ग्रीष्म

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

सर्व सृष्टी वसंत ऋतुची वाट पाहत असते कारण वसंत म्हणजे चैतन्य! वसंत म्हणजे आनंदीआनंद! वसंत म्हणजे रंगांची उधळण! पण वसंत सरता सरता लगेच ग्रीष्माच्या उष्ण झळा जाणवायला लागतात. ग्रीष्म ऋतुला आयुष्यातील खडतर काळाचे प्रतीक मानले जाते. ग्रीष्माची उन्हाळा, वैशाखवणवा अशा शब्दात संभावना केली जाते; पण मला तर ग्रीष्म हा खूपच सामाजिक ऋतु वाटतो. तो आनंद देणारा ऋतु आहे.

ग्रीष्म आपल्या भेटीला कधीच रिकाम्या हाताने येत नाही. तो आपल्याबरोबर इतका स्वादिष्ट व आरोग्यवर्धक खाऊ घेऊन येतो की खाऊ घेऊन आलेल्या मामाच्या आगमनामुळे जसा बच्चेकंपनीला आनंद होतो तसा ग्रीष्माच्या आगमनामुळे समस्त मानवजातीला आनंद होतो. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यावरील औषधेही तो आपल्याबरोबर घेऊन येतो. काय काय असतं याच्या पोतडीत? सुमधुर चवीचा फळांचा राजा आंबा, वरून हिरवंगार न् आतून लाल लाल असलेलं कलिंगड, टरबूज, खरबूज, जांभळं, करवंदांसारखा रानमेवा आणि तोंडाला पाणी सुटेल अशा हिरव्याकंच कैऱ्या! मग काय! कैरीची चटणी, कैरीचं पन्हं, कैरीचं सरबत, कैरीची डाळ असे विविध पदार्थ फक्त ग्रीष्मातच खायला मिळतात.

ग्रीष्म येतो तोच मुळी निवांतपणा घेऊन! शाळांना सुट्टया लागलेल्या असतात. मुलांच्याकडे तर वेळच वेळ असतो आणि शाळेचं आवरून द्यायचं नसल्यामुळे गृहिणीसुद्धा निवांत असतात. हीच वेळ असते एकमेकांकडे जाण्याची, नातेवाईकांना भेटून येण्याची! आता घरोघरी एक किंवा दोनच मुले असली तरी आत्या, काका, मामा, मावशीची मिळून पाचसहा तरी मुलं एकत्र आली की मग काय! नुसती धमाल! बरं ह्या दिवसात स्वयंपाकाचाही त्रास कमीच होतो. आंब्याने स्वयंपाकाचा सर्व भार स्वतःवर घेतलेला असतो. आमरस-पुरी/पोळी आणि तोंडी लावायला एखादी भाजी किंवा फक्त भज्याचा घाणा की झाला स्वयंपाक! मग दुपारभर पत्ते, कॅरम, व्यापार हे घरात खेळण्याजोगे बैठे खेळ आणि ऊन्हं उतरल्यावर उन्हाळ्यातल्या सुंदर संध्याकाळी बाहेर भटकंती! अन् रात्री मनसोक्त आइस्क्रीम! मुलांना सुट्टया असल्यामुळे नोकरदार वर्गही रजेची जमवाजमव करून प्रेक्षणीय ठिकाणी सहलीला जातात व वर्षभराची ऊर्जा साठवून घेतात. काही मुले वेगवेगळ्या शिबिरांना जातात. गिरीभ्रमण, गिर्यारोहण, पोहणे अशा विविध गोष्टी शिकायचासुद्धा हाच ऋतु आहे.

मध्यम आकाराच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये गृहिणींची वेगळीच धांदल चालू असते. कडक ऊन पडायला सुरुवात झाली की त्यांना वेध लागतात वाळवणाचे! पाचसहा शेजारणी एकत्र येऊन दररोज एकेकीच्या कुरडया, पापड्या, सांडगे, शेवया, उडदाचे पापड करू लागतात त्यामुळे कोणाही एकीला ताण येत नाही व प्रत्येकीचं भरपूर वाळवण करून होतं. तसेच तिखट-मसालेही याच ऋतुत केले जातात. हिरव्याकंच कडक कैऱ्यांचं लोणचं व साखरांबा, गुळांबा, आंब्याची पोळी हेही याच दिवसात करून ठेवतात. ह्याच ऋतुत वर्षभराचं धान्य घेऊन ते कडक उन्हात वाळवून साठवून ठेवलं जातं.

हल्ली तर मोठ्या शहरातील स्त्रियांसाठी हे पदार्थ करून बचतगटांच्यामार्फत विकण्याचं मोठं काम लहान गावातील महिलांना मिळाल्यामुळे त्यासुद्धा अर्थार्जन करू लागल्या आहेत. ग्रीष्म ऋतु हा सामाजिक ऋतु आहे असं मी म्हटलं ते याच अर्थानं! याच ऋतुत लोक एकमेकांकडे जातात, प्रेमाने भेटतात, गुण्यागोविंदाने एकत्र येऊन महिला कामं करतात, मुलांना एकमेकासोबत राहण्याची, वाटून घेण्याची सवय लागते, म्हणून हा सामाजिक ऋतु आहे असं मला वाटतं.

याच ऋतुत आणखी एक खूप मोठी गडबड चाललेली असते ती म्हणजे लग्नसराईची! या काळात अनेक जोडपी विवाहबद्ध होतात व त्यानिमित्ताने अनेक कुटुंबे एकमेकांशी नातेसंबंधाने जोडली जातात. बाजारही त्यामुळे तेजीत आलेला असतो. कापडखरेदी, सोनेखरेदी, दागिने घडवणे यामुळे प्रत्येक लग्नघरात आनंदाचे, हौसेचे वातावरण असते. भर उन्हात या खरेदीसाठी बाहेर पडताना त्या उन्हाचाही काही त्रास वाटत नाही इतका आनंद, उत्साह हा ग्रीष्म घेऊन आलेला असतो. मध्यंतरीच्या काळात लग्ने एकाच दिवसात उरकली जायची. 'सकाळी टामटूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम' असं या लग्नांचं वर्णन केलं जायचं. पण चित्रपटांच्या प्रभावामुळे हल्लीच्या काळातही जुन्या काळाप्रमाणे लग्न तीन-चार दिवस चालतं. मग एक दिवस मेंदी, एक दिवस संगीतरजनी असं कार्यक्रमांचं स्वरूप मात्र बदललं आहे. या तीन-चार दिवसात नटण्यामुरडण्याची, नाचगाण्याची सगळी हौस भागवली जाते आणि कित्येक भावी नात्यांची बीजंही रुजवली जातात!

आपला भारत उष्ण कटिबंधात असल्यामुळे आपल्याला प्रखर ऊन अनुभवायला मिळतं हे आपले भाग्यच आहे. इतका सगळा आनंदाचा ठेवा घेऊन येणारा ग्रीष्म म्हणून मला "वणवा" न वाटता खूप प्रेमळ असा भेटवस्तू घेऊन येणारा कुणी आप्तस्वकीयच वाटतो.

- निर्मला नगरकर




1 टिप्पणी: