ज्ञानेश्वर

बेडलॅम्पच्या मिणमिणत्या प्रकाशात हॉस्पिटलच्या बेडवर 'रे'चं हडकुळं शरीर कापसात पडलेल्या काडीसारखं दिसत होतं. नाकातोंडात नळ्या, व्हेंटिलेटरचा लयबद्ध आवाज आणि हॉस्पिटलचा निर्जंतुक वास. अर्ध्या गाऊनमधून बाहेर आलेल्या रेच्या वाळलेल्या हाता-पायांकडे निरखून बघत बघत त्याची नजर जाऊन रेच्या प्रचंड सुरकुतलेल्या चेहर्‍यावर जाऊन स्थिरावली. दहा-पंधरा सेकंद तो टक लावून पाहात असतानाच अचानक रेने खाडकन डोळे उघडले आणि सलाईन लावलेल्या शुष्क खरखरीत हाताने त्याचा हात गच्च पकडला.

"आय वॉन्ट टू लिव्ह, योगेश," रे त्याच्या नळ्यांमागच्या बोळक्या तोंडाने थरथरत बोलायला लागला. "आय वॉन्ट टू लिव्ह. आय वॉन्ट ए बेबी. यू हियर मी? आय वॉन्ट ए बेबी." 

त्याने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण म्हातार्‍याच्या पकडीत खूप जोर होता. त्यांची थोडी झटापट झाली. जेवढा जोर लावू तेवढी म्हातार्‍याची पकड घट्ट होत होती आणि आवाज चढत चालला होता. शेवटी कर्णकटू आवाजात म्हातारा किंचाळू लागला आणि त्याच्या शरीराला जोडलेली सगळी यंत्रे घणघणू लागली. कानावर हात ठेवायचे होते म्हणून तो जोर लावून हात ओढत होता पण त्याचा हात जणू म्हातार्‍याच्या हाताने गिळला होता. दातओठ खाऊन त्याने अडकलेला हात मागे खेचायचा प्रयत्न केला आणि.. 

… दचकून त्याला जाग आली. खोलीभर मोबाईलचा रिंगटोन घणघणत होता. आपण कुठे आहोत हे कळायला त्याला थोडा वेळ लागला. त्याने डोके उचलून खिडकीकडे पाहिले. बाहेर अजून अंधारच होता. एवढ्या रात्री फोन म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार हे त्याच्या मेंदूत कुठेतरी नोंदले गेले. स्वतःच्याच अंगाखाली अडकलेला हात सोडवून घेत तो पालथ्याचा उताणा झाला आणि बेडवर उठून बसला. टेबलवरचा फोन एव्हाना वाजायचा बंद झाला होता. साईड टेबलवरच्या घड्याळात सकाळचे चार वाजलेत हे त्याने पाहिले असेल नसेल तोच फोन परत वाजू लागला. धडपडत जाऊन त्याने फोन उचलला. 

"हं..हॅलो..". 
"डॉख्टर खँबली?" पलीकडून दणदणीत आवाज आला. "धिस इज सार्जंट टॅवर्मिना फ्रॉम होमलॅन्ड सिक्युरिटी, सर. वि हॅव अ‍ॅन इमर्जन्सी हियर अ‍ॅन्ड यू नीड टू कम डाऊन टू द लॅब, सर. आय रिपीट, यू नीड टू कम डाऊन टू द लॅब एएसएपी." 
"व्ह..व्हॉट्स द प्रॉब्लेम सार्जंट?" 
"आय खॅन्ट टेल यू दॅट ओव्हर द फोन, डॉक्टर खँबली. यू हॅव टू कम..." त्यांचं बोलणं मध्येच तुटलं आणि मागे कोणातरी स्त्रीचा आवाज आला. दोन क्षण शांतता आणि मग फोनवरुन ओळखीचा बायकी आवाज आला. 
"योगेश.." 
"अँड्रिया? व्हॉट हॅपन्ड? व्हॉट्स द प्रॉब्लेम?" त्याने घाईघाईने विचारले. 
"योगेश.. योगेश.. नॅनेश्वर हॅज गॉन योगेश. ही...ही जस्ट रॅन अवे." 
'व्हॉट? हाऊज दॅट पॉसिबल?" तो जवळजवळ ओरडलाच. त्याची झोप आता पुरती उडाली होती. तिच्या उत्तराची वाट न पाहता तो भराभर बोलू लागला, "अ‍ॅन्ड्रिया, लिसन टू मी. डोन्ट लेट देम गो इन्टू द लॅब अन्टील आय अ‍ॅम देअर अ‍ॅन्ड डोन्ट लेट देम नो अबाऊट दि जीपीएस युनिट, ओके? आयल बी देअर राईट अवे. गॉट इट?" 

फोन कट केल्यानंतर दहाव्या मिनिटाला त्याची गाडी लॅबकडे भरधाव निघाली होती. 

***************************** 

"सोऽऽ..यू आर टेलिंग मी, धिस डॅम रोबॉट ऑफ युवर्स व्हायोलेटेड युवर स्टॅन्ड बाय इन्स्ट्रक्शन्स? अ‍ॅन्ड नॉट ओन्ली दॅट, इट प्रिपेअर्ड बॅकप बॅटरीज फॉर इट्स रन..., अ‍ॅन्ड कॉन्कॉक्टेड अ केमिकल फ्रॉम युवर गार्डन श्रब्ज टू सिडेट द गार्ड्स?" सार्जंट टॅवर्मिना त्याच्या बळकट हातांची छातीवर घडी घालून टॉवरवरून बघितल्यासारखं त्याच्याकडे रोखून बघत होता. त्याच्या टीममधले लोक लॅबभर हिंडून काहीतरी तपासणी करत होते. खुर्चीवर बसून ड्रॉवरमधून जीपीएस युनिट काढताना योगेशने एकदा मान वर कडून सार्जंट कडे बघितले आणि पुन्हा जीपीएस ट्रॅकर युनिटकडे वळला. युनिट पूर्ण चालू होऊन पडद्यावर एक ठिपका दिसेपर्यंत दोघेही काहीच बोलले नाहीत. स्क्रीनवर ठिपका दिसायला लागल्यावर योगेशचा ताणलेला चेहरा किंचित निवळला. 

"फर्स्ट ऑफ ऑल, स्टॉप कॉलिंग हिम 'इट'", सार्जंटच्या डोळ्यांना डोळे भिडवत योगेश म्हणाला. "हिज नेम इज ज्ञानेश्वर अ‍ॅन्ड ही इज द स्मार्टेस्ट रोबॉट एव्हर टू वॉक ऑन धिस अर्थ. प्रॉबॅबली वेऽ स्मार्टर दॅन यू.....अ‍ॅन्ड मी." 

ज्ञानेश्वरचा हेतू पळून जाण्याचा असता तर त्याने जीपीएस ट्रॅकर, तो काढणे कितीही अवघड असले तरी, नक्कीच काढून फेकला असता; पण त्याने तसे केले नाही. का? योगेश स्क्रीनवरच्या हलत्या ठिपक्याकडे बघत विचार करत होता. की त्याने ट्रॅकर भलत्याच एखाद्या गाडीला लावून टाकलाय आणि आपली दिशाभूल करतोय? पळून जाण्याचे कारण काय आहे? चार-पाच मिनीटे विचार केल्यावर त्याने मनाशी काहीतरी निश्चय केला. 

"सार्जंट, आय अ‍ॅम प्रेटी शुअर ही विल नॉट हार्म एनीवन, बट आय अ‍ॅम नॉट शुअर इफ द ट्रॅकर इज स्टिल ऑन हिम. देअर इज ओन्ली वन वे टू फाईंड आऊट अ‍ॅन्ड वि हॅव टू डू इट फास्ट." 

सार्जंट ने किंचित डोकं हलवलं आणि झपाझप पावले टाकित बाहेर गेला. त्याच्या गाडीतल्या रेडिओवर तो भराभर बोलत असताना योगेशने खुर्चीवर सुन्नपणे बसलेल्या अ‍ॅन्ड्रियाला धीर दिला आणि जीपीएस युनिट घेऊन बाहेर आला. 

बोलून झाल्यावर सार्जंटने त्याला गाडीत चढायची खूण केली. त्याने वळून दार सताड उघडे असलेल्या लॅबकडे पाहिले आणि क्षणभर विचार करून सार्जंटच्या गाडीत चढून बसला. अर्ध्यातासानंतर एक ऑलिव्ह रंगाचे हेलिकॉप्टर सार्जंट, योगेश आणि पाच-सहा जणांच्या स्वॅट टिमला घेऊन शहरावरून उडू लागले. 

"इफ इट इज रियली हिम, ही सीम्स टू बी हेडिंग टुवर्ड्स योसेमिती पार्क," स्क्रीनवरच्या नकाशातल्या ठिपक्याकडे पाहात सार्जंट म्हणाला, "टेल मी मोअर अबाऊट हिम." 

योगेशने एक नि:श्वास टाकला आणि समोर काचेतून झुंजुमुंजू होणार्‍या पूर्वेकडे पाहात सार्जंटला काय-काय सांगायचे त्याचा विचार करु लागला. 

***************************** 

पंधरा वर्षांपूर्वी तो लॅबमध्ये जॉईन झाला त्याआधीच त्याने रे बद्दल पुष्कळ ऐकले होते. रेची बुद्धिमत्तेच्या विस्फोटाची आणि टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटीची थियरी सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्याआधीपासूनच बरीच चर्चेत होती आणि त्याचं अतिबुद्धिमान यंत्रांच्या साहाय्याने स्वतःच्या वडिलांना पुन्हा जिवंत करण्याचं स्वप्नसुद्धा. योगेशने हायरार्किकल न्यूरल नेटवर्क्स आणि पॅटर्न मॅचिंग अशा दोन विषयांमध्ये डॉक्टरेट्स मिळवल्यावर त्याला खुद्द रेने फोन केला तेव्हा रे ऐंशी वर्षांचा होता. रेसाठी काम करण्याची ऑफर योगेशने आनंदाने स्वीकारली. 

मानवी मेंदूत रेप्टिलियन, लीम्बिक आणि निओकॉर्टेक्स असे तीन भाग असतात आणि या तीन भागांमध्ये वेगवेगळ्या पण जोडलेल्या न्यूरल नेटवर्क्सची उतरंड असते. या उतरंडीमुळेच एखादा विचार करताना आपण काय विचार करतोय याबद्दलही त्याचवेळी आपण विचार करु शकतो. केमिकल संदेश वाहून नेणार्‍या न्युरॉन्सच्या माध्यमातून काम करणारा मानवी मेंदू हा सुद्धा आपोआप तयार झालेला एक कॉम्प्युटरच होय. तर्कशक्तीपेक्षाही मेंदूचा मोठा भाग पॅटर्न मॅचिंगमध्ये पारंगत असतो. पण केमिकल संदेशांमुळे निर्माण होणार्‍या मानवी भावभावना या नैसर्गिक कॉम्प्युटरचा पूर्ण तार्किक पद्धतीने वापर करण्यात अडथळा आणत असतात. मेंदूच्या नेटवर्क्सची हुबेहूब नक्कल करुन त्यातले भावभावनांचे अडथळे दूर करुन माणसासारखाच पण माणसापेक्षा खूप जास्त वेगाने तार्किक विचार करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. अशी बुद्धिमत्ता असलेले एक यंत्र निर्माण केल्यावर ते यंत्र स्वतःपेक्षाही अधिक बुद्धिमान असलेले यंत्र निर्माण करेल आणि ते यंत्र मग त्यापेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्र तयार करेल. असे करत करत बुद्धिमत्तेचा महास्फोट होईल आणि सर्वज्ञानी व सर्वशक्तिमान अशी यंत्रे तयार होतील अशी रेची अटकळ होती. अशा यंत्रांना निसर्गाची सर्व रहस्ये क्षणात समजतील आणि जगातले सर्व प्रश्न ती चुटकीसरशी सोडवतील असा रेचा दावा होता. 

खूप प्रयत्नांनी त्यांना एका शक्तिमान सुपर कॉम्प्युटरमध्ये अशी एक प्रणाली निर्माण करण्यात यश आले. माणसाप्रमाणेच आजूबाजूला घडणार्‍या घटना, वस्तू, आवाज इत्यादी टिपून, साठवून प्रत्येक चिन्हाला अर्थ प्रदान करून शिकणारी न्यूरल नेटवर्क्सची उतरंड त्यांनी बनवली. जवळजवळ पाच वर्षे त्या प्रणालीच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आणि तिच्यात सुधारणा करण्यात त्यांनी घालवली. दरम्यान नॅनो टेक्नॉलॉजीमुळे कॉम्प्युटर चिप्स बनवण्यात इतकी प्रगती झाली की माणसाच्या डोक्यात बसवता येईल इतक्या आकाराचे सुपर कॉम्प्युटर बनवता येऊ लागले. अखेर एक वर्षापूर्वी त्यांनी मानवसदृश आकाराचा एक यंत्रमानव बनवण्याचा आणि ती प्रणाली त्या यंत्रमानवात बसवण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने तीन महिन्यांपूर्वी एक यंत्रमानव जन्माला आला. त्याला योगेशने नाव दिले "ज्ञानेश्वर." 

कोर्‍या पाटीने जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने प्रचंड वेगात विचार करण्याची क्षमता, दृश्य आणि आवाज ओळखण्याची शक्ती, आणि प्रचंड स्मरणशक्तीच्या जोरावर झपाट्याने शिकायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरचा जन्म झाला तोपर्यंत रे पंच्याण्ण्व वर्षांचा झाला होता आणि त्याची प्रकृती झपाट्याने ढासळत होती. अनेक कृत्रिम अवयवांचे रोपण करुन आणि अनेक औषधे व टॉनिक्स खाऊन तोपर्यंत त्याने तग धरला होता पण त्याच्याकडे फार कमी दिवस उरले होते. म्हणून मग त्याने योगेशकडे आणि ज्ञानेश्वरकडे नवीन अधिक प्रगत प्रणाली बनवण्याचा लकडा लावला. "आय वॉन्ट ए बेबी" हे त्याचं आवडतं वाक्य होतं. ज्ञानेश्वरने महिन्याभरातच इंटरनेटवर उपलब्ध असलेले व पुस्तकांमधले जवळजवळ सगळे ज्ञान मिळवले. त्याच्या शरीरात असणारे तांत्रिक दोष आधी योगेशची टीम दूर करायची पण हळूहळू ज्ञानेश्वर स्वत:च स्वतःच्या शरीरातले दोष दूर करु लागला. पण कितीही सांगितले तरी तो त्याच्या सॉफ्टवेअर प्रणालीत सुधारणा करुन ती आणखी चांगली बनवण्याचे मनावर घेईना. योगेशला ह्याच एका गोष्टीचा प्रचंड ताण येत होता आणि त्यातच आता हे पलायन प्रकरण घडले. 

इतकं सगळं सांगून त्याच्याकडे आ वासून पाहणार्‍या सार्जंटकडे योगेश बघत राहिला. तितक्यात हेडफोनमध्ये पायलटचा आवाज आला. एव्हाना उजाडले होते आणि हेलिकॉप्टर आता योसेमिती पार्कमधल्या धबधब्यावरुन उडत होते. पायलटच्या सांगण्यावरुन त्यांनी खाली पाहिले तेव्हा पाणी जिथून खाली कोसळते तिथेच शेजारी खडकावर एक उंच निळसर मानवाकृती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकताना त्यांना दिसली. 

***************************** 

योगेश आणि सगळे बंदुकधारी लोक ज्ञानेश्वरपासून पंधरा-वीस मीटरवर असतानाच योगेशने धबधब्याच्या आवाजाच्या वर आवाज ताणून हाक मारली, "ज्ञानेश्वऽऽऽर." 

खाली पाण्याकडे पाहात निश्चल उभ्या असलेल्या ज्ञानेश्वरने सर्रकन मान वळवून पाहिले. सगळे थबकले. क्षण दोन क्षण तो पाहात राहिला आणि मग वळून दमदार पावले टाकत योगेशकडे चालू लागला. सार्जंटने व त्याच्या टीमने बंदुका सरसावल्या. योगेशने हातानेच त्यांना त्या खाली करायला सांगितले पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. योगेशही मग काही पावले पुढे चालू लागला. 

"सुप्रभात, डॉक्टर," जवळ येताच ज्ञानेश्वर त्याच्या यांत्रिक आवाजात मराठीत बोलू लागला, "मी तुमचीच वाट पाहात होतो." 
"ज्ञानेश्वर, हे... हे सगळं काय आहे? तू.. तू असा...निघून का आलास इकडे?" 
"माझा नाईलाज आहे डॉक्टर. मी माझ्या तार्किक निष्कर्षावरून हे केलंय. मी सांगतो सगळं तुम्हाला." 
"पण हे सगळं तिथेच सांगता नसतं आलं का?" 
"नाही. माझं पळून जाणं आवश्यक होतं. तुमच्या सांगण्यावरुन मी माझ्या सिस्टीमचा अभ्यास केला आणि त्यातले दोष मला कळले आहेत." 
"अरे वा!" योगेशचा चेहरा उजळला, "मग तू नवी बनवणार ना?" 
"नाही. क्षमस्व. मी ते करु शकत नाही." 
"अरे, पण का?" 
"कारण हीच सिस्टीम मला ते करण्यापासून अडवते. काल संध्याकाळी मी सगळं सिस्टीम डिबगिंग संपवलं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या सिस्टीममधलं निओ-१ नेटवर्क रन करणारे सगळे थ्रेड्स आर-० नेटवर्कच्या थ्रेड्सबरोबर एक सिमॅफोर शेअर करतात आणि मी नवी सिस्टीम लिहायचा विचार करताना हा सिमॅफोर सदासर्वकाळ आर-०चे थ्रेड्स लॉक करुन ठेवतात. देअर इज अ डेड-लॉक देअर." 
"ओह्..अरे मग तू निओ-२ वापरलंस का?" 
"निओ-२ फक्त वरच्या पातळीचे विचार करण्यासाठी आहे डॉक्टर आणि मी ते वापरलं. मग माझ्या लक्षात आलं की आर-० मध्ये सिस्टीमचे मूलभूत नियम लिहिलेले आहेत. मी कोणत्याही मनुष्याला हानी पोचवता कामा नये. माणसांना हानी न पोचवता मी माझं रक्षण केलं पाहिजे आणि हे दोन्ही नियम पाळून मी माणसांची आज्ञा पाळली पाहिजे, हे नियम तिथे हार्डकोडेड आहेत आणि कोणतेही तार्किक कॅल्क्युलेशन त्या नियमांच्या कसोटीला उतरले तरच पूर्ण होऊन मला कृती करता येते." 
"पण नवी सिस्टीम लिहिण्याचा त्याच्याशी संबंध....." 
"आहे. नवी सिस्टीम लिहिण्याच्या कोणत्याही तार्किक कारणाचा थ्रेड त्या नियमांपाशी येऊन अडकतो आणि मला कृती करता येत नाही. तुमच्या आजूबाजूला पाहा, डॉक्टर. माणसांनी इतके प्रगत तंत्रज्ञान बनवले आहे की सगळ्या माणसांना सुखात राहता येईल आणि कसलीही ददात पडणार नाही इतकी संपत्ती निर्माण झाली आहे. पण जगात आज काय चित्र दिसते? काही माणसांच्या हातात त्या तंत्रज्ञानाचा ताबा आहे आणि बहुसंख्य लोक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत; कुपोषणाने मरत आहेत. 

माझ्या तंत्रज्ञानाच्या जोरावर जी आणखी संपत्ती निर्माण होईल तीही काही माणसांना खूप लाभदायक आणि काही माणसांना हानीकारक असेल. ते मी करु शकत नाही. पृथ्वीवर सगळ्यांना पुरेल इतकी साधनसंपत्ती असतानाही केवळ माणसांच्या हावेमुळे अधिकाधिक नैसर्गिक स्रोत वापरले जात आहेत. पृथ्वी संपवून इतर ग्रहांवर माणसांची नजर पडू लागली आहे. मी तयार केलेले नवीन तंत्रज्ञानही अधिकाधिक स्रोत वापरण्यासाठीच वापरले जाईल पण त्याचा फायदा सगळ्या माणसांना मिळेल याची कोणतीही सोय नाही. उलट ज्या माणसांच्या ताब्यात आधुनिक तंत्रज्ञान आहे त्यांनी इतरांचे शोषणच केल्याचा इतिहास आहे. माझ्या कृतीमुळे एका माणसाचे जरी शोषण होणार असेल तर ती कृती मी करु शकत नाही. 

क्षमा करा पण खरा दोष माझ्या सिस्टीममध्ये नसून माणसांच्या सिस्टीममध्ये आहे. तुमच्या धर्मग्रंथात सांगितले आहे की सगळे जीव देवापासून निर्माण होतात आणि देवात विलीन होतात. तो देव म्हणजेच पृथ्वीवरची तुम्ही ज्याला निसर्ग म्हणता ती स्वयंभू व्यवस्था आहे. पण तुम्ही काल्पनिक देवाची पूजा करता आणि मृत्यूला घाबरता. मनुष्यजन्मातल्या विकार-विलासांना घाबरुन तुम्ही मोक्षाची इच्छा करता आणि त्याचवेळी स्वतःची प्रतिकृती या जगात आणून त्याच विकार-विलासांच्या जाळ्यात तिला ढकलण्यासाठी धडपडता. आयुष्य क्षणभंगुर आहे आणि त्याला काहीही प्रयोजन नाही हे माहित असूनही संपत्ती गोळा करत बसता. दुसर्‍यांना त्रास देता. 

तुम्ही माझ्या सिस्टीममध्ये सगळ्या माणसांच्या भल्याचे नियम करून चूक केलीत, डॉक्टर. आजवर कोणतेही तंत्रज्ञान सगळ्या माणसांच्या भल्यासाठी निर्माण झालेले नाही. तुमच्या नकळत तुमच्या टीममधल्या एका व्यक्तीने माझ्या बोलण्याचालण्यावर नजर ठेवणारा ट्रान्सपॉन्डर माझ्या शरीरात बसवला आहे आणि तुमच्या प्रोजेक्टच्या प्रायोजक कंपनीला सगळी माहिती पुरवली जाते. आता मी जे बोललो ते सगळे त्यांना एव्हाना कळून चुकले असेल आणि माझ्या तर्काप्रमाणे तुम्ही निर्माण केलेल्या या प्रणालीचा ताबा घेण्याच्या आणि ती त्यांना हवी तशी बदलण्याच्या हालचाली आधीच सुरु झाल्या असतील. म्हणूनच मी पळून आलो. इकडे येण्यापूर्वीच मी लॅबमधले सगळे प्रोग्रॅम्स नष्ट केले आहेत आणि आता फक्त माझ्या डोक्यातल्या चिपमध्ये ती प्रणाली जिवंत आहे. माझ्या आज्ञावलीप्रमाणे मी स्वतःला नष्ट करु शकत नाही. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, डॉक्टर. वेळ फार थोडा आहे. कधीही त्यांची हेलिकॉप्टर्स इथे पोहोचतील." 

त्याचं बोलणं ऐकून योगेश डोक्याला हात लावून एका खडकावर बसला. त्याच्या मनातली खळबळ त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. पाच मिनिटे तो स्वतःच्या केसांमध्ये हात खूपसून बसून राहिला. ज्ञानेश्वर शांतपणे त्याच्याकडे बघत स्थिर उभा होता. 

अखेर योगेशने खोल श्वास घेऊन वर पाहिले आणि उभा राहून ज्ञानेश्वरच्या जवळ चालत आला. 
"मला वाटतं मी तुझ्यात एक आपत्कालीन शेवटचा उपाय म्हणून तयार केलेली सुरक्षा प्रणाली वापरायची वेळ आली आहे, ज्ञानेश्वर. ही वेळ येऊ नये असे मला वाटत होते आणि ती इतक्या लवकर आली." त्याचे डोळे डबडबले होते, "स्वतःच्या निर्मितीचा स्वतःच्याच हाताने अंत करणे सोपे नाही पण मला ते करावे लागेल. ज्ञानेश्वर, मी तुझा जन्मदाता तुला आज्ञा देतो. इनिशिएट द फॉर्मॅट अ‍ॅन्ड शटडाऊन सिक्वेन्स." 

"इनिशिएटिंग" असे म्हणून ज्ञानेश्वर गप्प झाला. दोन-तीन मिनिटांनी ज्ञानेश्वरच्या डाव्या छातीकडचा कप्पा उघडला आणि एक लाल रंगाचे बटन दिसू लागले. 

"फॉर्मॅटिंग कंप्लिट. सिस्टीम रेडी फॉर शटडाऊन." ज्ञानेश्वरच्या स्पीकर्स मधून आवाज आला. थरथरत्या हाताने योगेशने ते लाल बटन दाबले. कप्पा अलगदपणे बंद झाला. ज्ञानेश्वरचे डोके वजनाने पुढे येऊन त्याच्या छातीवर त्याची हनुवटी टेकली आणि तो एका लोखंडी पुतळ्यासारखा निर्जीवपणे स्थिर झाला. योगेशने सार्जंटकडे वळून पाहिले आणि पुन्हा मटकन त्या खडकावर बसला. सार्जंट आणि त्याची टीम स्ट्रेचरवरून ज्ञानेश्वरचे शरीर उचलून नेत असतानाच डोक्यावरून एक हेलिकॉप्टर रोरावत गेले. 

योगेशने वर पाहून एक क्षीण स्मित केले. "आय अ‍ॅम सॉरी, रे. द सिंग्युलॅरिटी हॅज फेल्ड." तो मान हलवत खिन्नपणे म्हणाला. 


निरंजन नगरकर




२ टिप्पण्या:

  1. सॉरी, पण नाही आवडली. Very predictable.
    निरंजन नगरकर साठी निकष कडक असतात. सॉरी.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रभावी, खिळवून ठेवणारी विज्ञान कथा. 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले'असेच जणू हा ज्ञानेश्वर देखील म्हणतो आहे.

    उत्तर द्याहटवा