल्या राणीचा चा भाऊ)
V- राणी वार्षिनी रोमपद राजाच्या पत्नी
J-राजा जनक
D-राजा दशरथ
वाह! वेगळ्या पद्धतीचे लिखाण!
उत्तर द्याहटवामजेदार शैली!