- ग्रेस: भुंगा लावणारी कविता -

मला ग्रेस आवडतात. हृदयनाथ मंगेशकरांनी गाजवलेल्या त्यांच्या गाण्यांमुळे नाही, त्यांच्या कवितेच्या आगळेपणामुळे. “शब्दापेक्षाही अर्थाचा नादगुण मला उदास वाटतो" असं थेट काही कळेलसं ग्रेसच्या काव्यात सापडणं विरळंच. पण वाचली की कळते अशी कविता छान वाटते पण तिचा भुंगा लागत नाही मनाला. जिथे थांबायला लागतं, विचार करायला लागतो आणि मग अर्थाचे वेगवेगळे पदर समोर यायला लागतात अशी कविता हा एक अनुभव असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर "हिमसंध्या" ही कविता पहा:

मातीमध्ये फूल गळावे तसा निनादत गेलो 
अस्तगिरीच्या मेघांवरचा रंग उदासिन झालो 

अशी वेधक तरीही साधी सरळ सुरुवात असणारी ही कविता हिमसंध्येच्या वेळेचं, दृश्याचं वर्णन करता करता अचानक अशी संपते:
डोंगरवैरी, प्राक्तनगौरी हिमसंध्येची धूळ 
कृष्ण आठवा तुला देवकी मला विजेचे फूल 

यातला कृष्ण-देवकी-विजेचा संबंध थांबायला लावतो, विचार करायला लावतो. सगळ्यांना त्याचा अर्थ एकच लागेल का? बहुधा नाही. पण त्या ओळींवर थबकून अर्थ उलगडून पाहणं हे रंजक असतं. ग्रेसच्या बऱ्याच कविता मात्रा-बद्ध असतात आणि त्यामुळे त्यांचा ताल गुंगवणारा असतो. यासाठी आधीची उदाहरणं पहा. शिवाय त्यांचं ध्वनियोजनेकडेही लक्ष असतं. अनुप्रासाचे आणि यमकांचे वेगवेगळे प्रकार वारंवार दिसतात.

१. डोळ्यात चंद्र, चंद्रात मंद्र
२. मातीच्या वैष्णवी विस्तारातील यात्रेत ती परत आली
३. तू निष्कंप सशिल्प मंद बकुळा कल्पद्रुमाची स्पृहा
४. कुसुंबि सावळे निळे उदे अनंत जांभळे, मेघमेघ रंगरंग सूर्यसूर्य मावळे

त्यावर कडी म्हणजे त्यांची शब्दकळा. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शब्दजोड हे ग्रेसचं बलस्थान आहे. वृक्षसान्त, चंद्रसजणांचे, मृत्यूभयाण, कुंतलकाळी, अस्तित्वमयूर, पाऊसमोगरा असे परिचित पदबंध ते धुकाळी, उगवावू अशी नवी शब्दरूपे ते वापरतात. त्यामुळे ध्वनी आणि शब्दस्तरावर ही कविता अतिशय परिणामकारक ठरते. चांगल्या कवितांमध्ये दिसणारी नेहेमीची तंत्रं या कवितेत दिसतात.

(१) एका अनुभवाच्या आधारे दुसरा अनुभव प्रखर करणे आणि तो करताना दोन सामन्यात: एकत्र न येणाऱ्या गोष्टींना एकत्र आणणे.
कोऱ्या सावलीने केले थंड जारिणीचे अंग 
जशी पावसाची सर झेले कुंवारीचा भांग 

(२) शब्द किंवा कल्पनास्तरावर विरोधातून अर्थ प्रखर करणे
देह चांदण्यात जळे, ढग मागतो ओलावा 

किंवा

नसे शकुन गे बाई 
वारा ओशाळला 
मोर रानाच्या भीतीने 
अंगणात आला 

(३) अपरिचित उपमा, रूपके वापरणे
दूरवर पसरलेली झाडे 
महंमदाच्या प्रार्थनेसारखी लांब, प्रदीर्घ 

अनपेक्षित रूपकांचा वापर करून लक्षवेधी स्थळे निर्माण करणे हे ग्रेसच्या कवितांचं वैशिष्ट्य आहे.
दगडाचा घोडा 
त्याला अंधाराचे शिंग 
शुभ्र हाडांनाही फुटे 
कसे काळे अंग 

यात घोडा - अंधार - हाडं अशी रुपकं एकापाठोपाठ एक आणून वाचकाला सहज पुढे न जाऊ देण्याचं तंत्र दिसतं. याला तंत्र म्हणणं चुकीचं आहे कारण ग्रेसनुसार ते कविता वाचकाकरता लिहित नाही, ती त्यांची उसळून येणारी उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे. पण याच अनपेक्षित रूपकजाळ्यामुळे ग्रेसची कविता दुर्बोध मानली गेली असं वाटतं. डॉ रमेश धोंगडे कदाचित याचबद्दल म्हणतात: "ग्रेसची कविता आत्मभानाकडून आत्ममग्नतेकडे वळते." (एकलकोंड्याचा कबिला / प्रस्तावना) काही रुपकं ग्रेसची आवडती आहेत. ती पुन्हा पुन्हा येत राहतात. राघव - मिथिला, कृष्ण - राधा - देवकी - द्वारका - जान्हवी अशी रामायण - महाभारतातील रुपकं किंवा कावळा, चिमणी, पारवा, राघू - मैना, घोडा, गाय, वासरू अशी पक्षी -प्राणी जगतातील रुपकं किंवा चंद्र, सूर्य, रान, नदी, वारा अशी अचेतन निसर्गातील रुपकं फिरून फिरून वेगवेगळ्या संदर्भांनी समोर येत राहतात. तारुण्य, प्रेम, रतिप्रेम, विरह, व्यभिचार, विश्वासघात, मृत्यू असे विषय वरचेवर हाताळले जातात.

“कै. ज्ञानेश्वर विठ्ठल कुळकर्णी” सारख्या कवितांमधून मात्राबद्ध कविता सहज मुक्तछंदाकडे वळते आणि रचनेचे वेगळे प्रयोग हाताळते. परभाषी लेखकांचे, साहित्याचे संदर्भ येत राहतात. बहुश्रुतपणा हे काव्याचं लक्षण आहे असं माझं म्हणणं नाही. पण ग्रेसच्या कवितांचं एक वैशिष्ट्य म्हणून ते जाणवतं. पण या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन ग्रेसची कविता अर्थगर्भी आहे आणि तेच तिचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिची अर्थविभोरता वाचकाला थांबायला लावते आणि हलके हलके पाकळी पाकळी उलगडत समोर येते.

१.
फुलांची नावे
मला कधीही आठवत नाहीत
वनवासात संपलेले दिवस
कुठेही भेटत असतात
२.
या दुःखाचे आकाशध्यानही, अचेतन
वाळूच्या असंख्य कणांसारखे संज्ञाहीन
वाटते
जेव्हा संध्याकाळच्या सावल्या झडू
लागतात; काळोखाचे नादवाही प्रवाह चढू
लागतात; तेव्हा आपल्या मनात लांबच
लांब पसरलेले निर्मनुष्य रस्तेही जुळू
लागतात…
आषाढविरहित रात्रीच्या उत्तरार्धात विदीर्ण
झालेल्या पांडुरंगाच्या देवळासारखे

काही वेळा मुक्तछंदातल्या काही कविता हे वेगवेगळ्या ओळींवर छापलेलं गद्य वाटतं पण त्यातली काव्यमयता जाणवत राहते.

एकंदर ज्या वाचकाला कविता म्हणजे थांबून, पारखून, तिचे वेगवेगळे पदर उलगडून पाहणं भावतं आणि जमतं त्या वाचकासाठीची ही वाचकासाठी न लिहिलेली कविता आहे. तिचा भुंगा लावून घ्यायचा की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं.
- नीतीन मोरे











* लेखातील कवितांचे सर्व संदर्भ "चंद्रमाधवीचे प्रदेश" मधून घेतले आहेत.

२ टिप्पण्या: