ये दोस्ती

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे 
तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे 
मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार,
सून ए मेरे यार
तेरा गम मेरा गम, मेरी जान तेरी जान
ऎसा अपना प्यार!!

शोले चित्रपटातील दोन मित्रांवर चित्रित झालेले हे प्रसिध्द गाणे मैत्रीबद्दल बरेच काही सांगून जाते. निव्वळ दोन अक्षरांनी बनलेल्या या छोट्या शब्दात मात्र माणसाचे अख्खे आयुष्य सुखकर करायची क्षमता आहे. दोस्ती, यारी, सखा या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे अनोखे ना३२१ते कधीकधी जात, धर्म, वय, गरीबी, श्रीमंती ही सारी बंधने झुगारून फक्त माणसे जोडण्याचे काम करते आणि वृध्दींगत होतो तो फक्त स्नेह. मैत्री ही एक जाणीव आहे जिला कशाचाही आधार लागत नाही. इतर नात्यांमधे एक प्रकारचा साचा असतो आणि रक्ताची ओळख द्यावी लागते. मैत्री हे जगातले एकमेव असे नाते आहे ज्याला ना कोणताही साचा असतो ना रक्ताची ओळख द्यावी लागते. मैत्री मध्ये हा माझा सख्खा मित्र तर हा माझा चुलत मित्र असे काहीही नसते, असतो तो फक्त मित्र आणि मित्र. 

मैत्री ही खरंतर एक जाणीव आहे. शब्द अपुरे पडतील याच्या बद्दल लिहायला आणि सांगायला. या नात्याला काहीही पार्श्वभूमी नसतानाही हे नाते कसे इतके दृढ होते, हे अजूनही न सुटलेले एक कोडे आहे. विश्वासाच्या भक्कम पायावर मैत्रीची इमारत ताठ उभी असते जी कोणत्याही बाह्य शक्तीने सहजासहजी हलत नाही. प्रेमाची अदृश्य शक्ती या नात्याची वीण घट्ट ठेवायला मदत करते. चांगली नाती बियाण्यासारखी असतात. पेरल्या नंतर सुरवातीला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते पण एकदा ती बहरली की आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात. मैत्रीचेही अगदी तसेच असते. सुरुवातीला प्रेम, विश्वास अशा गोष्टींनी याची नीट नीगा राखली तर आयुष्यभर ही आपल्यावर स्नेहाची छत्र छाया धरतात आणि याचे मोल कधी विसरता येत नाही. मैत्री हा असा आयुष्यभराचा अनमोल ठेवा ठरते. मैत्री ही कधी ठरवून होत नसते आणि केलीच तर फार काळ टिकत नाही. सहवासाने परिचय होईल पण मनाच्या तारा जुळतीलच असे नाही. कधी कधी अनपेक्षितपणे झालेल्या ओळखी आयुष्यभराची साथ निभावतात. 

माणसाच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विलक्षण रंजकता व विरंगुळा आणून जगण्याची नवीन उमेद निर्माण करते मैत्रीच. मैत्री हे असं नातं आहे की जे थेट हृदयापासून येतं आणि श्वासा सोबत जगत असतं. मित्र किंवा मैत्रिणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनतात हे आपल्यालाच कळत नाही. आपण आई-वडीलांशी जितकं समरस होऊन बोलू शकत नाही तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. काही कारणाने जर आपण त्यांच्यापासून अथवा ते आपल्यापासून लांब गेले तर त्यांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ती फारच त्रासदायक असते. 

प्रसिद्ध लघुनिबंधकार ना. सी. फडके सांगतात की मैत्री ही स्फुल्लींगासारखी आहे. ती केव्हा प्रकट होईल सांगता येणार नाही. एकदा जुळलेली ही मने वर्षानुवर्षे जुळून राहतात. खरा मित्र कधी खुशामत करीत नाही. उलट आपण चुकत असलो तर कठोर शब्दांच्या फटकार्‍याने तो आपल्याला जागे करतो. प्रसंगी भ, म या मुळाक्षरांवरून सुरू होणार्‍या प्रेमळ शब्दांचा (शुध्द मराठीत शिव्यांचा) वापर करावयासही मागे पुढे पहात नाही. आपल्या विजयाने, यशाने तो आनंदी होतो आणि मनापासून तो आपले अभिनंदन करतो. अडचणीच्या काळात काहीही न सांगता, परतफेडीची अपेक्षा न करता तो मदतीला धावून येतो. प्राचीन काळापासून अशा मैत्रीला नावाजले जाते. ज्याला खरा मित्र लाभला आहे तो खऱ्या अर्थाने धनवान असतो, नाहीतर कोट्यावधी रुपये आहेत पण मनीचे सुखदु:ख उघड करायला कोणीही मित्र नाही, तो राव असूनही रंकच आहे. 

आयुष्यात अशाच 3 जिवलग मित्रांची मला मिळालेली अनमोल साथ आयुष्यभर न विसरता येण्यासारखी. सतीश, मकरंद आणि परेश, हे तीन जिवलग. वेगवेगळ्या स्वभावाचे आम्ही म्हणजे जणू चार दिशांना चार तोंडे म्हणतात तसे. सतीश एकदम व्यवहारी तर मकरंद एकदम खुशालचेंडू. परेश एकदम बडबड्या तर मी एकदम शांत, माणूस घाणा. मी पुस्तकी किडा तर मकरंदचे पुस्तकांशी वैर. परेश रंगाने काळासावळा तर सतीश गोरा घार्‍या डोळ्यांचा. मी हुशारांमध्ये गणला जाणारा तर बाकीचे बॅकबेंचर्स. दहावीच्या वर्गात सुरुवातीला नवीन असताना झालेली ही मैत्री आज 20 वर्षे उलटून गेली तरी तेवढीच ताजी टवटवीत आहे. प्रत्येकाचे गुण दोष विसरून, मैत्रीच्या नात्यात आम्ही असे बांधले गेलो आहोत की लग्न होऊन मुले झाली तरी तो अल्लड, व्रात्य स्वभाव अजूनही सतत डोकावतोच. व्हॉटसॅप, फेसबुक ने सतत एकमेकांच्या संपर्कात आहोत पण वर्षातून एकत्र भेटलो नाही तर चैन पडत नाही. पण मग भेटलो की सुरू होते ती गप्पांची न संपणारी मैफल. जुन्या आठवणी ताज्या करताना आम्ही नकळत तो काळ जगून घेतो, जो फारच सुंदर होता. अगदी मंतरलेले दिवस होते ते सगळे. त्या आठवणी जाग्या करताना कधी डोळ्याच्या पापण्या नकळत ओलावतात तर कधी जुन्या फजित्या, गमती-जमती आठवून लोटपोट हसवतात. प्रत्येक वेळी, पुढच्या वेळी याही पेक्षा जास्त वेळ भेटून जुन्या आठवणी ताज्या करायचा वादा करून त्या रम्य आठवणी काळाच्या भयानक पडद्यामागे हरवण्यापासून/लुप्त होण्यापासून थांबवतो. या आमच्या मैत्रीला कोणाचीही दृष्ट न लागो हीच त्या भगवंताच्या चरणी नम्र विनंती. अशा या आगळ्या वेगळ्या मैत्रीबद्दल माझ्या काही ओळी... 

सकाळचे कोवळे ऊन तर कधी शरदाचे चांदणे, ती मैत्री 
ठेच लागून पडताना सांभाळणारी असते, ती मैत्री 
जोरका झटका धीरेसे देऊन योग्य मार्ग दाखवते, ती मैत्री 
चाचपडणार्या अंधारात प्रकाशाचा किरण दाखवते, ती मैत्री 
संकटात मदतीचा हात तर पाठीवर शाबासकीची थाप देते, ती मैत्री 
प्रेमासाठी आसुसल्या जीवांना एकत्र आणते, ती मैत्री 
स्नेहाचा न आटणारा खळखळता झरा असते, ती मैत्री 
दुःखात, प्रेमाच्या उबेची शाल पांघरते, ती मैत्री 
सुखात, संकटांना ढाल बनून परतविणारी, ती मैत्री 
जन्मभराच्या साथीने आश्वस्त करणारी, ती मैत्री 
माझ्यातल्या माझी खरी ओळख पटवते, ती मैत्री 
निरागस, निर्मळ, निरपेक्ष, निर्गुण असते, ती मैत्री 
खरंच न दोस्तहो, हीच असते न ती मैत्री... 

अगदी निखळ आणि खऱ्या अर्थाने सांगावयाचे झाल्यास जिवाभावाची. तेव्हा या नात्याला सोन्यासारखे जपायलाच हवे!!


आपला मित्र,

- ओंकार बापट


1 टिप्पणी: