आसुसलेला चातक

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३

भारतात वाढलेल्या कुठल्याही व्यक्तीला तिथल्या समृद्ध सामाजिक जीवनाचे महत्त्व काही नव्याने सांगायची गरज नाही. अर्थातच, त्यात मैत्री सुद्धा आलीच. शाळा कॉलेजमध्ये आणि कामाच्या ठिकाणीच नाही, तर शेजारी-पाजारी सुद्धा अनेक मित्र-मैत्रिणी असणे हा त्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु विदेशी भारतीय मात्र या बाबतीत तेवढे भाग्यवान असतीलच असे नाही. या सुखापासून ते तसे थोडे वंचितच रहातात, विशेषतः अचानक जीवनपद्धतीत बदल झाल्यावर. याचा त्यांच्या आयुष्यावर आणि मनावर कमी जास्त प्रमाणात नक्कीच परिणाम होतो. गेली वीस-पंचवीस वर्षे परदेशी रहाणारी अस्मिता आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भारतात आली असताना भेटली, आणि कार्यक्रमात भरभरून बोलू लागली. अस्मितासारख्यांची कथा आणि व्यथा, तसेच त्याचा निहितार्थ आजच्या काळाच्या दृष्टिने काय असू शकेल, हे मांडण्याची संधी मात्र आज मिळाली.

मुंबईत वाढलेल्या अस्मिताचे कॉलेजचे शिक्षण संपता संपताच परदेशीच स्थायिक झालेल्या मुलाशी ध्यानीमनी नसताना अचानक लग्न ठरले आणि काही दिवसातच ती नवऱ्याबरोबर थाटात आणि आनंदात परदेशी निघाली. नवीन देश, नवीन वातावरण यात सुरुवातीचे कुतुहलाचे दिवस अर्थातच मजेत गेले. पण तो कुतुहलाचा आणि नाविन्याचा भर ओसरल्यावर मात्र तिला हळूहळू एकटेपणाची जाणीव व्हायला लागली. थोड्याफार भारतीयांशी ओळखी झाल्या, पण त्यांची घरे लांब. अनेक कुटुंबे तर एखाद दोन वर्षांसाठीच परदेशी आलेली असायची. जरा ओळख व्हावी, तर त्यांचे परतीचे दिवस यायचे. काहींशी परदेशी मैत्री झाली, तरी भारतातल्या मैत्रिणींकडे तिचे मन ओढ घेतच राही; त्यामुळे जिवाभावाच्या मैत्रीसाठी आणि नियमित सुखदुःखांच्या, शिळोप्याच्या गप्पांसाठी अस्मिताचा जीव वर्षाऋतुच्या आगमनापूर्वीच्या चातकाप्रमाणे आसुसायला लागला. रोज मनमोकळेपणाने मैत्रिणीशी बोलावे ही साहजिकच तिची अनेक वर्षांच्या सवयीनुसार मानसिक गरज बनली होती. 

त्यावेळी इंटरनेट चा जन्म अजून जेमतेमच होत होता. व्हाट्स ऍप्प वगैरे तर दूरचीच गोष्ट झाली. नियमित भारतात मैत्रिणींना फोन करणे परवडण्यासारखे नव्हते. अस्मिता ने जरी भारतातल्या मैत्रिणींना पत्रे लिहिली, तरी ती तिच्या मानसिक गरजेच्या दृष्टीने एक प्रकारची तडजोडच होती. ती पत्रे भारतात पोचण्याची आणि मग कुणी उत्तर लिहिले असेल का हा विचार करण्यात आणि वाट बघण्यात तिचे अनेक दिवस निघून जायचे. हळू हळू घरातच इंटरनेट, ईमेल आले. परदेशात ईमेल सर्रास वापरले जात असले, तरी भारतात मात्र ते तितकेसे अजून प्रचारात आले नव्हते. तिने कुणाला ईमेल लिहिले, तरी ते कुणी उघडेपर्यंतच मुळी अनेक दिवस जायचे. त्यामुळे उत्तराची वाट बघणे हे या चातकाचे सुरूच होते. अस्मिताच्या मनावर अर्थातच याचा थोडाफार परिणाम होऊ लागला. लग्नाआधीच्या भारतातल्या सामाजिक जीवनाशी नकळत तुलना होऊ लागली आणि अस्मिता मनाने काहीशी खचू लागली. 

कालांतराने सोशल मिडियाचा जन्म झाला तेव्हा मात्र जग छोटे होवू लागले. अस्मिताच्या मनातला चातक जणु वर्षा ऋतुच्या आगमनाच्या तृप्तिच्या दिशेने वाटचाल करू लागला. आता क्षणात कुणालाही मेसेज पाठवणे सहज शक्य झाले. अस्मिता सारख्या विदेशी भारतीयांना तर हा दैवी उपहारच मिळाला असे म्हणायला हरकत नाही. अनेकांशी तुटलेला संपर्क आता पुन्हा जुळू लागला. अस्मिता हरखून गेली. तिच्या अनेक मैत्रिणी भारतात रहात होत्या. त्या पुन्हा या माध्यमाद्वारे भेटल्या. काही नवीन मैत्रिणीही मिळाल्या. मोबाईल फोन वरून दिवस-रात्र मेसेजेस चा भडीमार व्हायला लागला. अस्मिताची मानसिक गरज ऑनलाईन चॅट च्या रूपात थोड्या फार प्रमाणात का होईना पण भागायला लागली. सुरुवातीला चॅट करायला बहुतेकवेळा हवे तेव्हा कुणी ना कुणी उपलब्ध असायचेच. अस्मिताने काही मेसेज टाकला कि कुणी ना कुणी उत्तर द्यायचेच. त्यामुळे अस्मिताच्या अपेक्षा ही तश्याच बनल्या. एखाद्या वेळी अस्मिताच्या मेसेज ला कुणी अपेक्षित प्रतिक्रिया दिली नाही तर तिच्या मनात नको ते वेगवेगळे विचार येऊ लागायचे. एकदा अस्मिताने तिच्या मुलाला स्पर्धेत बक्षीस मिळाल्याचा मेसेज तिच्या अनेकमैत्रिणींना पाठवला. विचित्र योगायोग म्हणा, पण नेमके त्यावेळी कुणीच उत्तर दिले नाही. अस्मिताची अस्वस्थता वाढू लागली. ‘कुणाला माझ्यासाठी वेळच नाही, कुणाला माझ्या मुलाचे कौतुकच नाही’, असे भलभलते विचार तिच्या मनात येऊ लागले. मैत्रिणी नसताना नव्हता त्यापेक्षा जास्त मानसिक त्रास अस्मिताला आता ऑनलाइन मैत्रिणी मिळाल्यावर होऊ लागला. यात अस्मिताची मानसिक असुरक्षितता वाढायला लागली. स्वतःच्या मानसिक गरजांपुढे अस्मिताच्या हे लक्षात आले नाही कि कदाचित मेसेजला उत्तर न देण्यामागे तिच्या मैत्रिणींची व्यक्तिगत कारणेही असू शकत होती. प्रत्यक्ष संभाषण करताना समोरच्याची प्रतिक्रिया तत्काळ मिळते. ते मेसेजच्या माध्यमातून शक्य होइलच असे नाही.

ती व्यक्ती व्यस्त असू शकते, किंवा आजारीही. कधी त्या व्यक्तीच्या आयुष्यात व्यक्तिगत अडचणी असू शकतात. त्या व्यक्तीची मनस्थिती त्यावेळी नेमकी कशी आहे, हे जाणून घेणे ऑनलाईन संभाषणामध्ये शक्य होईलच असे नाही. तसेच या गोष्टीची दुसरी बाजू बघता, अस्मिताच्या ह्या ऑनलाईन मैत्रीकडून असलेल्या अपेक्षा आणि गरजा कदाचित इतरांच्या दृष्टीने तितक्याशा प्राथमिक नसाव्यात. भारतातच रहात असल्याने त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटणारे मित्र मैत्रिणी होते. अस्मिता 

त्यांच्या दृष्टीने कदाचित नियमितपणे प्रत्यक्ष समोर नसणारी आणि त्यामुळे थोडीशी दुय्यम असणारी मैत्रीण असावी. ऑनलाईन मैत्री करताना दोन्ही बाजूंनी विचार करणे आणि या सगळ्या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे हे अस्मिता आणि तिच्या मैत्रिणींच्याही तितके ध्यानात आले नसावे. 

मैत्री केली म्हटल्यावर ती निभावणे आले. जसे मित्राची किंवा मैत्रिणीची मानसिकताच नाही, तर त्यांच्या गरजा, या मैत्रीपासूनच्या अपेक्षा, त्यांचे स्वभाव हे जाणून घेणे जितके महत्वाचे आहे, तसेच मैत्रीत निष्ठा असणे, एकमेकांच्या गरजेच्या वेळी हजर असणे आणि आधार देणे हेही तितकेच महत्वाचे आहे. मैत्री, ही अनेकांसाठी एक मानसिक गरज आहे. मैत्री ऑनलाईन असो किंवा कुठल्याही स्वरूपाची असो, ती योग्य रीतीने, वाजवी अपेक्षेने आणि निष्ठेने सांभाळणे हे महत्वाचे. नाहीतर हा चातक वर्षाऋतुच्या वाटेकडे डोळे लावून कायम आसुसलेलाच राहील का? 

डॉ. अर्चना कुसुरकर



८ टिप्पण्या:

  1. सुंदर,परदेशातील प्रत्येकाचा अनुभव.

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान लेखन.माझा स्वानुभव....पण तु तो छान शब्दात मांडला आहेस

    उत्तर द्याहटवा