मैत्री निसर्गाशी

'मैत्री' हा शब्द​ ​जितका छोटा​, ​तितकाच त्यात ​मोठा ​अर्थ सामावलेला आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात ​'मित्र' या नात्याने ​​मला ​कोण कोण भेटले ते मी आठवू लागले. खेळायला लागल्यापासून ते ​शाळेत जाईपर्यंत, मग पुढे कॉलेज व हॉस्टेलमधील अनेक मित्र मैत्रिणींची आठवण झाली. त्यातील काहींशी ​गाढ मैत्री हो​ती. हल्ली तर फेसबुक व इतर माध्यमातून भेटलेल्या व न भेटलेल्या व्यक्तींबरोबरही मैत्री होऊ शकते, पूर्वी 'पेन फ्रेंड्स' होते ना तसे. आयुष्यात बरेच बदल घडून येतात व त्यामुळे काही मैत्रीच्या गाठी सैल होऊ लागतात. दुरावा निर्माण होतो. कधी तर नावे व चेहरा सुद्धा विसरून जायला होते. मान, अपमान, हेवे, दावे हे सांभाळावे लागते ते वेगळेच. 

म्हणूनच 'निसर्ग' हा 'मित्र' म्हणून मला सर्वात जवळचा वाटतो. त्याच्याबरोबर केलेल्या मैत्रीला कधी​च धक्का लागणार नाही असे वाटते. निसर्ग मला झाडे, फुले, फुलपाखरे, पक्षी, डोंगर, पर्वत, नद्या, चंद्र, चांदण्या व सूर्य यांची अनेक रूपे दाखवतो. मला ​त्यातून ​निखळ आनंद ​मिळतो. त्या​पैकी माझी पानाफुलांशी फार ​जिव्हाळ्याची ​ व गाढ ​मैत्री आहे. माझे बालपण​ कोकणातल्या सुंदर गावी म्हणजे 'दिवेआगर' ​येथे गेले. घरामागे उंच नारळी, पोफळीच्या बागा, त्यामागे खळाळणारा समुद्र, अंगणात सुंदर फुलझाडे यांनी मन मोहून जायचे. त्यांच्याशी बघताबघता​ ​चांगलीच​ ​मैत्री झाली. रोज सकाळी आई ​​परडीभर फुले घरात आणत असे. त्याचा सुगंध घरभर दरवळे. त्याच्या रंगछटा पहात रहावे असे वाटे. त्याचे निरीक्षण करता करता तासंतास निघून जायचे. मी तिच्या मागे मागे बागेत जात असे. कुठल्या झाडाला नवी कळी आली आहे, कुठलं झाड ​फोफावत आहे, कशाला पाणी कमी पडते आहे. ते ती मला सांगायची. तिच्या सोबत जाऊन ते पहायला मला आवडायचे. पारिजातकाचा लाल पांढरा सडा व त्याचा मंद सुगंध​,​ वेड लावायचा. कुंदाचे झाड त्याच्या कुंदकळ्या व पांढ-या फुलांनी बहरलेले असे. ती तगर शुभ्र चांदण्या लेवून मला खुणवायची, बोलवयाची. जास्वंद अनेक रंगांची उधळण करून मला सगळे रंग शोधायला सांगायची. लहान ​ मुलांच्या रोज होणा-या बदलांचे निरीक्षण करताना जसे मन कौतुकाने भरून येते तसे प्रत्येक कळीची वाढ​, फुल उमलेपर्यंत​ ​पहायला मला आवडायचे. आमच्या मागच्या अंगणात एक पांढ-या​ ​कांचनाचे झाड होते. त्यावर दंव पडले की असे वाटायचे की प्रत्येक पाकळीत​ ​जणूकाही हिरे जडवून ठेवले आहेत. या माझ्या मित्राने दिलेला हा​ ​आनंदाचा खजिना मला आयुष्यभर पुरेल असा आहे. ​​मी जशी मोठी झाले तसे मला प्रत्येक झाडाची गरज कळू लागली. कोणाला किती पाणी हवे, कोणत्या प्रकारची माती व खत हवे तर कोणत्या झाडाला कडक ऊन आणि कुठल्या झाडाला सावली. कुटुंबात नाही का प्रत्येकाचे नखरे व आवडी वेगळ्या असतात तसे. त्यांना जसे हवे तसे सर्व ​मिळाल्यावर त्यांचा चेहरा जसा खुलतो तसेच या निसर्ग-मित्रांचेही आहे. ​मनापासुन मशागत केली​, काळजी घेतली, त्यांच्याशी गप्पा केल्या व त्याचबरोबर मायेने हात फिरवला की मग पहा कळ्या, फुलांनी तरारून तुमच्या मैत्रीची ते कशी परत फेड करतात ते. संगीत गुणगुणलेलेही त्यांना आवडते. ​मोगरा, गुलाब, तगर, जास्वंद यांना कडक ऊन हवं तर शोभेची झाडे सावलीत व घरात बहरतात. ओवा, तुळस, कडुलिंब म्हणतात माझी काळजी घ्या, माझ्या समिप राहा मग ​कशाला हवा ​डॉक्टर व कशाला हवी औषधे? ​​​या मित्रांसोबतचा आनंद मी लहान पणापासून अनुभवला आहे. ​लग्नानंतर कोकणातून पुण्याला फ्लॅटमध्ये आल्यामुळे या मित्र मंडळींच्या सहवासाला मी दुरावणार असे वाटत होते. ​पण आमच्या टेरेसवर ३०० हून जास्त फुलझाडे लावल्यामुळे ही मैत्री गाढच होत राहिली व इथे​ सिंगापुरमधे तर ​जागोजागी बगीचे आहेतच​. 

निसर्गाने आपल्यावर रंग, सुगंध व हिरवा ताजेपणा याची बरसातच केली आहे. निसर्गाची ही श्रीमंती पाहून थक्क व्हायला होते. झाडे, फुले हा माझासाठी इतका संवेदनशील विषय आहे की त्याच्यासमोर मला इतर गोष्टी दुय्यम वाटतात.​ हा माझा 'वीक पॉईंट' आमच्या घरात सर्वांना चांगलाच माहीती आहे. मला लहानपणीची एक गंमत आठवते. माझ्या धाकट्या भावाला माझी कुठलीही वस्तू हवी असली व मी त्याला ​'देत​ नाही' असे म्हटले तर तो बागेत जाऊन​ एखाद्या रोपाशी उभा राहायचा व "देतेस​.....की उपटून टाकू?" असे विचारायचा. मग काय, त्याला माहीती होते की त्याला हवी असलेली ती ताईची वस्तू लगेच मिळणार. आता तो प्रसंग आठवला की आम्ही दोघे खूप हसतो व तेंव्हा मनात राहिलेला धपाटा त्याच्या बायको व मुलांसमोर माझ्याकडून त्याला मिळतो. अशी ही माझी आगळी वेगळी निसर्ग-मैत्री मला आनंद देते. आम्ही उभयता कुठे तरी घाईगडबडीत जात असतो व आमचे 'हे' पुढे चालत राहातात. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येते की आपण एकटेच पुढे ​चाललो आहोत. मग मागे मी ज्या झाडाशी गप्पा मारत असेन तिथे येऊन मला म्हणतात, "मित्र भेटला तर एकटीच काय बोलत बसलीस, माझी पण ओळख करून दे ना". मी पण म्हणते "त्या आमच्या खास गप्पा होत्या. पुढल्या वेळी देईन ओळख करून. चला, उशीर होतोय."

चित्र: श्रीरंग केळकर 


- सौ. स्नेहल केळकर


६ टिप्पण्या:

  1. निसर्ग हा अगदी जिवाभावाचा मित्र, माझाही ! सुरेख लिहिलेय विशेष करून झाडांचे , फुलापानांचे वर्णन अगदी जवळचे वाटले.
    शेवटही मस्त !
    Pic too is so cute👌👏

    उत्तर द्याहटवा
  2. मना पासुन दाद द्यावीशी वाटते.खरे तर हा मेसेज सुवर्णाने पाठवला.त्या मुळे तीला धन्यवाद देतो. निसर्गत नैसर्गिक रीतीने रममाण होणे हे निसर्ग दोस्तीचे उत्तम लक्षण.जे निसर्गात रमतात ते खुप खुप आनंदी असतात व रहातात.इतरांना व घराला आनंदी ठेवतात. लेख खुप उत्तम लिहीला आहे. विचार खुप छान मांडलेत मस्त वाटले.

    उत्तर द्याहटवा
  3. मना पासुन दाद द्यावीशी वाटते.खरे तर हा मेसेज सुवर्णाने पाठवला.त्या मुळे तीला धन्यवाद देतो. निसर्गत नैसर्गिक रीतीने रममाण होणे हे निसर्ग दोस्तीचे उत्तम लक्षण.जे निसर्गात रमतात ते खुप खुप आनंदी असतात व रहातात.इतरांना व घराला आनंदी ठेवतात. लेख खुप उत्तम लिहीला आहे. विचार खुप छान मांडलेत मस्त वाटले.

    उत्तर द्याहटवा