आरोग्यम् धनसंपदा - दोषानुरूप आहारविचार भाग १

"बाप रे, आयुर्वेदिक  औषध म्हणजे खूप पथ्य सांभाळावं लागतं!" आपल्या सगळ्यांच्याच मनात असा विचार कधी ना कधी येऊन गेला असणार. खरंच, आयुर्वेदात आहाराला खूप महत्त्व दिलं आहे. कारण दोषानुरूप संतुलित आहार केला तर मनुष्य आजारी पडायची शक्यता कमीच!

काश्यप संहितेत असं म्हटलं आहे की तुमचा आहार योग्य असेल तर तुम्हाला औषधाची गरज नाही आणि आहार अयोग्य असेल तर औषधाचाही पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. म्हणूनच आयुर्वेदात आहाराला (पथ्यापथ्य) खूप महत्त्व दिलं आहे.

आपलं शरीर आणि आपला आहार दोन्हीही पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांपासून निर्माण होतात. आपण जो आहार घेतो त्यापासून आपलं शरीर तयार होतं तसंच रोगही आहारापासून निर्माण होतात कारण, "What we eat is what we become!" 

Diet म्हणलं की आपल्याला carbohydrates, proteins, minerals, vitamins च्या food pyramid ची आठवण होते. पण आयुर्वेदात आहाराचा विचार हा खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मुख्यत्वे दोषानुरूप केला जातो. व्यक्तीची प्रकृति (constitution), दोषांमधील असंतुलन, अग्नि (digestive power), देश (उष्ण / शीत कटिबंध, विषुववृत्त) व ऋतुकाल याचाही विचार केला जातो.  
उदा:
१) उडीद, तूर व मूग या डाळींत प्रोटीनचं प्रमाण जवळजवळ सारखंच आहे, परंतु उडीद हे पचायला जड व तूर हे अत्यंत पित्तकर असतात. म्हणूनच पचायला हलके व पित्तशमन करणारे मूग सर्वांना हितकर आहेत. 
२) ज्वारी व बाजरी पचायला हलकी पण ज्वारी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात व बाजरी उष्ण असल्यामुळे थंडीत वापरावी. गहू हे शीत असून पचायला जड व रक्त-मांसवर्धक असतात. 


दोषानुरूप आहाराचा विचार करण्यापूर्वी दोष आणि प्रकृति म्हणजे काय ह्याचा विचार करूया. 

दोष - शरीरातील पंचमहाभूतांच्या संयोगामधून वात-पित्त-कफ ह्या तीन दोषांची (life forces or energies of our body) निर्मिती होते.शरीरामधील वात-पित्त-कफ दोषांचं आधिक्य अथवा क्षय झाला तर स्वास्थ्य बिघडते व रोगाचा जन्म होतो. अशावेळी जागरूक राहून वात-पित्त-कफ ह्या दोषांची साम्यावस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आहार घेतला की आरोग्य लाभते. 

प्रकृति - वात-पित्त-कफ हे तीनही दोष जन्मापासून आपल्या शरीरात असतात, पण वेगवेगळ्या प्रमाणात. ज्या दोषाचं शरीरात अधिक्य असतं त्यावरून स्वस्थ व्यक्तींमध्ये सात प्रकारच्या प्रकृति आपल्याला पहायला मिळतात. 
१) वात प्रकृति २) पित्त प्रकृति ३) कफ प्रकृति ४) वात-पित्तात्मक प्रकृति ५) पित्त-कफात्मक प्रकृति ६) वात-कफात्मक प्रकृति ७) त्रिदोषात्मक प्रकृति 

आपणा सर्वांनाच आपली प्रकृति कुठली ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल. त्यासाठी www.chopra.com ह्या website वर जाऊन Explore Our Resources मधील Dosha Quiz घ्यावी. 

आपली प्रकृति अशाप्रकारे जाणून घेतल्यावर आता आपण ह्या लेखात वातदोषानुरूप आहाराचा विचार करूयात व पुढील लेखात पित्त व कफ दोषानुरूप आहाराचा विचार तसेच काही महत्वाच्या सूचना. 


वातदोषानुरूप पथ्यापथ्य विचार 

ह्या आहाराचे पालन कोणी करावे - 
 • वातप्रकृतिप्रधान स्वस्थ व्यक्तींनी 
 • वर्षाऋतूत 
 • वृद्धापकाळी (६०+)
 • वातज रोग असणाऱ्यांनी - osteoarthritis, rheumatoid, arthritis, cervical / lumbar spondylosis, frozen shoulder, sciatica, parkinsons, paralysis etc.
 • वातवृद्धी लक्षणे असणाऱ्यांनी - रुक्ष त्वचा, डोक्यात कोंडा, अंगदुखी, अंग जखडणे (stiffness), थोड्याश्या श्रमाने अंग दुखणे, हातापायाला मुंग्या किंवा टोचल्याप्रमाणे वेदना होणे, निद्रानाश, मलावरोध (constipation), डोळ्याभोवती काळी वर्तुळे 
Dont's (अपथ्य / वर्ज्य) 
 • चणा, वाटाणा, छोले, मका असे रुक्ष व वातवर्धक पदार्थ 
 • जास्त प्रमाणात कडधान्य, कच्चे salad, कच्च्या भाज्या 
 • फरसाण, चिवडा, पापडी, शेव 
 • फ्रिजचे थंड पाणी, cold drinks, ice cream
 • वारंवार उपवास, जागरण, अतिव्यायाम, अतिचिंता, अतिशोक 
 • अतितिखट, अतितुरट, कडू पदार्थ तसेच शिळे अन्न 
 • मल-मूत्रादि वेगांचा अवरोध 
Do's (पथ्य)
 • गोड, आंबट व किंचित खारट पदार्थ आहारात घ्यावेत. 
 • नेहमी ताजं, गरम व स्निग्ध (तेल-तूपाचा वापर) अन्न घ्या. 
 • सकाळी न्याहारीला तूप + मीठ + भात किंवा बाजरी / नाचणीची भाकरी व लोणी अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन 
 • मूग, मूगाची डाळ किंवा अख्खे मसूर ह्यांचे वरण, आमटी किंवा कढण 
 • भाजी, आमटीत हिंग, लसूण, जिरे, आले, मिरी, ओलं खोबरं याचा योग्य प्रमाणात वापर करावा. 
 • फळभाज्या - दुधी, पडवळ, लाल भोपळा, बीट, गाजर
 • दिवसातून किमान ३-४ वेळा थोडे थोडे अन्न सेवन करावे. 
 • वातदोषाचे शमन व शरीरातील लक्षणे कमी करण्यासाठी सर्वांगाला तेलाने मालिश करावे. 

पुन्हा भेटू "आरोग्यम् धनसंपदा" च्या पुढच्या भागात - "दोषानुरूप आहारविचार - भाग २"

- डॉ रुपाली गोंधळेकर

M.D (A.M.), B.A.M.S. आरोग्यम् धनसंपदा मालिकेतील आधीचे लेख :

1 टिप्पणी: