"तुमच्यात होत गेलेले बदल"

माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, मराठवाड्यातील अंबेजोगाई हे माझं गाव. वडिल सरकारी सेवेत नोकरीला असल्यामुळे दहा वर्ष आम्ही बीड येथे रहात होतो. मी, प्रतिभा गंधारे, माझे सातवीपर्यंत शिक्षण कन्याप्रशाला बीड येथे झाले. मला लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याचा छंद होता, खेळाची व नृत्याची अतिशय आवड होती. विटीदांडू, गोटयांपासुन सर्व मैदानी खेळ खेळत असे. सातवीपर्यंत खेळाशिवाय कुठल्याही क्षेत्रात काही करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे शाळेत फक्त थोड्याफार मैत्रीणीच मला ओळखत होत्या. आठवीला गेल्यावर मी खोळेश्व्रर विद्यालय अंबेजोगाई येथे प्रवेश घेतला. शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम होता. मी चांगली खेळत असल्याने माझा खोखोच्या संघात समावेश झाला आणि मला चांगली प्रसिद्धी मिळाली. कबड्डी संघातही मला स्थान मिळाले, भाला फेकणे यातही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि माझा उत्साह वाढला.

खोखोच्या संघाने चांगलीच मजल मारली आणि जिल्ह्याच्या स्पर्धा बीड कन्याशाळेत झाल्या. मी संघात चांगलीच खेळी केली आणि आमचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. शाळेतील माझ्या जुन्या मैत्रीणी आमच्या सातवीच्या बाईंबरोबर मला मुद्दाम भेटण्यासाठी आल्या व मला विचारले तू आमच्याच शाळेची विद्यार्थिनी ना? त्यांनी प्रेमाने माझी पाठ थोपटली व म्हणाल्या, "उत्तम खेळतेस गं, अशीच प्रगती करत जा". या अनपेक्षित मिळालेल्या शाब्बासकीमुळे मी आनंदून गेले. ज्या शाळेमध्ये मी सात वर्ष शिक्षण घेऊनही मला फारसे कोणी ओळखत नव्हते, तिथेच एका चांगल्या खेळीमुळे माझी दखल घेतली गेली. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. पुढे महाराष्ट्राच्या संघात माझी निवड झाली पण घरून परवानगी न मिळाल्यामुळे माझ्या हातातून खोखो खेळण्याची संधी निसटली. शिक्षणाची अतिशय आवड असूनही घरातील अडचणींमुळे दहावी नंतर शिक्षण सोडावे लागले. लवकरच माझे लग्न झाले आणि मी प्रतिभा गंधारेची प्रतिभा विभूते झाले. मनामध्ये खूप साऱ्या अपेक्षा घेऊन सासरी नाशिकला आले पण इथेही शिक्षणाच्या बाबतीत निराशाच झाली. तेविसाव्या वर्षी दोन मुलांची आई झाले, चूल आणि मूल या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत होते पण मला याहून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. संसारात आर्थिक हातभार म्हणून शिवणकाम शिकले, स्क्रीनप्रिंटींग शिकून घरच्या व्यवसायात मदत करू लागले, पुढे स्क्रीनप्रिंटींगचे क्लासेस सुरु केले ज्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. याच दरम्यान अचानक वडील गेले आणि मायेचं छत्र हरवल्याने मी सैरभैर झाले. "मृत्यू हे मानवी जीवनातील अटळ सत्य आहे" हे स्वीकारून मी घराबाहेर पडले आणि पुन्हा माझे लक्ष व्यवसायात देऊ लागले.

इंदिरानगरला राहायला आल्यावर मी प्रिंटींगचे युनिट घरी सुरु केले. पुढे मी व माझ्या मैत्रिणींनी मिळून "सखी महिला मंडळ" स्थापन केले. दोन वर्षांनी मी "आदर्श महिला मंडळ" हा पुरस्कार मिळालेल्या अतिशय नावाजलेल्या व २०० महिला असलेल्या "स्नेहवर्धिनी महिला मंडळात" प्रवेश घेतला. आणखीन दोन वर्षांनी माझा कार्यकारिणीमध्ये समावेश झाला. या मंडळात आल्यावर खऱ्या अर्थाने माझ्यातील सुप्तगुणांना वाव मिळाला व स्वतःमधल्या प्रतिभेची जाणीव झाली. मी विविध स्पर्धांमधून भाग घेऊन प्राविण्य मिळवले. रांगोळी, विविध गुणदर्शन, पानाफुलाची सजावट, पाककला, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, राख्या बनवणे या सारख्या स्पर्धांमधून भाग घेऊन खूप बक्षिसं मिळवली. इ.टी.व्ही मराठी वरील "धुमशान" या कार्यक्रमात सामान्यज्ञान या प्र्श्णोत्तराच्या स्पर्धेत चांदीचे नाणे मिळवले. आवड आणि आर्थिक गरज यातूनच पर्स, fancy bags, दागिने बनवायला शिकले आणि व्यवसाय सुरु केला. मैत्रिणी विचारायच्या "एवढा वेळ कसा मिळतो गं तुला?" पण खरं सांगू, "आवड असली की सवड होते, सवड मिळाली की मार्ग सुचतो". या आवडीच्या कलागुणांमुळेच मनाला टवटवी येते.

स्नेहवर्धिनी मंडळाने निबंधस्पर्धेचं आयोजन केले पण लिखाण करणे मला जमणार नाही, कशाला उगीच हसू करून घ्यायचं हा विचार मनात आला अन शांत बसले. मंडळातल्या ज्येष्ठ भगिनींनी लिहिण्यास प्रोत्साहन दिले आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणत लेखणी हातात घेतली व "श्रीगणेश" केला. आश्चर्याचा धक्काच बसला कारण मला चक्क तिसरे बक्षीस जाहीर झाले होते. पुढे "मिळून साऱ्याजणी" मंडळातर्फे तिसरे तर पतंजली योगपीठाद्वारे झालेल्या निबंध स्पर्धेमध्ये दुसरे बक्षीस मिळाले. माझे विविध लेख सकाळ व गावकरी सारख्या पेपरमधून छापून आले. पुढे दोन वर्षांनी मंडळात सहसेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली, त्यामुळे व्यासपीठावर जाऊन बोलण्याची सवय झाली. पुढे मंडळातून सूत्रसंचालनाची संधीही मिळाली. त्या संधीचा फायदा करून घेत मी माझ्या आयुष्याचा झोका उंचावत चालले होते "उंच माझा झोका" या सारखे. मंडळात प्रथम नृत्य व नंतर नृत्य दिग्दर्शनही केले. मला उखाणे घेण्याचीही खूप आवड आहे, यात मी पहिला नंबर कधीच सोडला नाही.

मला काही येत नाही म्हणता म्हणता खूप काही करण्याची संधी मिळाली होती. इतरांच्या दृष्टीने हे किरकोळ असेल पण माझ्यासारख्या गृहिणीला हे खूप मौल्यवान आहे. यामुळेच आयुष्यात आलेल्या अनेक वादळांना, संघर्षांना खंबीरपणे तोंड देत आले. या सर्व धावपळीमुळे तब्येतीकडे थोडे दुर्लक्ष झाले होते म्हणून योगा क्लासला जाऊ लागले. पुढे योग-शिक्षिकेच्या गैरहजेरीत मी योगवर्ग घेत असे. आज मला मोफत योगा शिकवण्याची इच्छा आहे. स्वतःसाठी, घरासाठी, मुलांसाठी सर्व काही केलं पण समाजाचेही आपण काही देणे लागतो हा विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले, सहा वर्ष सामाजिक काम केले. राजकारणाचा पसारा वाढत होता पण घर व मुलांकडे लक्ष देता येत नसल्यामुळे मी राजकारणाला राम राम ठोकला. दोन्ही मुलं इंजिनियर झाली, मोठा सिंगापूर येथे असतो तर धाकटा लंडनमध्ये रहातो. आता मला दोन वर्षाचा नातू आहे, त्याला सांभाळण्यासाठी दोन वर्षांपासून मी इथे आहे. गेल्या वर्षी मी स्वतःच पोहण्यास शिकले, आज मनसोक्त पोहण्याचा आनंद घेते. वेळ जाण्यासाठी मुलाने मला इंटरनेट शिकवले त्यामुळे फेसबुक बघते, गुगलवर माहिती पाहते, नाटक सिनेमेही बघते. यामुळेच मला तुमचा ऋतुगंधचा अंक वाचायला मिळाला.

शिंपले उघडल्याशिवाय त्यातील मोत्याची चकाकी दिसत नाही तसेच माझ्या आयुष्याची सोनेरी पानं उलगडल्याशिवाय तुम्हाला ती कशी बघायला मिळतील? या विषयाच्या निमित्ताने का होईना ही संधी मला मिळाली त्याबद्दल महाराष्ट्र मंडळाची आभारी आहे!

धन्यवाद,
- सौ. प्रतिभा विभूते
६ टिप्पण्या: