कुतूहल


हे काय ते काय, घ्यावे थोडे म्हटले जाणून
भोचकपणा नाही हो, सहज कुतूहल म्हणून

घरात असले तरी शेजारचे ऐकते कान लाऊन
कोण आले गेले, मधेच बघते, हळुच वाकून

मला काय करायचे, विचारावे, सहज दिसले म्हणून
कोण गं तो कोप-यावर सोडतो रोज स्कूटर वरून?

आपण काय शेजारी, जावे मदतीला धावून
कर्तव्य असेल, तर पाहू कमीसाठी सुचवून

कुठे असतात तुमचे, विचारावे कसे आडून
नवीन साड्या, भारी दागिने, येतात तरी कुठुन?

हे मिटक्या मारतात, आले की पदार्थ शेजारून
विचारलं तर साधंच की रोजचं, उत्तर भाव खाऊन

निसर्ग नियम की, उत्सुकता मनात नका ठेऊ दाबून
चौकस असावे, भोचकपणा नाही हो, सहज कुतूहल म्हणून

यशचा नंबर का पहिला कायम नेहमी वर्गातून
कुठल्या सरांच्या शिकवण्या, त्याने घेतल्या हो लावून?

दोन्ही मुले तुमची, वाढली परदेशी लहानपणापासून
मायदेशी परत आलात, म्हटले घ्यावे कारण जाणून

पटकन जमले लग्न, झटकन घेतला सोहळा उरकून
गटवला तिनेच आपला, कि आला होता तिला सांगून?

दाम करी का काम याचे ,की फोन येतो कोणाचा वरुन
त्याचे कसे नयनरम्य चित्र, बसतो नुसता नाकावर टिच्चून

कशा सुचतात इतरांना कविता पानेच्या पाने भरून?
आपोआप गुंफ़त जातात ओळी कि मिळतात गुगल वरून?

निसर्गनियम जरी, जेलसी, जळफ़ळाट नसावा मनातून
चौकस असावे, भोचकपणा नाही हो, सहज कुतूहल म्हणून


श्रीरंग केळकर


४ टिप्पण्या: