संपादकीय

नमस्कार मंडळी,


सर्वप्रथम ऋतुगंधच्या नव्या समितीतर्फे तुम्हाला हार्दिक अभिवादन! गेल्या वर्षीच्या सुसंस्कृत आणि दर्जेदार अंकांच्या पाठोपाठ आम्हीसुद्धा तुमच्यासाठी नवीन, रंजक आणि अर्थपूर्ण अनुभव देणारे अंक घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यातला पहिला अंक - ऋतुगंध ग्रीष्म आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 

या वर्षीच्या ऋतुगंध अंकांसाठी आम्ही निवडलेली केंद्र-कल्पना आहे 'नाती-गोती'. माणसाच्या आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतलेले असतात ते म्हणजे नाते-संबंध. जवळची, लांबची, रक्ताची, प्रेमाची, मैत्रीची… अशी अनेक नाती धरून ठेवत, सोडत-तोडत-जोडत आपला प्रवास चाललेला असतो. अगदी एकलकोंड्या माणसाचंही एखाद्या गाण्याशी किंवा कवितेशी, घराशी किंवा अगदी त्याच्या laptop शी नातं जुळलेलं असतंच. या सगळ्यावर मनापासून लिहिण्यासारखं, वाचण्यासारखं, पुन्हा अनुभवण्यासारखं किंवा नवीन दृष्टीने बघण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे यांवर आधारित ऋतुगंधचे अंक तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा आहे. 

पहिल्या अंकासाठी आम्ही स्वतःपासून सुरुवात करायची ठरवली असल्यामुळे या अंकात आपल्याला स्वतःशी असलेल्या नात्यावर काही विचार, अनुभव वाचायला मिळतील. काही जणांना या निमित्ताने आत्तापर्यंतच्या आयुष्यावरून नजर फिरवावी असं वाटलं, काहींनी अंतर्मुख होत स्वतःशी नव्याने संवाद साधला तर काहींनी इतर नात्यांच्या गुंत्यामध्ये स्वतःचं अस्तित्व शोधलं. 

या वर्षी अजून काही नवी सदरेही चालू करीत आहोत. 'आरोग्यम् धनसंपदा' या लेख मालिकेतून उत्तम आरोग्य राखण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि त्यामागची आयुर्वेदातली तत्वं आपल्याला वाचायला मिळतील. 'वेगळ्या वाटा' या सदरांतर्गत सिंगापूरमध्ये राहून आपल्या करिअरचं निराळेपण जपणारे अवलिया त्यांच्या व्यवसाय/नोकरीमधले अनुभव सांगतील. सिंगापूर-स्पेशल सिरीजमध्ये सिंगापूर सोडून लांब गेलेल्या अश्या लोकांना सिंगापूरशी त्यांचं नातं कसं होतं हे आम्ही विचारणार आहोत. याशिवाय इतरही खुसखुशीत लेख, कविता, पाककृती आणि कलाविष्कारसुद्धा अंकाची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहेत. 

तर मंडळी, ब्लॉग स्वरुपात अंक असल्यामुळे वाचल्यावर लगोलग प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुम्हाला अंक कसा वाटला हे लेखकांना आणि आम्हालाही जाणून घ्यायला खूप आवडेल. 

सस्नेह,
ऋतुगंध २०१६ समिती 

२ टिप्पण्या:

  1. या सुंदर पहिल्या अंकाबद्दल ऋतुगंध २०१६ समितीचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. या सुंदर पहिल्या अंकाबद्दल ऋतुगंध २०१६ समितीचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा