परिवार वार्ता


Ms/Mrs.Global Expat Singapore स्पर्धेत मीनल पै रायकर विजेती 


२८ ऑगस्ट २०१६ रोजी सिंगापूर येथे Ms/Mrs.Global Expat Singapore ह्या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी झाली. यामध्ये देशी विदेशी स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. Style Etiquette Pvt Ltd आणि AVA Events या दोन कंपन्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम १९ स्पर्धकांपैकी, "Mrs. Crowning Glory" हा किताब आपल्या 'मीनल पै रायकर' हीला मिळाला. श्रीनिवास पै रायकर यांच्या बरोबर मिनलच्या लग्नाला १६ वर्षे झाली असून तिला १३ वर्षांची इशिता नावाची मुलगी आहे. मीनल आर्किटेक्चर व इंटेरिअर डेकोरेशन या प्रोफेशनमध्ये आहे, तीने भारतात ९ वर्ष टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर म्हणुन कामही केले आहे. मीनलला लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्याने तीने भारतात तसेच सिंगापूरमध्ये बरेच परफॉर्मन्सेस दिले आहेत.



Ms/Mrs.Global Expat Singapore स्पर्धेत महत्त्वाचा टप्पा होता "टॅलेंट राउंड". या फेरीमध्ये तिने पारंपारिक लेझीम नृत्य सादर केले व स्पर्धेत महाराष्ट्राचा ठसा उमटवला. मीनलच्या शब्दात सांगायचं झालं तर ... "हा प्रवास खूपच सुंदर होता. प्रत्येक टप्प्यातून मी खूप काही शिकले. या माध्यमातून माझ्या खूप नवीन लोकांशी ओळखी झाल्या, त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच यातल्या तज्ञ व्यक्तींनी आम्हाला दोन महिन्यात जणू घासून पुसून तयारच केलं असं मी म्हणेन. माझ्या गुरू "वनिथादेवी सर्वनामुथू" आणि "आशिमा जैन" यांचा मी इथे आवर्जून उल्लेख करेन कारण यांच्याकडून मी बॉडी लँग्वेज, मॉडेलिंग आणि फोटोग्राफी याविषयी खूप काही शिकले, जे माझ्यासाठी पुढेही खूपच उपयोगी ठरणार आहे. प्रत्येक बाईत काहीतरी खास असतंच पण तिला संधी मिळेलच असं नाही. म्हणूनच मला माझी गोष्ट सांगून हे वाचणाऱ्या प्रत्येक महिलेला उद्युक्त करायचंय. स्वतःवर विश्वास ठेवाल तर सगळं साध्य आहे, तुमची सगळी स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील!"


1 टिप्पणी: