उदंड आहे

खड्यांच्या गौरी घरात आणल्यावर त्यांना घरातील सगळ्या खोल्यांतून घेऊन जायचा सोहळा असायचा. जिच्या हातात गौरी असतील तिने विचारायचे असे, "इथे काय आहे?" आणि मग तिच्याबरोबर जी असेल तिने उत्तर द्यायचे, "उदंड आहे!" लहानपणी हसू यायचे. जरीकाठाचे परकर पोलके, हातातल्या किणकिणत्या बांगड्या, डोक्यातली कलाबूतीचा धागा गुंफलेली वेणी, बोटांवरची केशरीसर रंगलेली मेंदी, ह्या सगळ्याने मन गुंगलेले असायचे, पण तरी मनातल्या एखाद्या कोपऱ्यात जाणवून जायचे की त्या 'इथे काय आहे?' चे उत्तर इथे स्वयंपाकघर किंवा बैठक आहे असे नेमके न देता, 'उदंड आहे' असेच का म्हणायचे?? पण आता, एवढे आयुष्य जगून झाल्यानंतर, त्या 'उदंड आहे' मागचा भाव जाणवतो आहे.

राजश्री लेलेने ऋतुगंधच्या सिंगापूर सिरीजसाठी आणि मैत्री ह्या विषयावर लिहायला सांगितले तेव्हा मनात लख्खपणे हेच 'उदंड आहे' असे उमटले. आता ते 'उदंड' इतके अलवार आहे की त्याच्या नाजुकपणाला बाधा न येता, नेमक्या शब्दांत मांडता येणे मात्र खरेच अवघड. पण सांगायचा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

भारतातून सिंगापूरला आलेल्या कोणासाठीही हे स्थित्यंतर हा आयुष्यातला मोठा बदल असतो. नुसती भौगोलिक जागा बदललेली नसते तर ज्या शहराच्या, नात्यांच्या, कर्तृत्वाच्या, संदर्भाच्या चौकटीत आजवर आयुष्य जगलो, ती चौकट अचानक नाहीशी झालेली असते. स्वातंत्र्य, मोकळेपण, पोरकेपण, एकटेपण अशा संमिश्र भावनांचा मनात नुसता कल्लोळ माजतो. आधीची सगळी उपाधी गळून पडलेली असते. तिथे केलेल्या बऱ्यावाईट कामांमुळे लाभलेली प्रसिद्धी लोप पावलेली असते. न कोणी ओळखणारे असते न कोणी रस्त्यात हाक मारणारे असते. रस्त्याने जाताना आपण असतो, रस्ता असतो आणि लोकांतातही सापडलेला एकांत असतो. सगळेच नवे असते. नवी जागा, नवी व्यवस्था, पुन्हा रुळणे आणि नव्याने रुजणे. आयुष्य जणू परत पहिल्या पानापासून पुन्हा सुरु करणे. वाटते, ओल्या पंखांवरचे पाणी झाडताना पाखराला असेच वाटत असेल का? सर्व झटकून झाल्यावरचे हलके हलके की हे वाटणे म्हणजे ताप येऊन गेल्यावर वाटते तसे हल्लक हल्लक असते ???

सुरुवातीच्या ह्या मानसिक कल्लोळानंतर थोडं थांबून विचार केला तर आजवरच्या आयुष्यातील घटनांची, प्रसंगांची रिळे कधीही, कुठेही मनात उलगडायला लागतात. स्वत:तील उणीवा आणि क्षमता दोन्हीही समजत जातात. स्वत:ला सामोरे जाऊन, समंजस स्वीकाराच्या स्थितीला मन येऊन पोचले की आपोआपच, आत्तापर्यंत कधी नव्हती इतकी, स्वत:शी मैत्री जमत जाते. अशी मैत्री जमण्यासाठी आवश्यक असलेला अवकाश आणि वेळ मिळालेला असतो. अशी मैत्री जमलेल्या ह्या स्वत:बरोबरचे आयुष्य मग स्थिरावत जाते. असे स्थिरावलेले आयुष्य जगताना मधेच कधीतरी जाणवून जाते की इथला निसर्गदेखील आपला मित्र बनून गेला आहे. कधी अगदी प्रसन्न निळेभोर असलेले तर कधी भरून आलेल्या ढगांनी सावळे मायाळू झालेले आकाश आवडायला लागलेले असते. रोज एकदा तरी हजेरी लावणारा पाऊस आपले क्षेमकुशल पुसण्यासाठी आला आहे असे वाटायला लागते. त्या पावसाने झाडांची पाने जशी धुतली जाऊन साफ झालेली असतात तसेच मनही सगळा झाकोळ दूर होऊन प्रसन्न झालेले असते. विषुववृत्तीय हवामानातले कडक ऊन, रोज येणारा पाऊस, दमट हवा ह्याला आपण सरावत जातो. सिंगापूरातील नेचर पार्कस, पार्क कनेक्टर्स, वेगवेगळे रिझरवायर्स, त्याच्या आजूबाजूला वसलेले पार्क्स हे सगळे तर अगदी जिवाभावाचे मित्र बनून जातात. शहरी वातावरणापासून अगदी वेगळया अशा ह्या वाटांवरून फिरणे किती आनंदाचे असते! तो हिरवागार रंग, पानांतून गाळून येणारा सूर्यप्रकाश, ऊन सावलीची जाळी, पाखरांचे आवाज, फुलांचे, फळांचे वास, तळ्यातील पाण्यावर वाऱ्याच्या लहरीबरोबर उठणारे तरंग, सूर्य उगवताना आणि मावळताना आकाशात दिसणारी रंगपंचमी हे सगळे सगळे त्या वाटांवरून फिरताना आपल्याला लाभते आणि हि मैत्री अधिकच गहिरी बनत जाते.

माणसांना भेटायची ओढ तर प्रत्येकाला असतेच. त्यातही परदेशात स्वत:ची भाषा बोलणारे कोणी भेटणे फारच सुखाचे. सिंगापूरात महाराष्ट्र मंडळ नेमके हेच काम करते. अनेक वर्षांपूर्वी मी सिंगापूरात पहिल्यांदा मंडळाच्या संपर्कात आले ते गणपती उत्सवाच्या निमित्ताने. आम्ही संध्याकाळी आरतीसाठी गेलो होतो. तेव्हा तिथे गणपतीच फक्त माझ्या ओळखीच होता आणि बाकी सगळे लोक नवे आणि अनोळखी होते. पण अनोळखी असले तरी माझी भाषा बोलणारे लोक आसपास आहेत ह्यानेच मी आनंदात होते. हळू हळू ओळखी होत गेल्या, कार्यक्रमांना नियमित जाणे, त्यात सहभागी होणे होऊ लागले. पाहतापाहता महाराष्ट्र मंडळ कधी सिंगापूरातील आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेले कळलेच नाही. अनेकांशी ओळखी झाल्या. अनेकानेक उत्तम कार्यक्रमांचा आनंद घेता आला. अनेक उपक्रमात सहभागी होता आले. मानवी स्वभावाच्या अनेक छ्टा अनुभवता आल्या. महाराष्ट्र मंडळ, शब्दगंध, मंथन, ऋतुगंध, विवेकानंद सेवा संघ अशा व ह्याखेरीज अनेक वाटांनी मैत्र लाभत गेले, माझे आयुष्य समृद्ध करत गेले. ज्येष्ठांकडून तसेच तरुण आणि बालांकडूनदेखील कितीतरी गोष्टी शिकता आल्या. सिंगापूरातील वास्तव्याला आणि माझ्या भावविश्वाला अर्थ देणारे हे मैत्र माझ्यासाठी फारच मोलाचे होते, आहे आणि राहील. आनंदाचे कितीतरी प्रसंग ह्या मैत्रीने उजळून गेले आणि कितीतरी अवघड प्रसंग ह्याच बळावर सहन करता आले. ह्या भावबंधांना ना नात्यांची नावे होती ना स्थळकाळाचे बंधन होते. सिंगापूरात जुळलेले आणि आता जगभरात विखुरलेले भावबंध आज देखील तेवढेच जिव्हाळ्याचे आहेत. सतत संपर्कात असण्या नसण्याने फरक न पडणारे असे हे मैत्र लाभणे माझ्यासाठी अपार भाग्याचे आहे.

सुरुवातीला जरी म्हणाले की ह्या ‘उदंड’ मैत्राला शब्दांत मांडणे अवघड असले तरी प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? पण आता हे सगळे लिहून झाल्यावर जाणवते आहे की आपल्या स्नेहसुगंधाने मनात सतत तेवत राहिलेल्या मैत्रीविषयी जे मला वाटतंय त्यातले शतांशानेही शब्दांत आले नाही. असो! ऋतुगंध मैत्री विशेषांकाच्या वाचकांना अपार मैत्र लाभो आणि लाभलेले मैत्र निरपेक्ष स्नेहभावनेने शतपटीने समाजाला परतही करता येवो ह्याच शुभकामना! 

- वृंदा टिळक


४ टिप्पण्या:

 1. खरंच ! उदंड आहे! वृंदा तुझे शब्दभांडार, लिहिण्याची श्रीमंती आणि निरपेक्ष मैत्रीची भावना उदंड आहे.प्रत्येक शब्दात तू भेटत आहेस असा भास झाला.

  उत्तर द्याहटवा
 2. खरंच ! उदंड आहे! वृंदा तुझे शब्दभांडार, लिहिण्याची श्रीमंती आणि निरपेक्ष मैत्रीची भावना उदंड आहे.प्रत्येक शब्दात तू भेटत आहेस असा भास झाला.

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद मोहना!!छान वाटले तुझा प्रतिसाद पाहून. अग, इतके उदंड लाभलेले कोणीही असेच लिहील, माझे काही कर्तृत्व नाही त्यात!!

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद मोहना!!छान वाटले तुझा प्रतिसाद पाहून. अग, इतके उदंड लाभलेले कोणीही असेच लिहील, माझे काही कर्तृत्व नाही त्यात!!

  उत्तर द्याहटवा