ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
देवा, तुझ्या देव्हाऱ्यात
नंदादीपाचा उजेड रे |
बाहेर सगळा उजेडच उजेड
दाखव आता वाट रे ||
देवा, तुझ्या मूर्तीसाठी
उंचीची स्पर्धा रे |
लाखो, करोडो रुपयांचा
होतो त्यापायी चुराडा रे ||
देवा, तुझ्या आराशीत
नाही भक्तीचा भाव रे |
तुझ्यापुढे नाच गाण्याचा
होतो नंगा नाच रे ||
देवा, लाडू ,पेढे-बर्फी
यांची रचली रास रे |
भीक मागणाऱ्यांची मात्र
रांग वाढते आज रे ||
देवा, स्वार्थ आणि परमार्थ
यांची गल्लत आज रे |
समानतेच्या धड्याच्या
चिंध्या होती आज रे ||
काम नको ,कष्ट नको
Easy money चा ध्यास रे |
तुझ्यापुढे नाचायाला
अंगी बळ खास रे ||
देवा, मरणाच्या भीतीपायी
तुझी आठवण आज रे |
नवसाची लालूच तुला
क्षणोक्षणी देती रे ||
देवा, सच्च्या, निर्मळ मानवाच्या
आज मी शोधात रे |
तुझ्याविना या जगात
कोण दाखवील वाट रे ||
छान लिहिली आहेस कविता !!
उत्तर द्याहटवा